हा मोदी संपत का नाही..?

नरेंद्र मोदी

Click to rate this post!
भारतीय राजकारण आज अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की, त्यात ‘नरेंद्र मोदी‘ हे नाव मध्यवर्ती राहून इतर राजकारण त्याभोवती गुंफल गेलंय. हि वस्तुस्थिती आजघडीस मोदींचे प्रखर विरोधीही मान्यच करतील. त्याविषयीचे हे भाष्य..
विरोधकांचे दुर्दैव आहे की, २०१४ मध्ये केवळ सत्ताबदल न होता व्यवस्था बदलाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास होता. पण हा प्रवास ९ वर्षे झाले तरीही विरोधक लक्षात घेण्याचा प्रयत्न करतानाही दिसत नाही. ‘नरेंद्र मोदी‘ हे स्वातंत्र्योत्तर पहिलेच पंतप्रधान आहेत जे ‘लुटीयन्स’ दिल्लीच्या राजकीय प्रभावक्षेत्राबाहेरचे आहेत. आणि म्हणूनच ते पारंपरिक चालींचा वापर न करता ते नेहमीच स्वतःचा नवीन मार्ग चोखाळत राहतात!
मोदींचा Thought Process समजून घेण्यासाठी आधी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी हि इतर अनेकांसारखी निम्न मध्यमवर्गीय होती. साधनसंपत्तीच्या आभावाचा त्यांना लहानपणापासून अनुभव होता. राष्ट्रभक्ती व संघटनकार्याची बीजे त्यांच्यात वयाच्या आठव्या वर्षापासूनच रोवली गेली, ज्यावेळेस ते प्रथमतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. संघाशी जुळलेले हे बंध आजतागायत जिवंत आहेत.
त्यांना बाल-स्वयंसेवक म्हणून सामावून घेतले ते लक्ष्मणराव इनामदार यांनी. इनामदार साहेब त्यांचे एकप्रकारे राजकीय-सामाजिक गुरु बनले. पुढे त्यांचा संपर्क वसंत गजेंद्रगडकर व नाथालाल जागडा यांच्याशी आला. ८० च्या दशकात गुजरातमध्ये संघटन वाढवण्यात या तिघांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा प्रभाव युवा नरेंद्रच्या मनावर झालेला होता. त्यातूनच पुढे १९६८ ते १९७० अशी दोनतीन वर्षे ते अध्यात्मिक साधनेच्या इच्छेने विविध ठिकाणी फिरत राहिले. त्यात रामकृष्ण मिशनच्या बेलूर, राजकोट, सिलिगुडी, गुवाहाटी व आल्मोडा येथील आश्रमांचा समावेश आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांना पूर्णवेळ मिशनरी बनता आले नाही.
तिथून ते पुन्हा माघारी फिरले आणि पुन्हा संघसंपर्कात आले. वडनगरहून अहमदाबादला आल्यावर ते वयाच्या २१ व्या वर्षी १९७१ साली पूर्णवेळ प्रचारक बनले. लवकरच आलेल्या आणीबाणीच्या विरोधात भूमिगत राहून त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. कार्यकर्त्यांना सुरक्षित आश्रय पुरवणे व निधी संकलन करणे हे जबाबदारी त्यांनी पेलली होती.
संघात राहून त्यांना विविध भागांतील सामान्य जनतेचे प्रश्न, सामाजिक समस्या यांचे आकलन झाले. वाजपेयींच्या नेतृत्वात झालेल्या मुक्तीवाहिनी समर्थन आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी अल्पकाळ ते तिहार तुरुंगात गेले. संभाग प्रचारक या पदापर्यंत त्यांनी प्रगती केली.
१९८५ साली संघाने त्यांना नुकत्याच बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं कार्य सोपवत त्यांची रवानगी पक्षात केली. दोन वर्षांच्या आतच त्यांनी पक्षसंघटनेस बळकटी आणण्याचे जोरदार प्रयत्न केले. आणि त्याचीच परिणीती म्हणून १९८७ सालच्या अहमदाबाद महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. याची पोचपावती व कार्यकौशल्य पाहून त्यांना गुजरात प्रदेश भाजपचा संघटन सचिव बनवले गेले. १९९० मध्ये ते पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीत सदस्य बनले.
९० मध्येच लालकृष्ण अडवाणींच्या ज्या सोमनाथ से अयोध्या या प्रसिद्ध रथयात्रेने संपूर्ण देशात राजकीय स्थित्यंतराचे बीजारोपण केले, त्याचे अथपासून इतिपर्यंत संपूर्ण नियोजनाचा भार मोदींनीच उचलला होता आणि तो पूर्ण यशस्वी करून दाखवला. या कामाने संघटनेत वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले. पुढच्याच वर्षी त्यांनी मुरली मनोहर जोशींच्या एकता यात्रेचे नियोजन यशस्वी केले.
१९९४ साली पक्ष सचिव बनल्यानंतर त्यांनी आखलेल्या रणनीतीच्या जोरावरच पुढे १९९५ साली गुजरात राज्यात भाजपचे सरकार बनले. याचे फळ म्हणून त्यांना राष्ट्रीय सचिव बनवून त्यांना दिल्लीत पाठवले. तिथे त्यांनी हरियाणा व हिमाचल प्रदेशची जबाबदारी सांभाळली. १९९८ मध्ये त्यांनी वाघेला समर्थकांना डावलून केशुभाई समर्थकांना तिकीट दिले, त्याचा परिणाम बहुमताने भाजप सरकार बनण्यात झाला. आणि मोदी राष्ट्रीय महासचिव(संघटन) बनले.
पुढे २००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाईंचे खालावते आरोग्य आणि पोटनिवडणुकीत झालेली भाजपची हार यामुळे पक्षश्रेष्ठी नवीन नेतृत्वाच्या शोधात होते. त्यांचा शोध थांबला तो नरेंद्र मोदी नावावर! पुढे मोदींनी गुराजतचे मुख्यमंत्री म्हणून २०१३ पर्यंत केलेलं कार्य आणि परिवर्तन सर्वांसमोर आहेच. त्यांच्या कारकिर्दीत गुजरात हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनला.
पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी केलेले काम सर्व देशच नव्हे तर जग पहाते आहे. अवघ्या ९ वर्षांमध्ये त्यांनी भारतीय मानसिकतेत मोठा बदल घडवलेला आहे. त्यांनी भारतीय समाजात एक आशावाद निर्माण केलाय.

नरेंद्र मोदी

स्वहितास प्राधान्य देणारे परराष्ट्र धोरण, पायाभूत सुविधांचा अफाट वेगाने होणारा विकास, स्वदेशी उद्योगांना चालना, मोठ्या आर्थिक सुधारणा, संरक्षण क्षेत्रास बळकटी, नवीन युगाचे नवीन कायदे, मोठ्या संविधान सुधारणा, सामाजिक उत्थानाच्या योजना, कल्याणकारी योजना आणि इतर बरेच बिंदू हे त्यांच्या पंतप्रधान कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य आहे.
◆१९७१ ते ८५ संघ प्रचारक म्हणून सर्वसामान्यांच्या थेट संपर्कात राहून जमिनीवरचे कार्य – १५ वर्षे
◆१९८५ ते २००० पक्ष संघटनेत विविध जबाबदारी सांभाळत पक्षविस्तार करण्यावर भर, संघटन कौशल्य वापराचा अनुभव – १५ वर्षे
◆२००१ ते २०१३ मुख्यमंत्री व आमदार नात्याने थेट निवडणुकीय राजकारण, सत्तेतले डावपेच व प्रशासन चालवण्याचा अनुभव – जवळपास १५ वर्षे
असा एकूण ४५ वर्षांचा सामाजिक,राजकीय,संघटकीय अनुभव गाठीशी असणारे मोदी हे एकमेव नेते असतील. हे अनुभव व त्यातून मिळवलेले शहाणपण हीच त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अशा नेत्यासमोर राष्ट्रीय विरोधक म्हणून कोण उभं? हा प्रश्न पहिला तर उत्तर मिळतं – राहुल गांधी, नितीशकुमार इत्यादी… कसा टिकाव लागणार??
मोदींचे विरोधक अगदीच अल्पकालीन लाभ डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या राजकीय योजना बनवतात. मात्र मोदींची प्रत्येक राजकीय चाल हि भाजपची दीर्घकालीन वाटचाल विचारात घेऊन टाकलेली असते हे अभ्यासाअंती दिसून येईल.
मोदी जसे भारतासाठी २०४७ पर्यंत एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रकारण करत आहेत. अगदी त्याच धर्तीवर त्यांनी स्वपक्षासाठीही धोरण बनवलेले आहे. त्याचाच भाग म्हणून राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये संपूर्ण नेतृत्वबदल पाहायला मिळतोय.
असं म्हणतात की, चांगले नेतृत्व तेच असते जे वेळेतच त्याच्यानंतर त्याची धुरा चालवू शकणारे नेतृत्व उभे करतो व त्यांना योग्य ती संधी देतो!!
मोदींनीही गेल्या ९ वर्षांत केंद्रीय नेता म्हणून अनेक नवे चेहरे निर्माण केले आहेत, त्यांच्यातील गुण हेरून त्यांना यथोचित जबाबदारी दिलेली आहे.  केवळ इतकंच करून ते थांबत नाहीत तर त्या जबाबदारीला योग्य न्याय मिळतो कि नाही याचीही ते तपासणी करत राहतात.
आजवर भाजपचा पारंपरिक मतदार यांच्याशिवाय, अन्य समाजघटकातील मतदार खेचण्यासाठी रणनीती बनवून त्यावर कामही सुरु आहे. उत्तरेतील पिछडा, यादव आणि जनजातीय समाजासोबतच दक्षिणेतील ओबीसी, अनुसूचित जनजाती यांना सामावून घेण्यासाठी विविध पक्षीय उपक्रम सुरू केले आहेत.
पक्षसंघटनेसाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाही उच्चपद मिळू शकते हा विश्वास निर्माण केलाय. पक्षसंघटनेलाही सतत बदलासाठी अनुकूल करण्यात आले असून लवचिकता वाढवली आहे. सातत्याने विविध मोहीम,कार्यक्रम देऊन संघटनेला प्रवाही ठेवलं गेलंय. आणि या सर्वात, जनतेशी संपर्क कमी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचा तुलनात्मक विचार केल्यास अगदीच निराशा प्राप्त होते. विरोधी पक्ष आजही दशकभरापूर्वीच्या नेत्यांवर मुख्यत्वे अवलंबून असून, विरोधाचे ठोस धोरण याचा अभाव जाणवतो. जनतेच्या खऱ्या प्रश्नांशी निगडित मोठे आंदोलन विरोधी पक्षाने केल्याचे मला तरी आठवत नाही. कारभारातील उणिवांवर बोलण्यापेक्षा विपक्ष मोदींवर वैयक्तिक टीका करून Self Goal करण्यात मग्न आहेत.

विरोधी आघाडीचे नेतृत्व कुणी करावं याविषयी अजूनही एकमत नाही. विशेषतः ताज्या निकालानंतर त्यांच्यातील दुफळी अधिक उफाळण्याची शक्यता आहे. आजपर्यंत विपक्ष, विशेषतः काँग्रेस ज्या मुद्द्यांवर न्यायालयात गेली त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना पराभवाची मालिका पाहावी लागलीय.

उदा.: राफेल विमान खरेदी, कलम ३७०, पेगासस, सेंट्रल विस्टा प्रकल्प, PM Cares फंड, ED ची कार्यकक्षा, इतर अनेक प्रकरणे..
यातच भरीस भर म्हणून बहुसंख्य असणाऱ्या हिंदु धर्म श्रद्धांवर अनावश्यक टीकाटिप्पणी करत राहणे, तर दुसरीकडे अजूनही मुस्लिम लांगुलचालनाचे उघड-छुपे प्रयत्न करत राहतात. जे काही मोजके शहाणे लोक या विसंगतीवर आवाज उठवतील त्यांची पक्षांतर्गत गळचेपी करणे किंवा पक्ष सोडून जायला भाग पाडणे.
हि अशी विविध कारणे हेच उत्तर आहे त्या प्रश्नाचे……… हा मोदी संपत का नाही??
ता.क.: २०२४ ची निवडणूक हि भाजपसाठी आपल्या मागील यशाहून मोठे यश मिळवण्याचे आव्हान असेल तर विरोधी पक्षांसाठी स्वतःच अस्तित्व वाचवण्याची अंतिम व गंभीर लढाई असणार आहे.
लेखिका –  केतकी श्रीकांत प्रभुदेसाई

बदलत्या भारताची दशकगाथा

Click to rate this post!

Related posts

अनंत – चतुर्दशी ! – कविता

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

१० चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ