माघी श्री गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.
या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.
माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी हे करा !
नामजप
देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते.
माघी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी ?
श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुढील प्रार्थना कऱाव्यात.
अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.
आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.
श्री गणेशाला गंध कोणत्या बोटाने लावावे ? | अनामिकेने (करंगळीच्या जवळचे बोट) |
फुले कोणती वाहावीत ? | लाल जास्वंद / लाल रंगाची अन्य फुले |
कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ? | चंदन / केवडा / चमेली |
उदबत्त्यांची संख्या किती असावी | दोन |
अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ? | हीना |
श्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ? | आठ किंवा आठच्या पटीत |
गंध, हळद-कुंकू कसे वहावे ?
पूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
श्री गणेशाला कोणती फुले वहावीत ?
विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेश-तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते.
या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना ‘देठ श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’, असे वाहावे.
गणेशाला दूर्वा का वाहतात ?
दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात.
0 (0)