येथे काही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग दिले आहेत. यां व्यतिरिक्त त्यांनी ४,००० हून अधिक अभंग रचले आहेत.
तुकाराम महाराजांचे अभंग हे मराठी भाषेतील अत्यंत मौल्यवान साहित्य आहे. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, समाजसुधारणा, नीतिशास्त्र, आणि तत्त्वज्ञान यांचा मिलाफ आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आजही महाराष्ट्रातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते लोकांना प्रेरणा देतात आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मार्गदर्शन करतात.
तुकाराम महाराजांचे निवडक मानवी विचाराच्या विविध स्तरावरून जीवनामध्ये निर्माण झालेल्या आणि होणाऱ्या विविध समस्याची चपखल आणि समाधानपूर्वक उकल करून मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा तो एक सुखसंवाद आहे.
मोकळे मन रसाळ वाणी | याची गुणीसंपन्न ||१||
लक्ष्मी ते ऐशा नावे | भाग्य ज्यावे नरी त्यांनी ||२||
नमन ते नम्रता अंगी | नेघे रंगी पालट ||३||
तुका म्हणे त्यांची नावे | घेता व्हावे संतोषी ||
तुकोबा सांगतात की मोकळे मन व रसाळ वाणी हे सर्वसंपण व्यतिमत्त्वाचे लक्षण आहेत व त्यालाच लक्ष्मी मिळते, इथे तुकोबांना लक्ष्मी म्हणजे यश मिळते असा भावार्थ सांगायचा आहे.
चित्त समाधाने | तरी विष वाटे सोनें ||१||
बहू खोटा अतिशय | जाणा भले सांगो काय ||२||
मनाच्या तळमळें | चंदनेही अंग पोळे ||३||
तुका म्हणे दुजा | उपचारे पीडा पूजा ||४||
शरीराचे विकार हे औषधांनी दुरुस्त करता येतात, परंतु मनाचे विकार हे अतिशय घातक असतात व त्यावर औषध उपलब्ध नाही, अश्या मनाच्या विकरांनविषयी तुकोबांनी वेळोवेळी आपल्या अभंगातून ज्ञान प्रबोधन केले आहे. जर चित्त संतुष्ट नसेल तर सोनेसुद्धा विषाप्रमाणे घातक वाटते. “आणखी हवे आणखी हवे” ही वृत्ती शेवटाला “अती तेथे माती” चाच अनुभव प्रत्ययास आणते. एरवी शीतलता प्रदान करणार चंदनाचा लेप असंतुष्ट मनाला पोळण्याचा अनुभव देतो, म्हणूनच समाधानी चित्त महत्त्वाचे आहे.
वृक्षवल्ली आंम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळविती।।१||
येणे सुखे रुचे एकांताचा वास | नाही गुणदोष अंगी येत।।२||
आकाश मंडप मृथिवी आसन | रमे तेथें मन क्रीडा करू ||३||
कथा कमंडलू देह उपचारा | जाणिवतों वारा अवसरू ||४||
पर्यावरण रक्षणाचे घोष वाक्य बनलेली या अभंगाची पहिली ओळ खरंच किती खोल भावार्थ सांगते. धावपळीच्या युगात सतत व्यस्थ असणाऱ्या मानवाला एकांताची व काही काळ तरी निसर्गाच्या सानिध्यात शांत घालवण्याची गरज दर्शवते विस्तरीत मंडपा प्रमाणे असलेले आकाश व बसण्याचे आसन असणारी पृथ्वी किती महत्त्वाचे आहे हे अगदी सरळ सोप्या शब्दा मध्ये तुकोबांनी मांडले आहे.
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
भगवंताचा विसर आपल्याला होउ नये एवढचं त्यांचं मागणं आहे आणि हे साध्य करण्यासाठी ‘संतसंगती’ द्यावी म्हणून ते देवाला विनवीत आहेत’
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे ॥ध्रु॥
मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥१॥
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां॥२॥
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं ॥५॥
तुकाराम महाराज सांगताहेत आपणहून आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही पण जर का विनाकारण कोणी आमची खोडी काढू पहाल तर मग तुमची काही धडगत नाही हे नीट ध्यानात ठेवा.