हिंदू क्षात्रधर्माचा विध्वंस
भारताचा इतिहास हा केवळ गुलामगिरीचा इतिहास नाही, तर तो प्रखर प्रतिकाराचा आणि अजेय क्षात्रतेजाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटीश राजवटीने भारतीयांवर, विशेषतः हिंदू समाजावर जो सर्वात मोठा आघात केला, तो म्हणजे त्यांचे ‘शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण’. ब्रिटिशांनी केवळ आपली संपत्ती लुटली नाही, तर हिंदूंच्या नसानसांत भिनलेली लढाऊ वृत्ती आणि हजारो वर्षांची ‘क्षात्रधर्म’ परंपरा खंडित केली.
हे एक सुनियोजित आणि दीर्घकालीन षड्यंत्र होते. मराठा आणि नागा साधूंचा ज्वलंत प्रतिकार: ब्रिटिशांना ‘शस्त्रबंदी’ आणि ‘शिक्षण पद्धती’ बदलण्याची गरज का भासली याचे मूळ कारण भारताच्या इतिहासात दडलेले आहे.
१८५७ च्या पूर्वी आणि अगदी १८१८ पर्यंत भारताच्या विस्तीर्ण भूभागावर मराठ्यांचे भगवे निशान दिमाखात फडकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या रोपट्याचा वटवृक्ष होऊन, मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. मुघल आणि इतर इस्लामिक आक्रमकांशी पिढ्यानपिढ्या निकराचा लढा देऊन मराठ्यांनी केवळ हिंदू धर्मच टिकवला नाही, तर भारताची राजकीय सत्ताही आपल्या हाती ठेवली होती.
१८१८ पर्यंत ब्रिटिशांना मराठ्यांशी तीन भीषण युद्धे लढावी लागली. ‘निकराचा लढा’ देणे म्हणजे काय, हे मराठ्यांनी ब्रिटिशांना रणांगणात दाखवून दिले होते. तसेच, आदीशंकराचार्यांनी धर्माच्या रक्षणासाठी स्थापन केलेला ‘नागा साधू’ संप्रदाय हा केवळ भक्तीचा मार्ग नव्हता, तर ती एक सशस्त्र फौज होती. अंगावर वस्त्र नसले तरी हातात शस्त्र धरून धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या नागा साधूंनी ब्रिटिशांच्या आधुनिक सैन्याला कडवा प्रतिकार केला. ‘संन्यासी विद्रोहा’त हे साधू शेवटच्या श्वासापर्यंत लढले. ब्रिटिशांना हे कळून चुकले होते की, जोपर्यंत या समाजाच्या हातात शस्त्र आणि मनात धर्माचा अभिमान आहे, तोपर्यंत भारतात आपली सत्ता सुरक्षित राहू शकत नाही.
१८३५: बौद्धिक क्षात्रतेचा नाश
या भीतीपोटी ब्रिटिशांनी पहिली चाल खेळली ती शिक्षणाच्या माध्यमातून. १८३५ मध्ये लॉर्ड मॅकॉलेने आपली कुप्रसिद्ध शिक्षण पद्धती लागू केली. प्राचीन गुरुकुल पद्धतीत केवळ वेद शिकवले जात नसत, तर ‘धनुर्वेद’ (शस्त्रकला) आणि ‘युद्धनीती’ हे शिक्षणाचे अविभाज्य भाग होते. ‘शास्त्र’ आणि ‘शस्त्र’ यांचा संगम म्हणजे हिंदू संस्कृती होती. मॅकॉलेने संस्कृतला ‘मृत भाषा’ आणि भारतीय साहित्याला ‘मागासलेले’ ठरवून शिक्षणातून हद्दपार केले. ब्रिटिशांना ‘योद्धे’ नको होते, तर साम्राज्याची चाकरी करणारे ‘कारकून’ हवे होते. त्यांनी शिक्षणातून शौर्यगाथा, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचे धडे वगळले. त्याऐवजी ‘अहिंसा’ आणि ‘क्षमाशीलता’ यांचा सोयीस्कर आणि चुकीचा अर्थ (जसे की, एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणे) शिकवला गेला. यामुळे सुशिक्षित हिंदू तरुणांच्या मनातून अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना नष्ट झाली आणि बौद्धिक गुलामगिरीचा पाया रचला गेला.
१८७८: भौतिक खच्चीकरण
बौद्धिक हल्ल्यासोबतच ब्रिटिशांनी १८७८ मध्ये ‘शस्त्रबंदी कायदा’ (Indian Arms Act) लागू करून हिंदूंच्या क्षात्रतेजावर सर्वात मोठा कायदेशीर आघात केला. ज्या संस्कृतीमध्ये विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची प्रथा होती आणि जिथे आत्मरक्षणासाठी शस्त्र बाळगणे हा धर्माचा भाग मानला जात असे, तिथे शस्त्र बाळगणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला. ब्रिटिशांनी घराघरातून तलवारी, भाले आणि पारंपारिक शस्त्रे जप्त केली आणि ती वितळवली. केरळमधील ‘कलारीपयट्टू’ असो वा महाराष्ट्रातील आखाडे, या सर्वांवर अघोषित बंदी घालण्यात आली. आखाडे हे प्रतिकाराची केंद्रे होती, हे ओळखून ती उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे केवळ लोखंडाचा नाश झाला नाही, तर त्यासोबत पिढ्यानपिढ्या चालत आलेले शस्त्रास्त्र बनवण्याचे ज्ञान आणि युद्धकौशल्यही लुप्त झाले. ब्रिटिशांनी हिंदू समाजाला पद्धतशीरपणे ‘नि:शस्त्र’ केले.
चरखा आणि स्वातंत्र्य
इतिहासाची फसवणूक दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही या षड्यंत्राचा प्रभाव कायम राहिला. भारतीयांच्या मनावर हे बिंबवले गेले की, “केवळ गांधीजींच्या अहिंसेमुळे आणि चरख्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.” वासुदेव बळवंत फडके, सावरकर, भगतसिंग, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचा सशस्त्र लढा जाणीवपूर्वक विस्मरणात ढकलला गेला. वास्तविक पाहता, अमेरिकेचा इतिहास याच्या अगदी विरुद्ध आहे.
अमेरिकेला स्वातंत्र्य कोणाही ‘महात्म्या’च्या उपोषणामुळे मिळाले नाही, तर ते जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखालील सशस्त्र लढ्यामुळे मिळाले. अमेरिकेच्या संस्थापकांना याची पूर्ण जाणीव होती की, स्वातंत्र्य शस्त्रांमुळेच मिळाले आहे आणि ते टिकवायचे असेल, तर भविष्यातही जनतेच्या हातात शस्त्र असणे आवश्यक आहे.
राज्यघटनेचा विरोधाभास: लोकशाही की असुरक्षितता?
येथेच भारतीय आणि अमेरिकन राज्यघटनेतील मूलभूत फरक स्पष्ट होतो. अमेरिकन राज्यघटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये (2nd Amendment) “Right to bear arms shall not be infringed” (शस्त्र बाळगण्याचा अधिकार अबाधित राहील) हा नागरिकांचा मूलभूत अधिकार मानला गेला आहे. अमेरिकन राज्यकर्त्यांचे स्पष्ट मत होते की, जर उद्या सरकारच हुकूमशहा बनले, तर जनतेकडे त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य असावे.
याउलट, स्वतंत्र भारताने ब्रिटिशांचा तोच १८७८ चा काळा कायदा थोड्याफार फरकाने पुढे चालू ठेवला. भारतीय संविधानात आणि कायद्यात “सरकारच्या परवानगीशिवाय कोणालाही शस्त्र बाळगता येणार नाही” हे तत्त्व आजही लागू आहे. याचा अर्थ, आपल्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे सरकारवर सोपवण्यात आली आहे. परंतु, भारताने आणीबाणीचा काळ पाहिला आहे. जर सरकारच भक्षक बनले, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? सरकार जर नागरिकांना स्वयंसंरक्षणाचा मूलभूत अधिकार देण्याऐवढा विश्वास ठेवत नसेल तर नागरिकांनी तरी सरकारवर का विश्वास ठेवायचा? अमेरिकन नागरिक अन्यायाविरुद्ध लढण्यास सक्षम आहे, पण भारतीय नागरिक कायद्याने नि:शस्त्र आणि हतबल आहे. जोपर्यंत हिंदू समाज आणि भारतीय नागरिक स्वसंरक्षणासाठी पूर्णपणे सरकारवर अवलंबून राहील, आणि जोपर्यंत लुप्त झालेला क्षात्रधर्म पुन्हा जागृत केला जात नाही, तोपर्यंत ‘रामराज्य’ आणि खरी ‘सुरक्षितता’ ही केवळ एक स्वप्नच राहील.

