श्री खंडेरायाची / खंडोबाची आरती

Team Moonfires
3 Min Read
खंडोबाची आरती
खंडोबाची आरती

महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांपासून तो धनगर रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे, तसेच खालील खंडोबाची आरती सर्वत्र प्रसिद्ध आहेच. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्यम्  ह्या संस्कृत ग्रंथात आहे.

श्री खंडेरायाची / खंडोबाची आरती
श्री खंडेरायाची / खंडोबाची आरती

खंडोबाची आरती

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥
जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥

नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥
मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥


श्री खंडेरायाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

चंपाषष्ठी

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात. प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखाळणी हा विधी झालेनंतर उत्सवमुर्तीना नवीन पोशाख परिधान करून बालद्वारी येथे घटस्थापना होते. श्री मल्हारी मार्तंड आणि मणी – मल्ल दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले ते षडरात्र म्हणून साजरे केले जातात.

सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शु. षष्ठी शनिवारी शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाषष्ठीचा दिवस ! या उत्सवावेळी समस्त पुजारी – सेवेकरी वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई व दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम , महाप्रसादाचे आयोजन केले जाते. राज्यातील विविध भाविकांकडून मुख्य मंदिर, गाभारा पानाफुलांनी सजविण्यात येतो. त्यामुळे मार्तंड भैरवाची विविध रूपे भाविकांना पहावयास मिळतात.


जेजुरीचा खंडोबा


The short URL of the present article is: https://moonfires.com/4ee5
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *