आज २३ जून – भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा ‘बलिदान दिवस’. ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ हा नारा देऊन काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अत्याग्र्ह करणाऱ्या डॉ.मुखर्जींचा आजच्याच दिवशी २३ जून १९५३ रोजी काश्मीर मधील श्रीनगरच्या तुरुंगात संदेहास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
त्याला आता सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. भूतपूर्व पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी त्या काळात डॉ.मुखर्जींचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहात होते. त्यांनीच २००४ मध्ये जाहीर आरोप केला होता की, ‘डॉ.मुखर्जींची तुरुंगात हत्या केली गेली.’ डॉ.मुखर्जींच्या बलिदानामुळे आजचा जम्मू काश्मीर भारतात आहे, नाहीतर पाकिस्तानला हाताशी धरून इंग्लंडने त्या प्रदेशाची गतही ‘पाकव्याप्त काश्मीर’सारखी केली असती आणि तेव्हाच्या भारताच्या सत्ताधाऱ्यांनी ते बिनबोभाट होऊ दिले असते.
आज दिसणारा भारताचा नकाशा ही फार मोठ्या प्रमाणावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कामगिरी आहे. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे योगदान काश्मीरपुरतेच मर्यादित नाही. डॉ.मुखर्जी नसते तर आजचा प.बंगाल, पूर्ण ईशान्य भारत आणि पंजाब भारतात दिसला नसता. पूर्ण बंगाल (आजचा बांग्लादेश व प.बंगाल), आसामसह ईशान्य भारतातील सर्व राज्ये व पूर्ण पंजाब भारतापासून तोडून ‘पाकीस्तान’ तयार करण्याचा घाट इंग्रजांनी घातला होता. काँग्रेस नेतृत्वाने त्याला मान्यता दिली होती आणि हा कुटील डाव यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेला भीषण हिंसाचार मुस्लीम लीग पूर्ण त्वेषाने करत होती.
या संबंधीची अनेक अधिकृत कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्या कागदपत्रांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिण्याचे काम मी सध्या हातात घेतले आहे. त्यावेळेला डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी ह्या कुटील कारस्थानाच्या विरोधात उभे राहिले. ‘धर्माच्या आधारावर फाळणी करण्याचे तत्व स्वीकारले असेल तर विविध प्रांतांमधील ज्या ज्या भागातील जनतेने भारतात रहाण्याचा कौल दिला आहे त्यानुसार त्या त्या प्रांतांचेही विभाजन झाले पाहिजे’ अशी तर्कशुद्ध भूमिका घेऊन डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालच्या फाळणीसाठी आंदोलन उभे केले.
डॉ.मुखर्जी तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते पण त्यांनी उभे केलेले आंदोलन केवळ हिंदू महासभेचे नव्हते तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा विरोध झुगारून देऊन संपूर्ण बंगाल काँग्रेस, अन्य लहान मोठे पक्ष एवढेच नव्हे अनेक कम्युनिस्ट देखील त्या आंदोलनात सामील झाले होते. ते आंदोलन बंगालच्या भारतीय जनतेचे आंदोलन ठरले. त्यातून प्रेरणा घेऊन पंजाबमध्येही तसेच आंदोलन उभे राहिले. त्या दोन्ही आंदोलनांनी निर्माण केलेल्या राजकीय वादळामुळे इंग्रज सरकारला आपला कुटील डाव सोडून द्यावा लागला व १४-१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री आजच्या भारताचा नकाशा अस्तित्वात आला.
आज आपण प.बंगाल, ईशान्य भारत व पंजाबसह भारताचा जो नकाशा पहातो त्याच्या निर्मितीमागे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फार मोठे योगदान आहे. पं.नेहरूंना सर्व अर्थाने आव्हान देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे हे डॉ.मुखर्जींनी दाखवून दिले होते. आणि म्हणूनच अत्यंत थंड डोक्याने कट करून ह्या महान नेत्याची हत्या आजच्या दिवशी केली गेली.
‘तुम्ही ह्यावेळेला काश्मीरमध्ये जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे’ अशी पूर्वसूचना रा.स्व.संघाचे तेव्हाचे सरसंघचालक पू.श्रीगुरुजी यांनी डॉ.मुखर्जींना दिली होती. काही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी सुद्धा त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण, आपला आंदोलनाचा निर्णय डॉ.मुखर्जींनी बदलला नाही. त्यातून वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांची जीवन यात्रा संपवली गेली. त्यांच्या पावन व प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन.
Article By- Madhav Bhandari