जेजुरीचा खंडोबा चा उल्लेख मल्हारी महात्म्यामध्ये तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकगीते आणि साहित्यकृतींमध्ये आढळतो. ब्रह्मांड पुराणानुसार भगवान ब्रह्मदेवाच्या वरदानाने मल्ल आणि मणि या दोन राक्षस भावांचे रक्षण केले. या संरक्षणाचा परिणाम म्हणून ते अजिंक्य आहेत असा त्यांचा विश्वास वाटू लागला आणि त्यांनी पृथ्वीवरील संत आणि लोकांना घाबरवण्यास सुरुवात केली. धर्मपुत्र सप्तर्षी कृतयुगातील मणिकुल पर्वतावर ध्यान करत होते. तेथे मणि आणि मल्ल नावाचे दोन राक्षस आले आणि त्यांनी दंगा सुरू केला आणि’ऋषींचे तपोवन नष्ट केले, त्यानंतर खंडोबाच्या रूपात भगवान शिव आपला बैल नंदीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले.
मणि आणि मल्लचा नाश करण्यासाठी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले आणि कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली गणांच्या सात श्रेण्यांसह मणिकुल पर्वतावर पोहोचले. तेथे त्याचे मणी आणि मल्ल यांच्याशी तुमुल युद्ध झाले.
शेवटी मार्तंड भैरवने मणीच्या छातीला छेद दिला आणि तो जमिनीवर पडला. जेव्हा तो पडला, त्याने घोड्याच्या रूपात त्याच्या जवळ राहण्याची परवानगी देण्यासाठी शिवाकडे प्रार्थना केली. शिवाने त्याची विनंती मान्य केली. त्याचप्रमाणे मल्लाने मरण्यापूर्वी मार्तंड भैरवला विनंती केली की माझ्या नावाने तू मल्लारी (मल्ला + अरी) म्हणून ओळखला जा.
मग सप्तर्षींनी निर्भयपणे मार्तंड भैरव यांना स्वयंभूलींगच्या रूपात प्रेमपूर (पेम्बर) मध्ये राहण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यांची विनंती देखील स्वीकारली. अशा प्रकारे मल्लारी (मलार) ची कथा प्रसिद्ध झाली. मल्लारी (मलार) म्हणजेच खंडोबाला पांढऱ्या घोड्यावर बसवलेले चित्रित केले आहे. कुत्रा त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या हातात खडगा (खंडा) आणि त्रिशूल आहे.
खंडोबा मंदीर जेजुरी
जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदीर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) गावातील डोंगरात वसलेले आहे. राज्यातील प्रसिध्द तिर्थापैकी एक असणारे हे मंदिर काळ्याभोर दगडांनी बांधलेले आहे.
मंदीरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसा बाई यांची देखिल मुर्ती आहे. खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठया आनंदाने येथे भंडारा उधळत असतात. खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो. या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या असून नवविवाहित वर आपल्या वधुस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठया प्रेमाने चढत असतात. या पायऱ्या चढत असताना वातेटच बानुबाई ( खंडोबाची दुसरी पत्नी ) यांचंही मंदिर लागतं.
मंदिराच्या सुरवातीला भव्य दगडी कमानी आहेत. मंदीरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लगत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वेकडून मोठ्यात – मोठ्या आकाराचे पितळी धातूने मढवलेले कासव आहे. सर्वत्र परिसर भंडारा उधळल्या ने गजबजून जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते.
जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोकं आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात. खानदेशातील लोकांची संख्या देखिल इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. खंडोबा हे कार्य सिधिला नेणारं दैवत आहे. श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते. त्या पैशातून 25000 रुपयांच्या मुर्त्या बनवल्या तसेच उर्वरित पैशातून मुखवटे आशा विवध प्रकारचं साहित्य आणले. देवाच्या मंदीरात पितळ चांदी युक्त तीन मूर्तींचे जोड होते परंतू त्यातील एक मूर्तीचा जोड इ. स.1942 ला चोरी झाला होता.
श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इ. स. 1608 मध्ये पुर्ण झाले. मंदिरा भोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे ‘ राघो मंबाजी ‘ या मराठा सरदाराने इ. स. 1637 मध्ये पूर्ण केली. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. 1742 मध्ये त्यांनी मंदीरात दगडी खांब उभे केले.
काही कालांतराने मंदिराच्या सोभवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इ.स. 1770 पूर्ण केले. श्री तुकोजी होळकर यांनी ‘ भुलेश्वर ‘ या मंदिराचा स्वतः लक्ष्य घालून जीर्णोद्धार केला. ‘भुलेश्वर’ हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे 17 की.मी. अंतरावर आहे. हे मंदीर अकराव्या शतकात देवगिरी येथिल यादवांनी बांधलेले आहे. याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निःसीम भक्त होते.
त्या काळात जेजुरीचा खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक. पंढरपूरच्या विठ्ठला नंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक विविधतेत नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबा चे मंदीर अती शोभामान दिसते. गेले कित्येक वर्षांपूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा, कमानी तसेच पायऱ्या देखिल उभारलेल्या आहेत.
सर्व शेतकरी बांधवांना आपलस वाटणार हे दैवत शिव, भैरव आणि सूर्य देव या तिन्ही देवाचं एकत्रित स्वरूप आहे. म्हणुन खंडोबाचा उपवास देखील भाविक मंडळी रविवारी करतात. या मंदिरा पासून काही किमी अंतरावर असणाऱ्या कडे- पठारावर खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे, परंतू जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा तीन शतकापूर्वी चे म्हणजे जवळपास सतराव्या शतकातील आहे.
गडावर अनेक पुरातन वास्तू असून प्रचंड वजनाची दिव्य – भव्य तलवार सुद्धा आहे. हि जड तलवार हातात घेउन दरवर्षी ईथे एक खेळ खेळला जात असतो. ही वजनदार तलवार जो कुणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य इनाम दिला जातो.
खडोंबा यात्रा उत्सव ( चंपा शष्टी )
तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते. परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते. खंडोबाची जत्रा चैत्र, पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे पाच दिवस असते. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे एकुण सहा दिवस तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित दहा दिवस यात्रेचे असतात. या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच आषाढी वारी निमीत्त पंढरपुरी निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (वेळापत्रक-2023) देखील एक दिवस ” जेजुरी ” (jejuri) येथे मुक्कामी असतो. तेंव्हा देखील गडावर प्रचंड मोठी गर्दी असते.
- संकलित माहिती.