स्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे “वाघनखं” हे हत्यार इतिहासात अमर झाले.
माहिती
तसेच जनसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले. हे हत्यार प्रामुख्याने भारतातविकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे.
वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.
कसं बनतं ?
वाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्यापट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंगळीत अडकवून मूठ बंद केल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.
वाघनखांची रचना ही खास कातडी फाडून स्नायूंना टरकावण्यासाठी केलेली आहे. वाघनखाने शत्रूला पूर्णपणे मारणे शक्य नसले तरी त्याला जखमी करून नामोहरम करता येत असे. वाघनखं शत्रूच्या पोटात खुपसल्यावर बाहेर काढणे कठीण असे. वाघनखं शरीरात खुपसल्यावर अत्यंतिक वेदनेमुळे शत्रू दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे वाघनखं जास्त खोलवर जाऊन नुकसान करतात.
काम कसं करते?
महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखं खुपसल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने अफजलखानाने महाराजांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाघनखं त्याच्या पोटात जास्त खोलवर घुसून पोट फाटले व आतडी बाहेर आली.
वाघनखांचा उपयोग शत्रूवर हल्लाकरणे याव्यतिरिक्त डोंगरकपार्या, किल्ल्याच्या भिंती तसेच झाडावर चढणे उतरणे यासाठी होत असे.
सिंहाचा पंजा: या शस्त्रात सिंहाच्या नखांसारखीच धातूची नखे असलेली पट्टी असते.
पंजाच्या मागच्या बाजूस असलेलीधातूची पट्टी मनगटावर घट्ट बसते व नखे असलेली पट्टी बोटांच्या खालच्या बाजूस येते. या रचनेमुळे शस्त्रावर घट्ट पकड बसते, तसेच वार करणारा नखांचा भाग बोटांखाली लपल्यामुळे शस्त्र सहजासहजी शत्रुला दिसत नाही. या शस्त्राचा उपयोग ठोसा देणे, वारकरणे, ओरबाडणे यासाठी होतो.
Image Rights – The Metropolitan Museum of Art. All rights reserved.