आस्था - धर्मउत्सवमराठी ब्लॉग

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर! त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव.

गोंदवलेकर महाराज यांचे कुटुंब

श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ति आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती. अशा या सात्त्विक कुटुंबात रावजी आणि सौ . गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स.१९ फेब्रुवारी १८४५) या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्रीमहाराजांचा जन्म झाला. बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले. भगवद्भजनाची अतोनात आवड, एकपाठीपणा, तसेच अन्नदानाचे अतीव प्रेम आणि दीनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले.

पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. अध्यात्माची ओढ वाढतच होती, आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह गणूने गुरुशोधार्थ घरातून पलायन केले . पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला. अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला.

गोंदवलेकर महाराज
गोंदवलेकर महाराज

गुरु शोध

इकडे गुरुभेटीची तळमळ वाढतच होती. त्यांच्या ठिकाणी जन्मत:च अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती. व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. व अखेर, वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन महाराज एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले, आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरु केले.

गोदातीरी श्रीसमर्थसंप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळेगांवच्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे त्यांनी अविरत, अविश्रांत गुरुसेवा केली. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले. मनासारखा सद्गुरु भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली.

श्री तुकामाईंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून ९ वर्षांनी गोंदवल्यास घरी परतले. नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेराहून घेऊन आले. पुढे तिच्यासह पुन: गुरुदर्शनास गेले, आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली. पुढील काळात श्रीमहाराजांनी श्रीरामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थमार्ग दाखविण्याचे कार्य अधिकच जोराने केले. सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव, यांवर त्यांचा विशेष भर होता. सन १८९० पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले.

कार्य

त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम, सीता व लक्ष्मण, तसेच मारुती, यांची स्थापना केली. पुढे, भक्तमंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राममंदिर, एक दत्तमंदिर व एक धर्मशाळा' बांधून निवासाची सोय वाढवली. पुढे एक शनिमंदिरही बांधले. शिवाय, जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राममंदिरांची स्थापना केली.

ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्रीमहाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही. देहबुद्धी मूळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात आणि उच्चारात चुकून देखिल मी पणा व माझेपणा दिसायचा नाही, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय. अर्थात स्वत:बद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती.

महासमाधि

प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र! प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा सोसावा लागला. तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेतोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देवून असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला.

सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता ‘जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.’ हे शेवटचे शब्द उच्चारून, या महापुरुषाने आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पहात असताना गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला.

 

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker