मराठी रंगभूमीला शतकानुशतके जुना इतिहास आहे. मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदलासाठी यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो.
विष्णूदास भावे यांनी मराठी नाट्यपंढरीचा पाया घातला. सांगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर 1843 येथे रोजी मराठीतील पहिल्या गद्य पदमिश्रित नाटकाचा प्रयोग रंगला. हा प्रयोगच नाट्यसृष्टीचा पाया ठरला. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर ‘सीता स्वयंवर‘ हे मराठी भाषेतील पहिले नाटक पार पडले. हीच आठवण कायम ठेऊन पुढे या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला.
१९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते.
याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता.
आपला मराठी रंगभूमी दिन हा बहुआयामी कलाप्रकार घडवणाऱ्या सर्व घटकांना समर्पीत आहे. ज्यांचा या दिवशी सन्मान केला जातो. मराठी रंगभूमीचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यातील वैविध्य. जे प्रायोगिक, पारंपारिक आणि लोकनाट्य प्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.
गर्वाचा असा हा एक दिवस आहे, जेव्हा या सर्व वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती एकत्र येतात, विविधतेतील एकतेला बळकटी देतात. आजवर मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात हातांचे, समर्पणांचे स्मरण या दिवशी केले जाते.
नाविन्य आणि रंगभूमी
मराठी नाट्य स्वरूपाला खोलवर रुजलेली परंपरा असली, तरी ती समकालीन संकल्पना आणि कथाकथन तंत्रांशी जुळवून घेत आहे. नवीन काळातील नाटककार आणि दिग्दर्शक कलेच्या सीमा ओलांडून अज्ञात प्रतिभेचा शोध घेत आहेत. म्हणूनच पाठिमागील काही वर्षांमध्ये मराठी नाटकांची पताका सातासमुद्रापार पोहोचली आहे.
दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाता आहेत.
शेकडो वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा येत्या काळात आणखीनच वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा आणि सर्व रंगकर्मींना शुभेच्छा.