पवार साहेबांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का, या मुद्द्याची चर्चा करण्यापूर्वी त्या काळचे नाशिकराव तिरपुडे नावाच्या काँग्रेसविरांचे व्यक्तिमत्व तपासणे आवश्यक आहे. तेव्हा नाशिकरावांचे थेट दिल्लीशी म्हणजे गांधी घराण्याची संबंध असल्यामुळे ते महाराष्ट्र #काँग्रेस मधील सर्वानाच फाट्यावर मारायचे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्री वसंतदादानाही जुमानयचे नाहीत. त्यांच्या मुजोरीमुळेच तेव्हा इथली काँग्रेस खदखदत होती.
पार्श्वभूमी
पवार साहेबांच्या बंडाने वाट मोकळी करून दिली होती. त्या बंडाला त्यावेळी म. टा. चे संपादक गोविंद तळवळकर व माधव गडकरी यांच्यासारख्या पत्रकारांनीही इंधन पुरवले होते. त्या काळातला एक अत्यंत गमतीदार व बोलका किस्सा मला आठवतो. महाराष्ट्राची 1985 ची विधानसभा निवडणूक प्रचंड गाजली होती. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री #वसंतदादा होते. तर त्यांच्या विरोधात पुरोगामी लोकशाही दलामार्फत #शरद_पवार साहेबांनी खूप कडवे आव्हान उभे केले होते.
त्या निवडणुकीपूर्वी दीड- दोन वर्षे तर पवार साहेबांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या दरम्यान दादा उघडपणे बोलायचे की, “शरदराव महाराष्ट्रभर अक्षरशः पायाला पाने बांधून हिंडतायेत.”
पवारांच्या समाजवादी काँग्रेस सोबतच जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट असे सगळे एक झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण इतके ढवळून निघाले होते की, निवडणुकीचा नेमका निकाल काय लागतोय याची सर्वत्र प्रचंड उत्सुकता होती. मतमोजणी दिवशी तर दादांनी मंत्रालयात न जाता वर्षा निवासस्थानी बसूनच निकाल ऐकावेत असे त्यांच्या निकटवर्तीनी दादांना सुचवले होते. पण मैदानातून मागे न हटण्याची दादांची वृत्ती. त्यामुळे निकाला दिवशी स्वच्छ पांढरे कळीदार धोतर व सदरा घालून दादा नेहमीपेक्षा आधीच मंत्रालयात सहाव्या मजल्यावर दाखल झाले होते.
तेव्हा मंत्रालयामध्ये जाण्यासाठी पासाची गरज नसायची. एखाद्या मंदिरासारखे मंत्रालय सर्वांना एक मुक्तद्वार असायचे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले. पण सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि पुलोदमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. कधी हे पुढे तर ते मागे अशी दिवसभर आकड्यांची शर्यत सुरू होती. तेव्हा विशेषतः महाराष्ट्रातील मध्यमवर्गीयांमध्ये पवार साहेबांची इमेज ही एखाद्या हिरो पेक्षा अधिक उंच व जबरदस्त होती.
निकाल
प्रसारित निकालाच्या आकड्या मधून पुलोद जेव्हा काँग्रेसला घाम फोडू लागली. तेव्हा मंत्रालयात मोठे आश्चर्य घडले. मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या मजल्यावर बाहेरच्या बाल्कनीत येऊन उघडपणे “शरद पवार जिंदाबाद”, “शरद पवार जिंदाबाद” अशा घोषणा देऊ लागले. त्यामुळे तर वातावरण अधिकच गरम झाले. पण दादांचा अनुभव, आवाका आणि सहनशीलतेची ताकद प्रचंड होती. त्यामुळे मंत्रालइयीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एखादी ॲक्शन घ्यावी वगैरे असे कोणतेच पोरकट पाऊल त्यांनी टाकले नाही. ते निमुटपणे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दालनात बसून होते.
त्यादिवशी त्यांच्यासोबत दिवसभर नाशिकचे विनायकदादा पाटील गंभीरपणे हजर होते. सायंकाळचे सात वाजले. दोन्ही गटांमध्ये तोवर 60 ते 65 आमदारांचे जे बलाबल होते, त्यामध्ये अंतर पडत गेले. काँग्रेसचा रथ वेगाने विजयाकडे दवडू लागला. या निवडणुकीत काँग्रेसला 161 तर पवारांच्या समाजवादी काँग्रेसला 54 व पुलोदला एकूण 104 जागावर समाधान मानावे लागले.
कांदाभजी
सायंकाळच्या त्या विजयी वाऱ्यात वसंतदादा विनायकराव पाटलांना म्हणाले “चल विनायक, आता आपण कांदाभजी खाऊया.” दादांचे सहाय्यक मंत्रालय कॅन्टीनकडे जाण्याची धावाधाव करू लागले. तेव्हा दादांनी सर्वांना मला मोकळ्या हवेत खुशीने कांदाभजी खायची आहेत असे सांगून टाकले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा मंत्रालयातून मॅजेस्टिक आमदार निवासाच्या आजूबाजूला आला. तिथेच फुटपाथवर काही खुर्च्या टाकल्या गेल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजूने उभे होते. पण दादा नावाचा मातीतला मराठमोळा माणूस मोठ्या आनंदाने फुटपाथवर बसून आपल्या आवडत्या कांदा भज्यांचा आस्वाद घेत होता.
त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांची कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. त्या दरम्यान दादा मंत्रालयासमोरच्या बैठ्या बंगल्यात B 4 मध्ये राहत असत. पुढे पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये आले. तेव्हा रामकृष्ण मोरेंसह मदन बाफना, वल्लभ बेनके असे अनेकजण दादांना भेटायचे. पक्षातील दादांच्या वारसदारा बद्दल चर्चा व्हायच्या. परंतु दादांचे मन इतके विशाल होते की, त्यांच्या मनातली पवार साहेबांच्या बद्दलची कटूता केव्हाच कमी झाली होती. “काँग्रेसचे भावी नेतृत्व शरदरावच करू शकतात” असे दादा आपल्या सहकाऱ्यांना उघड सांगायचे.
दादांच्याच मंत्रिमंडळात पहिल्यांदा शिवाजीराव देशमुख व #विलासराव_देशमुख हे दोघेही एकावेळी गृहराज्यमंत्री झाले होते. असे अनेक पाणीदार नेते दादांनी घडविले. दुर्दैवाने दादा घराण्याचे छुपे व कातिल दुश्मन हे सांगली जिल्ह्यातीलच असून ते दादासाहेबांच्या काळापासूनच खूप अक्टिव्ह आहेत. ते गंजलेल्या खिळ्यासारखे ऐनवेळी त्या घराण्याच्या टाचेत घुसण्याचा आसुरी आनंद लुटत असतात.
विष्णूअण्णा पाटील
दादांचे पुतणे व सहकारातील एक उमदे नेतृत्व विष्णूअण्णा पाटील यांच्यावर दादांचे विशेष प्रेम होते. विष्णूअण्णा अतिशय कर्तबगार पण सर्वांना सोबत घेऊन जाणारे निगर्वी व्यक्तिमत्व होते. परंतु दादा हयात असतानाच आपल्या जिल्ह्यातीलच मंडळींनी “माझ्या विष्णू सारख्या देवगुणाच्या पोराचा विधानसभेला ठरवून दगाफटका करावा आणि झडग्यांनी डाव साधावा, याचे मला पोरा खूप वाईट वाटते,” अशा गावरान शब्दात दादांचे दुःख मी ऐकले आहे.
अण्णांचा पराभव हा दादांना स्वतःचाच पराभव वाटला होता. दादा घराण्याच्या भूमीगत शत्रूंनी विष्णूअण्णांची मानखंडना केली नसती, तर वसंतदादा आणखी काही वर्षे नक्कीच जगले असते, असे मला मनापासून वाटते.. 25 -30 वर्षा मागे पवार साहेबांच्या आजूबाजूने फिरणारी व स्वतःचा अजिबात चेहरा नसणारी अनेक फाटकी माणसेही पुढे बलाढ्य झाली. गबरू बनली.. पुढे पुढे करत गोड गोड बोलणाऱ्या अनेक बोलघेवड्याना पवारांनी लिफ्ट दिली. त्यासाठी बहुजन समाजातील अनेक गुणीजनांवर एक प्रकारे अन्याय घडला. पण ही गोडबोली आणि चमको मंडळीही सहज बिडी फुकावी तशी साहेबांना सोडून निघून गेली.
कालाय तस्मै नमः
लेखक – #विश्वास_पाटील