बदलत्या भारताची दशकगाथा
बदलत्या भारताची दशकगाथा – 2014 पूर्वीचा भारत आठवून पहा एकदा. आपली काय ओळख होती? आणि देश म्हणून आपण कोणत्या पातळीवर होतो?- संपूर्ण अव्यवस्था. कोणतीही सरकारी सेवा हवी असल्यास, तासनतास रांगेत उभे रहावे लागायचे. रेल्वेचे तिकीट पाहिजे तर रांगा, गॅस सिलिंडरसाठी तेच, कुठली कागदपत्रे काढायची असली तरी तेच.
अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे उजेडात येत होती, रस्त्यावरून प्रवास अक्षरशः हाडे खिळखिळी करायचा आणि या सर्वांवर कडी म्हणजे, “स्लमडॉग मिलेनियर” सारख्या सिनेमाने भारताची अत्यंत गलिच्छ प्रतिमा जगात बनवून ठेवली होती. एकूणच काय, तर भारताची जगातली पत धोक्यात होती.
मात्र 2014 ह्या वर्षाने या देशाला सुदिन दाखवला. “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूं…” हे शब्द देशाच्या राजधानीत घुमले आणि तेव्हापासूनच इथल्या खिळखिळ्या व्यवस्थेचे मजबूतीकरण सुरू झाले. ज्या रांगेत लोकांचे लाखो तास खर्ची पडत होते, त्याच सेवा आता चुटकीत मिळू लागल्या.
देशात विक्रमी परकीय गुंतवणूक यायला सुरवात झाली. देशाच्या उद्योगांची यंत्रे आता वेगात धडधडू लागली. चलनसाठा नवनवे उच्चांक रचत आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशस्त रस्ते बांधले जात आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशाला गलिच्छ दाखवून ऑस्कर सारखे पुरस्कार मिळवण्याची पद्धत आता अस्तित्वात नाही. त्याउलट, या संस्कृतीचा गौरव करणारा “RRR” येतो आणि ‘गोरा साहेब” याच सिनेमाला डोक्यावर घेऊन नाचतो.
या देशाची पत गेल्या दहा वर्षात कशी उंचावत गेली, याची कहाणी म्हणजेच “बदलत्या भारताची दशकगाथा”. आजपासून दर आठवड्याला दोन वेळा….
“उत्तम” प्रदेशाकडे…
“बीमारू राज्य” ही संकल्पना ऐकली असेल तुम्ही. उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड गरिबी, बेरोजगारी यासारख्या समस्या आहेत. या समस्या काही राज्यांमध्ये सारख्याच प्रमाणात दिसून येतात; ही राज्ये म्हणजेच – बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. यातील उत्तर प्रदेशची परिस्थिती अधिकच बिकट आहे. या राज्यातून निर्वासित मजुरांचे लोंढे उद्योगधंद्यांच्या शोधत परराज्यात स्थायिक होतात. कारण पैसा कमवायला तिकडे संधीच मिळत नाहीत.
ह्या देशाचे एक कमालीचे दुर्दैव राहिलेले आहे. आपल्याकडे असलेली संसाधने आणि आपले ज्ञान भांडार यांचा आपल्याला कधीच पुरेपूर वापर करून घेता येत नाही. पाहू गेल्यास आपल्या प्रत्येक शहराचे आणि जिल्ह्याचे एक खास काहीतरी वैशिष्ट्य असतेच.
ते वैशिष्ट्य हेरून, त्याला जर जागतिक पातळीवर ओळख करून दिली, तर दारिद्र्य , बेरोजगारी हे प्रश्न बऱ्याच अंशी मिटतील, हे निर्विवाद सत्य आहे; आणि नेमकी हीच बाब हेरली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी. त्यांनी उत्तर प्रदेशातील काही जिल्हे आणि त्यांची खास आकर्षण टिपली आणि त्यांना ओळख मिळवून देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी आणलेली संकल्पना म्हणजे “एक जिल्हा एक उत्पादन” – One District one product.
यातून काही अफलातून गोष्टी जगासमोर आल्या. त्यातील दोन खास गोष्टी:-
१) काला नमक तांदूळ:-
उत्तरप्रदेशातील सिद्धार्थ नगर भागात हा तांदूळ घेतला जातो.
काळया रंगाचा हा तांदूळ. अगदी चवदार आणि पौष्टिक. वजन घटवायचे असल्यास उत्तम आणि व्हिटॅमिन ई चा उत्तम स्रोत. मात्र इतक्या दर्जेदार तांदळाबद्दल भारतीयांना काहीही माहिती नव्हती. आपला कर्मदरिद्रीपणा एवढा, की 2018 येईपर्यंत ह्या तांदळाची शेती जवळपास बंद झाली होती. कारण, कुणाला कसली माहितीच नाही.
मात्र अमेरिका, न्यूझीलंड ई. देशात या तांदळाला प्रचंड मागणी होती. योगी सरकारने ह्या गोष्टीची दखल घेतली आणि ह्या योजनेत काला नमक तांदूळ सामील करून घेतला. 2018 साली ज्या तांदळाचे उत्पादन मोजून 20 शेतकरी घेत होते. त्याच तांदळाचे उत्पादन 2021 मधे 800 शेतकऱ्यांनी घेतले. यात शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा झाला. एकेकाळी 40 रुपयाने विकला जात असलेला हा तांदूळ आता 150 रुपयाने विकला जात आहे. लागवडी खालील क्षेत्र सुद्धा 10000 हेक्टर वर गेले आहे, आणि सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस आलेत.
सरकारी इच्छाशक्ती एवढी जबरदस्त की त्यांनी ह्या तांदळाची पूर्वेकडील बौद्ध राष्ट्रांत विक्री व्हावी, या उद्देशाने या तांदळाला नावच “बुद्धा राईस” असे दिले आहे. आपोआपच आपला हा माल आता कंबोडिया, म्यानमार ते जपान पर्यंत लोकप्रिय झाला.
2) गुलाबी मीनाकारी:-
शुद्ध चांदीपासून बनवलेले आणि रंगीत काचांनी सजवलेले शिल्प म्हणजे वाराणसीची गुलाबी मीनाकारी.
2014 साल येईपर्यंत हे नाव नष्ट होण्याच्या मार्गावर होते. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच कलाकार शिल्लक असावेत. मात्र त्यावर्षी एक चमत्कार झाला. वाराणसी मधून नरेंद्र मोदींना प्रचंड जनादेश मिळाला. आणि ही हिंदू पुण्यभूमी गत वैभव प्राप्त करू लागली.
लुप्त होत चाललेल्या अनेक कलांपैकी एक होती – “गुलाबी मीनकारी” पंतप्रधान मोदींच्या हाती एक दिवस ही वस्तू लागली. त्यांनी निर्मात्यांना बोलावणे पाठवले आणि या शिल्पांचा धडाक्यात प्रचार सुद्धा सुरू केला. खुद्द वाराणसी जिल्ह्यात ओळख हरपत चाललेली ही शिल्पे आता अमेरिका – जर्मनी या राष्ट्राध्यक्षांच्या हाती भेटवस्तू म्हणून जाऊ लागली. इतकेच नाही, तर ह्या शिल्पांची स्वतंत्र प्रदर्शने आयोजित केली गेली.आज वाराणसी शहरात गेलात, तर हे शिल्प हमखास पाहायला मिळतात. आणि एकदा ते पाहिले, की घेण्याचा मोह आवरत नाही…
या दोन केवळ कहाण्या नाहीत. एक राष्ट्र म्हणून आपण किती श्रेष्ठ बनू शकतो, याचे हे दाखले आहेत. उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्याला आता एक नवी ओळख मिळत आहे. आणि सोबतच एकेकाळी विस्थापित मजुरांचा म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश, आता हळूहळू देशाचा निर्यात केंद्रबिंदू बनत आहे… “बिमारू” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्याची ओळख आता “उत्तम प्रदेश” म्हणून केली जावी, अशी सदिच्छा…