दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा केल्यानंतर, कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा म्हणून साजरी केली जाते. हा सण विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रीयन लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सोन्याची खरेदी, विवाहित महिलांकडून पतीची आरती, व्यावसायिकांसाठी वर्षाची सुरुवात अशा अनेक बाबींनी या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. ही सर्व कामे दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी केली जातात.
पाडव्याला बळीची मूर्ती पाच रंगांची रांगोळी बनवून पूजा केली जाते. महाराष्ट्रीय लोक या दिवशी मराठीत ‘इडा, पेडा तळो आणि बळीचे राज्य येवो’ म्हणत प्रार्थना करतात. फटाके देखील सोडले जातात आणि दिव्यांचा उत्सव देखील असतो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे तीन शुभ तिथींपैकी एक मानली जाते.
आपल्या कृषी संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व प्राप्त झालेले महाराष्ट्रातील सर्व सण हे प्रामुख्याने याच स्वरूपावर आधारित आहेत. कार्तिक महिन्याची सुरुवात अत्यंत महत्त्वाची मानली जाते, जी त्याचे पौराणिक महत्त्व आणि कृषी संस्कृती दर्शवते.
दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) कधी आहे?
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झाले की, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो.
दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.
दिवाळी पाडव्याचे महत्व काय?
दिवाळी पाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे खास महत्व आहे. या दिवशी सोने खरेदी आवर्जून केली जाते. त्यासोबतच, नवीन वाहनाची देखील खरेदी केली जाते.
पाडव्याला सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. शिवाय, या दिवशी व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या, पेन इत्यादी अनेक वस्तूंची पूजा करतात.
बलिप्रतिपदा पूजा
दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला ही खास महत्व आहे. बलिप्रतिपदेतील बळी राजाची आजच्या दिवशी खास पूजा केली जाते. हा बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता. विष्णूच्या वामन अवताराने या बळी राजाकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते.
पंरतु, हा बळी राजा उदार होता. तो जनतेची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे, आजच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आज ही भावाला ओवाळताना महिला आवर्जून म्हणतात की, ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’.