अयोध्या राममंदिर पूर्ण बनले नसताना सुद्धा त्याच्यामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्याची एवढी घाई बीजेपी करत आहे असे आपल्याला वाटते का? बीजेपीला एवढी घाई का असावी? काही शंकराचार्यांनी ह्याच्याशी सहमत नाही आहेत म्हणून का?
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण होऊन निवडणुकीत फायदा होणार होण्याच्या दृष्टीने भाजप प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची घाई करत आहे असे वाटल्यास ते अपेक्षितच आहे! पण यात काही मुद्दे आहेत ते सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
१. २०१९ मध्ये अयोध्या राममंदिराला विरोध करणाऱ्या बाजूचे वकील कपिल सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयाला खास विनंती केली होती की निवडणुकीपूर्वी निकाल जाहीर करण्यात येऊ नये अन्यथा त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो आणि विशेष म्हणजे राम मंदिर न्यासाकडून (म्हणजेच एकप्रकारे भाजप सरकारकडून) त्याला मान्यता देण्यात आली होती, म्हणून निकाल निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मग २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही हवा भाजपच्याच बाजूने असताना भाजपला घाई करण्याची काहीही गरज नाही.
२. अयोध्या राममंदीराबाबत निर्णय घेण्यासाठी एका न्यासाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्व निर्णय हे त्या न्यासामार्फत केले जात आहेत. म्हणजेच भाजप काय आणि खास करून नरेंद्र मोदी काय, हे मुहूर्त काढण्यासाठी पंचांगात (तिथी, वार, नक्षत्र, योग, करण) नक्कीच बदल करू शकत नाहीत. या शास्त्रातील विद्वान पंडितच निर्णय घेऊ शकतात. आता निर्णय भाजपसरकारच्या काळात घेतला आहे म्हणजे काहीतरी वादंग तर निर्माण केलाच पाहिजे ना.
३. शास्त्रोक्त पद्धतीने एखादे मंदिर बांधत असताना त्यात अनेक टप्पे असतात, जसे पायाभरणी वेगळी, गाभाऱ्याच्या उंबऱ्याची पूजा वेगळी, प्राणप्रतिष्ठा वेगळी, कलशपूजन वेगळे, वगैरे वगैरे. आता शास्त्रानुसार बांधण्यात आलेल्या मंदिराच्या समोर सभामंडप वगैरे समाविष्ट असले तरीही मुख्य मंदिराच्या गाभ्याचे काम जर पूर्ण झाले असले तर प्राणप्रतिष्ठा करता येते … म्हणजेच मुख्य कळस वगळता अन्य वास्तूतील मेघडंबरीचे काम जरी अपूर्ण असेल तरीही प्राणप्रतिष्ठा करायला हरकत नसते. तसेच मंदिराचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने जे काही बांधकाम केले जाते ते काम मुख्य मंदिराचा भाग होत नाही.
४. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी जेव्हा भूमिपूजन झाले होते तेव्हाही काढलेला मुहूर्तच चुकीचा आहे असा वाद निर्माण झाला होता. वाद निर्माण झाला होता म्हणण्यापेक्षा ज्याचा राममंदिराला विरोध आहे त्यांनी मुद्दाम उकरून काढला होता. ज्याचे समर्पक उत्तर शास्त्रीय भाषेत गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी लेखी स्वरुपात दिले होते आणि सर्वसामान्य लोकांसाठी मुहूर्त कसा निश्चित केला आहे या बाबत एक व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला होता. (आता जे लोक गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा अधिकार जाणतात त्यांना तरी शंका येऊ नये) .
आता अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर पुरीच्या शंकराचार्य यांनी काही भाष्य केल्याचे सांगितले जात आहे, पण सामान्यतः असे निर्णय हे तोंडी स्वरुपात नव्हे तर लेखी स्वरुपात जतन करून ठेवले जातात. तेव्हा पुरीच्या शंकराचार्य यांनी दिलेला लेखी निर्णय लोकांसमोर आणावा आणि त्याची व्हिडिओ क्लिप असेल तर ती सुद्धा प्रसिद्ध करावी म्हणजे शंकाच राहणार नाही. निदान माझ्या तरी वाचनात असे लेखी स्वरुपात दिल्याचे किंवा व्हिडिओ स्वरुपात दाखवल्याचे माहितीत आलेले नाहीत.
५. मुळात ज्या लोकांसाठी राम असे कोणतेही अस्तित्वच होऊन गेलेले नाही तर ते रामायण या महाकाव्यातील केवळ एक काल्पनिक पात्र आहे. ज्या लोकांचा या मंदिराला कायम विरोध होता म्हणूनच अनेक दशके हा खटला सडत ठेवला होता, ज्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचेही त्यांना ही नसती उठाठेव करण्याची गरजच नाही. मग मुहूर्त पंचांगशुद्धी असलेल्या एखाद्या शुभदिनी असो वा अगदी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी असो! त्यामुळे फक्त उद्देश हे राजकारण आहे. बसं.
६. यातूनही जर काही संदेह असेल शृंगेरीपिठाच्या शंकराचार्यांचे किंवा त्यांनी नेमलेल्या अधिकारी व्यक्तीचा विचार नक्कीच घेता येतो, कारण जर चार पिठांच्या शंकराचार्यांचे एकमत झाले नाही तर शृंगेरीपिठाच्या शंकराचार्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल असा प्रघात आहे, आद्य शंकराचार्य यांनी जी चार पीठे स्थापन केली आहेत त्यातील शृंगेरीपीठ हे सर्वात जुने आणि पहिले पीठ आहे.
आर्टिकल लेखक : Suraj Melkunde
The short URL of the present article is: https://moonfires.com/z35f