आभूषणे आणि भारतीय संस्कृती – दागिने, आभूषण आणि भारतीय माणूस यांच्यात थोडे गोंधळात टाकणारे संबंध फार पूर्वीपासून आहेत. कारण प्रत्येकाला आभूषण वापरावेसे वाटते मात्र प्रत्येक वेळी संतांची, थोरांची वचने मनात येतात. “काय भूललासि वरलिया रंगा…” आणि सगळ्या उत्साहावर भ्रम निर्माण करणारे ढग गोळा होतात.
लहानपणापासून आपण सगळेच “सुंदर अक्षर हाच खरा दागिना” असे वहीत लिहीत आलेले आहोत. पण शाळा सुटली की या दागिन्याचा विशेष काही उपयोग होत नाही हे समजतं.
कॉलेजमध्ये काही जणांना पत्रे वगैरे लिहिताना काही प्रमाणात मदत होत असावी पण त्यातही खात्रीलायक काहीच सांगता येत नाही. स्त्रियांच्या सुदैवाने (आणि वडील किंवा नवऱ्यांच्या दुर्दैवाने) त्यांच्यावर या वचनांचा फार फरक पडत नाही! त्यामुळे खरा दागिना जेव्हा भेट म्हणून दिला जातो तेव्हा त्यांचा चेहरा खुलतो!
खरं सांगायचं तर आभूषणे आणि भारतीय संस्कृती यांचा संबंध या संस्कृतीइतकाच जुना आहे. मुळातच सौंदर्यप्रिय समाजाला आभूषणांचे कौतुक जास्त असते हे सर्वमान्य सत्य आहे. सर्व भारतीय देवी देवता आभूषणांनी युक्त असतात. सामान्य व्यक्ती देखील आभूषणे परिधान करण्याच्या लालसेतून सुटू शकत नाहीत.
याचे मुख्य कारण म्हणजे आभूषणे कोणत्याही व्यक्तीला अथवा वस्तूला आकर्षक बनवतात. लोकांनी “Don’t judge a book by its cover” चा कितीही आव आणला तरीही, पुस्तकाची पहिली कसोटी त्याच्या मुखपृष्ठावरूनच करावी लागते. हेच सत्य आहे.
नाट्यकलेचा एक सोपा नियम आहे, “जोपर्यंत एखाद्याचे लक्ष आकर्षित केले जाणार नाही तोपर्यंत आपला संदेश कसा काय पोहोचवला जाईल?” लक्ष वेधण्याचे देखील अनेक मार्ग आहेत त्यांच्यापैकी डोळ्यांना सुखावणारा मार्ग म्हणजे शृंगार! पौराणिक काव्यांमधून, ग्रंथांमधून शृंगाराची अनेक वर्णने वाचनात येतात.
मग ते गर्ग संहितेतील श्री कृष्णाच्या मुकुटाचे आणि अलंकृत गोपिकांचे असो, किंवा रामायणातील सीतेला माता अनुसयेकडून मिळालेल्या दिव्य आभूषणांचे असो नाहीतर कर्णाला मिळालेली कुंडले असो. पुराण काळातील दागिने आणि त्यांच्या अनुषंगाने घडलेल्या घटना यांच्यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. पुढे कधीतरी लिहीनही.
तसं पाहिलं गेलं तर आभूषणे आणि अलंकार ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी नाही. रामरक्षेत देखील प्रभू श्रीरामांचे वर्णन “नानालङ्कारदीप्तं” म्हणजेच अनेक अलंकारांनी प्रदीप्त असे केलेले आहे. पण आधी नमूद केल्याप्रमाणे मोठमोठी वाक्ये पुरुष मंडळी परिधान करतात आणि आभूषणांना दूर ठेवतात. हातातील कडे, गळ्यातील साखळी, आणि (विशेषतः पुण्यात) भिकबाळी सोडली तर पुरुषांनी आभूषणांचा परित्याग केलेला आहे.
माझ्या मते कालानुरूप देखील पुरुषांची आभूषणे कमी होत गेलेली आहेत. पण आजही जेव्हा आपण आभूषणांनी युक्त शिवाजी महाराजांना सिंहासनारूढ पाहतो तेव्हा ते रूप दिव्य वाटतं. असो, पुरुषांना जेव्हा जाणीव व्हायची तेव्हा होईल पण स्त्रियांनी अजून आभूषणांपासून फारकत घेतलेली नाही ही जमेची बाजू आहे.