ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला – मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय.

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी
येईन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे
नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे
फुलबाग मला हाय पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे
बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमि भयभीता रे
अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.