कोकणातील निसर्गरम्य मंदिर विमलेश्वर, पावसाळ्यात एका दिवसासाठी फिरण्यासाठी नियोजन करत असाल तर विजयदुर्ग किल्ला आणि तिथून जवळच असलेले विमलेश्वर मंदिर एका दिवसात फिरून होईल.
जाण्यासाठी रस्ता : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव तिट्टा पासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर देवगड आणि तेथून देवगड ते विजयदुर्ग रोडवरील 8 किलोमीटर अंतरावरील वाडा बस स्टॉप. बसस्टॉप पासून अर्धा किलोमीटर अंतरावर अखंड वाहणाऱ्या झऱ्या जवळ आणि मंदिर परिसरात असणारा ओढा, हे या मंदिराचे खास आकर्षण होय!
मंदिराबद्दल माहिती : मंदिर परिसरात प्रवेश करताना मुख्य कमानीपासून श्री विमलेश्वर मंदिराकडे जाताना लाल मातीच्या छान पायऱ्या आहेत. पाय-या उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि मानवीबुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटनदृष्टया अतिशय उत्तम स्थळ आहे. पहिल्यांदा दर्शन होते ते दगडात कोरलेली अत्यंत सुंदर १० ते १२ शिल्पाचें. त्यानंतर जांभ्यादगडाच्या कोरलेली काळभैरवाची गुफा आणि समोरच असलेले तुळशी वृंदावन. विमलेश्वराच्या मंदिरासभोवती दाट वनराई आहे, अनेक प्रकारची झाडे त्या वनराई मध्ये आहेत.
श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे ५० ते ६० फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात.
काळभैरव मंदिराच्या बाजूला श्री गणेश मंदिर असून, मंदिराचे खास आकर्षण म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेंदुराचा गणपती असतो पण येथे दगडी कोरीव अशी खूपच छान मूर्ती आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना हत्ती आणि प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला तीन ते चार दगडात कोरलेल्या दीपमाळ असून. मंदिरात प्रवेश करताना प्रथम दर्शन नंदीच होते. आतमध्ये जाताना वटवाघूळ असल्यामुळे एकट्याला जायला भीती वाटते पण, आत लाईटची सुविधा आणि उजेड असल्यामुळे काही वाटत नाही. मग दर्शन होत महादेवाच्या पिंडीच. सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून घेते.
मंदिराच्या समोरच ओढा आणि एक झरा असून, थोडे पुढे गेले की एक पाट आलेला दिसतो. तेथेच २ ते ३ कुंड आहेत. कुंडातून पाणी खाली दुसऱ्या कुंडात पडते आणि गोमुखातून ओढ्यात अशी रचना आहे. हे पाणी स्वच्छ आणि निर्मळ असून पिण्यास योग्य आहे असे समजले. पुढे खाली १२ ते १३ पायऱ्या उतरल्यावर मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. मन प्रसन्न करणारे ठिकाण असून, मंदिराकडून गावाकडे जातानाचा अत्यंत सुंदरअसा ओढ्यावरचा जांभ्याचा पुल देखील मंत्रमुग्ध करतो.
चहूबाजूंनी वेगवेगळी झाडे जास्त करून नारळाची, सुपारीची, माडाची. वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून मंदिराकडे पाहिले तर मंदिर परिसरातून परत जावसे वाटत नाही. मंदिराला दोन कमान एक गावाकडून आणि एक मुख्य रस्त्यावरून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील आपण याच कमानीतून प्रवेश केला.
आपल्याला एक दिवस वेळ मिळाला तर सहपरिवारासह आवर्जून मंदिराला भेट द्या. पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाण आहे. इथून पुढे १५ कि. मी. अंतरावर मराठ्यांचा ऐतिहासिक किल्ले विजयदुर्ग हा जलदुर्ग व श्री रामेश्वर मंदिर असून काही अंतरावर सुंदर असा पडवणे सागरकिनारा आहे.
लेख: रोहिदास लिंगायत