Quotesसंस्कृत सुभाषिते

संस्कृत सुभाषित मराठी अर्थ

सुभाषित म्हणजे चांगले सांगितले किंवा परिभाषित

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

संस्कृत सुभाषित मराठी अर्थ

सुभाषित म्हणजे चांगले सांगितले किंवा परिभाषित.  सु म्हणजे सुंदरपणे बोलले जाणारे म्हणजे भाषेत तयार केलेले. आनंदी आणि आदर्श जीवनाचा अमूल्य धडा संस्कृतच्या चांगल्या शब्दांत दडलेला आहे. काही  मुख्य संस्कृत सुभाषित मराठी अर्थ सादर करत आहोत-

संस्कृत सुभाषित मराठी अर्थ

मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

अर्थ : [फार] मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर [सगळ्यांशी] भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून [माणसाने] मध्यममार्ग स्वीकारावा.

मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् |
भ्रृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

अर्थ : गप्प बसणे, वेळ लावणे, निघून जाणे, जमिनीकडे बघत बसणे, भुवया वाकड्या करणे, दुसर्‍याशीच बोलत बसणे अशा सहा रीतींनी नकार दिला जातो.

चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति |
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयम् ||

अर्थ : दारू प्यायल्याने मनात गोंधळ निर्माण होतो. मन थाऱ्यावर नसलं की पापाचरण घडतं. अशा प्रकारे पाप करून मूर्ख लोक नरकात पडतात. त्यामुळे दारू पिऊ नये, मुळीच पिऊ नये.

यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः |
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ||

अर्थ : ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर [तेच] झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला मदत करणाऱ्याचा [सुद्धा] नाश करतो.

 

रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ||

अर्थ : राजा, देव, गुरु, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काही वस्तू, फळ देऊन त्याचं फळ मिळवावे.

भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

अर्थ : महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.]

खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

अर्थ : दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे दोष मोहोरी एवढे असले तरी पाहतो. [ नावे ठेवतो ] पण आपले दोष बेलफळा एवढे असले तरी दिसत असूनही न पहिल्यासारखे करतो.

वस्त्रदानफलं राज्यं पादुकाभ्यां च वाहनम् ।
ताम्बूलाद्भोगमाप्नोति अन्नदानात्फलत्रयम् ॥

अर्थ : वस्त्र दान केल्याने राज्य [ मिळते ] पादुका [चपला ] दिल्याने वाहन [मिळेल] विडा दिल्याने विषय प्राप्त होतात अन्नदान केल्याने तिन्ही गोष्टी मिळतात.

 

ईर्षुर्धृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ॥

अर्थ : [सतत दुसऱ्याशी ] स्पर्धा [तुलना] करणारा, [फार ] सहानुभूति बाळगणारा. असमाधानी, सतत भिणारा [किंवा शंका काढणारा ] दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा असे सहा जण [नेहेमी ] दुःखी असतात.

सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ।
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते
प्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते ॥

अर्थ : तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचा मागमूस सुद्धा राहात नाही. [पण] तेच पाणि जर कमळाच्या पानावर असले तर मोत्याच्या आकाराचे [सुंदर ] दिसते. तेच [पाणि ] स्वाती नक्षत्राच्या पावसात समुद्रात दोन शिम्पल्यांमध्ये पोचले तर त्याचं सुंदर मोती तयार होतो. सामान्यतः उत्कृष्ट , मध्यम आणि हीन अशा अवस्था सहवासामुळे लाभत असतात.

सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||

अर्थ : खरं बोलण हे चांगलं असतं. सत्यपेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे. ज्यामुळे प्राणीमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.

यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||

अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे?

स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||

अर्थ : संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा [सुस्वभाव] कधीहि सोडत नाही. कापाराला अग्नीचा स्पर्श झाला [जळून नाहीसा होण्याची वेळ आली तर उलट] तरी तो अधिकच सुगंधित होतो.

पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ : सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.

तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः |
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ||

अर्थ : गवतापेक्षाही कापूस हलका असतो, कापसापेक्षा याचक क्षुद्र असतो. [मग प्रश्न असा पडतो की] वाऱ्याने त्याला उडवले कसे नाही? तर माझ्याजवळ काहीतरी मागेल म्हणून.

पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ : सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.

साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ : ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |

तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ : ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||

अर्थ : झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कलं परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही. असा कोण ते ओळखा? (प्रहेलिका)

अस्ति ग्रीवा शिरो नास्ति द्वौ भुजौ करवर्जितौ |

सीताहरणसामर्थ्यो न रामो न च रावणः ||

अर्थ :गळा आहे पण डोक नाही. पंज्याशिवाय दोन हात आहेत आणि त्याला सीतापहरण करण्याचं बळ आहे. पण तो राम नाही आणि रावण पण नाही.(प्रहेलिका)

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः |

अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः ||

अर्थ :[प्रहेलिका म्हणजे कोडं या प्रकारचा हा श्लोक आहे ]

पाय नसून दूरदूर जातो. साक्षर असला तरी विद्वान नाही. त्याला तोंड तर नाहीच. पण सर्व गोष्टी सविस्तर सांगतो. जो ओळखेल तो ज्ञानी आहे.

कौर्मं संकोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् |

प्राप्ते काले च मतिमानुत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ||

अर्थ :[कठीण प्रसंगात] कासावाप्रमाणे पाठीचे कातडे घट्ट करून दणके सुद्धा खावे. पण योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढावा.

शिरसा विधृता नित्यं तथा स्नेहेन पालिताः |

केशा अपि विरज्यन्ते निःस्नेहा किं न सेवकाः ||

अर्थ :नेहमी डोक्यावर घेतलेले, [मानाने] दिलेले, स्नेहाने [तेल लावून किंवा प्रेमाने] सांभाळले, तरी सुद्धा केस देखील विरक्त [ प्रेमरहित किंवा काळा रंग जाऊन पांढरे] होतात. तर स्नेह [प्रेम] न दिलं तर नोकर वैतागतील यात काय संशय?

उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति चोदिताः |

अनुक्तमप्यूहति पण्डितो जनः परेङ्गितज्ञानफला हि बुद्धयः ||

अर्थ :[बुद्धिहीन] पशुसुद्धा सांगितल्यावर [मालकाच्या मनातील गोष्ट] समजतात. चाबूक मारल्यावर घोडे, हत्ती सुद्धा ओझे वाहून नेतात. पण विद्वान लोक सांगितल्याशिवाय [दुसऱ्याच्या मनातील गोष्ट] ओळखतात. [कुशाग्र] बुद्धीला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखण्याची कला असते.

तृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः |

समुच्छ्रितानेव तरून्स बाधते महान्महत्स्वेव करोति विक्रमम् ||

अर्थ :सोसाट्याचा वारा सर्व बाजूनी वाकलेल्या मउ [लेच्यापेच्या] गवताला उपटत नाही, तर तो उंच वाढलेल्या झाडांना पाडतो. थोर माणसे थोरांशीच स्पर्धा [शौर्य] दाखवतात.

परिचरितव्याः सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |

यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||

अर्थ :जरी सज्जनांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी त्यांची सेवा करावी. कारण ते सहजच ज्या गप्पा मारतात ते सुद्धा शास्त्रीय वचनच असत.

इक्षोरग्रात्क्रमशः पर्वणि पर्वणि यथारसविशेषः |

तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां च विपरीता ||

अर्थ :उसाच्या टोकाच्या कांडापासून जसजस पुढे जावं तसा तो अधिकाधिक [मधुर] रसाचा लागतो. त्याप्रमाणे सज्जनाशी मैत्री केली असता अधिकाधिक मधुर बनतं जाते आणि उलट लोकांची [दुष्टांची अधिकाधिक] त्रासदायक बनत जाते.

परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |

इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||

अर्थ :दुसऱ्यांनी ज्याचे गुण गाईले असतील तो जरी गुणी नसला तरी गुणी [मानला] जाईल. पण स्वतःच्या तोंडाने स्वतःच गुणवर्णन केलं तर इंद्राला सुद्धा कमीपणा येतो.

सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |
अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||

अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. [त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं] कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो.

एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता |
बुद्धिर्बुद्धिमता युक्ता हन्ति राज्यं सनायकम् ||

अर्थ : धनुष्य धारण करणाऱ्याने बाण सोडला तर तो एकच माणसाला मारेल किंवा [एखादे वेळी नेम चुकल्यास] मारणार पण नाही. परंतु बुद्धिमान माणसाने डोक्याने काम केले तर राजा सकट राज्याचा तो नाश करू शकतो.

राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः |
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ||

अर्थ : राजा [प्रशासक] जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल तर जनता दुराचारी होते. जर तो [सर्वाशी] सारखा वागत असेल तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजा प्रमाणेच वागतात.

बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |
न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||

अर्थ : भूकेलेल्यांची भूक व्याकरण खाऊन भागत नाही. तहानलेले काव्य परीक्षण पिऊ शकत नाहीत. वेदांच्या [ज्ञानाने] कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावेत, गुण वाया जातात.

व्रजत्यधः प्रयात्युच्चैर्नरः स्वैरेव चेष्टितैः |
अधः कूपस्य खनिता ऊर्ध्वं प्रासादकारकः ||

अर्थ : माणसाची स्वतःच्या कृत्यांमुळेच प्रगती किंवा अधोगती होते. विहीर खणणारा खाली खाली जातो आणि हवेली बांधणारा वर वर जातो.

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |
दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||

अर्थ : सिंहाप्रमाणे असणाऱ्या कामसू माणसाकडे लक्ष्मी [आपणहून] येते. मात्र घाबरट लोक नशीब महत्वाचे आहे असे म्हणतात. नशिबाचा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न कर आणि प्रयत्न करूनही जर [ध्येय] गाठता आलं नाही तर त्यात [तुझा] काय दोष आहे?

सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||

अर्थ : [चांगले] सोनार सोन्याची कमळे बनवू शकतात. पण त्यात सुगंध मात्र फक्त चतुर असा ब्रह्मदेवच निर्माण करू शकतो. [निसर्गा इतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही]

लुब्धानां याचकः शत्रुश्चोराणां चन्द्रमा रिपुः |
जारस्त्रीणां पतिः शत्रुर्मूखाणां बोधको रिपुः ||

अर्थ : [काहीतरी] मागणारा हा हावरटांचा शत्रु असतो. चन्द्र हा चोरांचा शत्रु आहे. वाईट चालीच्या स्त्रियांचा पति हा शत्रु असतो आणि [चांगले] शिकवणारा हा मूर्खांना शत्रु वाटतो.

अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे |
पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते ||

अर्थ : दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. [लोखंड गरम करतात तेंव्हा] पावकाला [पवित्र अशा अग्नीला सुद्धा] लोखंडाच्या सहवासामुळे मोगरीचे [घण] तडाखे खावे लागतात.

ही आहेत काही, संस्कृत सुभाषित मराठी अर्थ! अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कंमेंट करुन नक्की सांगा.


 

Read More...

संस्कृत श्लोक -सुबह की शुभकामनायें

Sanskrit quotes संस्कृत सुभाषिते – मराठी अर्थासह

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Moonfires

राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं।Founder Of Moonfires.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker