जशी संध्याकाळी उन्ह कलती व्हायला लागतात आणि अंधार रात्रीची चाहूल करून देतो तसच काहीस श्रावण कलायला ( संपायला ) आला की एक गोष्टी चे ध्यानाकर्षण सुरू होते आणि आषाढी ला जसे विठ्ठल विठ्ठल ओठावर तरळू लागते तसे ‘ गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया ‘ चे स्फुरण अंगावर नाचू लागते.
इतके दिवस म्हणजे इतकेच राहायचे या अटीवर पाहुणा आपल्या मित्र सोबत आपल्यात वास करायला येणार असतो आणि आपण त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला उतरलेली असतो. तशी प्रत्येक गावात गणेश चतुर्थी आपल्या परीने साजरी केली जाते.आज थोड आमच्या गावातील पद्धतीवर लिहितो. लहानपणी गणपती उत्सव हा आमच्या मोठ्या घरी गावा कडे साजरा केला जायचा.त्यामुळे साधारण १-२ दिवस आधी गावाकडे प्रस्थान होत असे.
आम्ही बच्चे कंपनी म्हंटल्यावर आमच्यावर तशी जबाबदारी नसायची पण दुकानातून काही किरकोळ समान आणून देणे,गुरुजींना आठवण करून येणे इत्यादी छोटी कामे सांगितली जायची.तत्पूर्वी बहुतेक तयारी झालेली असायची. गाव म्हांतल की ‘ खेड्या मधले घर कवलारू ..’ हे आपसूक आलेच आणि मग भिंतीत #कोनाडे व #खुंट्या या म्हणजे Landmark असायच्या ( तेंव्हा त्यांचं महत्त्व समजत न्हवत ).तर त्यातील एक पूर्व पश्चिम असलेला कोनाडा हा बाप्पांची हक्काची जागा असायचा.
बाप्पांच्या आगमन पूर्वी घराची साफसफाई होऊन रंगरंगोटीचा एक हात होत असे. मग वर्षा गणीक त्याच्यावर वेग वेगळी डिझाईन्स सुरू झाली, बाप्पांच्या मागे फिरते चक्र , लाईट च्या माळा ही लागायला लागल्या पण महत्वाचं होते, ते म्हणजे गोमय ने सारवलेल्या कोनाड्याला रांगोळी हे न चुकता असायचे. तसे गावाकडे कलाकार / मूर्तिकार कमीच. त्यामुळे प्रत्येकाचे गणपती हे ठराविक कुंभार/मूर्तिकार कडे वर्षानुवर्षे फिक्स असायचे.
चतुर्थीला सकाळी गल्लीतून प्रत्येकजण ठरलेल्या कट्यावर यायचे. घरातून मोठी आणि २-३ मूल हमखास असायचीच. प्रत्येकाच्या हातात टाळ,झांजा,घंटा ही वाद्य असायची आणि येणार जाणारा ‘ मोरया ‘ चा गजर सुरूच असायचा. साधारणतः गल्लीतील १०-१२ घरातून गणपतींचे आगमन एकत्रच होत असे ते पण कुणाकडे चांदीच्या ताटातून, कुणाकडे स्टील च्या थळातून, ताटातून, पातेल्यातून किंवा परातीतून सुद्धा.
घरी दारात आल्यावर पायावर पाणी, दूध घालून औक्षण व्हायचं आणि बाप्पांचे आगमन व्हायचे.आता प्राण प्रतिष्ठापना यासाठी गुरूजींची वाट पाहण्यात थोडा वेळ जायचा तेवढ्यात एखाद कप चहा आणि गरज भासल्यास गुरुजींच्या घरी एक चक्कर चौकशीसाठी होत असे.
संध्याकाळ पासून गावातील पाहुण्यांच्या घरातील बाप्पांचं दर्शन आणि गाठी भेटी असा कार्यक्रम होत असे.दुसऱ्या दिवशीपासून बहुतेकांच्या घरी ‘ मंत्रपुष्पांजली ‘ ठरलेली असायची. मंत्रपुष्पांजली म्हणजे त्यावेळेस बहुतेक सगळ्या देव देवींच्या आरती गुरुजी,घरातील लोक,बाहेरचे आमंत्रित आणि शेतातील भागदारयक यांनी एकत्रित येऊन पठण होत असे.
मग सारे गुरुजी ( साधारण ७,९,११ जशी सवड असेल तसे )हे पण आरती आणि पुष्पांजली म्हणण्याचे. यात #अथर्वशीर्ष चे सामूहिक पठण सुद्धा होत असे. हे सगळ झाल्यावर थोडा अल्पोपहार आणि मसाला दूध हा ठरलेकामेनु व त्यासोबत थोड्या गप्पा,गावातल्या बातम्या आणि मुलांची चेष्टा मस्करी.हे सर्व आत होत असताना अंगणात फटाके वाजत असत आणि त्यासोबत सुतळी बॉम्ब पण फोडले जायचे. आता बायकांचे ‘ गौरी ‘ आणण्यावरून वेळा ठरवल्या जायच्या. गुरुजींनी काढून दिलेल्या मुहूर्तावर घरातून बायका गौराईला घरी घेऊन येण्यासाठी चौकातील पाण्याच्या टाकीवर एकत्र जमायच्या.
जाताना पान,सुपारी,काकडीचे काप,गूळ खोबरे किंवा साखर खबऱ्याच्या प्रसाद असायचा.टाकीवर पाच खडे वेचून,ते स्वच्छ धुवून तांब्यात घातले जायचे.हळदीची, कर्दळीची पान तांब्यात घालून त्यावर गौरीची व इतर फुल ठेवून घरापर्यंत ‘ गौर आली,गंगा आली गणपतीची आई आली ‘ अश्या गजरात आणले जायचे. हे सर्व पर पडेस्तोवर गौरीच्या जेवणाची तयारीला सुरुवात व्हायची. त्यावेळेस एकत्र कुटुंब होत त्यामुळे घरातल्या बायकांवर एवढा ताण नाही यायचा त्यामुळे त्यांना पण संध्याकाळी मंदिरात किंवा बाजूच्या गल्लीतील ओळखीच्या घरी जाऊन यायला वेळ असायचा.
गौरीच्या जेवणानंतर चा कार्यक्रम म्हणजे घरातील बायकांनी ‘ दोरे ‘ घेणे हा असायचा. त्यादिवशी गुरुजी कथा वाचन करायचे आणि बायका त्या कथा ऐकत दोऱ्या मध्ये हळकुंड,काकडी, खोबरं,पडवळ असे एकानंतर एक गाठ बांधत जायचे आणि त्यासोबत हळद कुंकू पण लावले जायचे जे नंतर बायकांनी घालायचे असायचे. ही कथावाचन दरवर्षी आमच्या बाजूला असलेल्या डॉक्टरांच्या घरी असायचे.आम्हा मुलांना फक्त फटाके उडवणे आणि नंतर जायफळ घातलेली कॉफी पुण्यात इंटरेस्ट असायचा.
हे सारे विधी पार पडले की बायकांचा मोर्चा पुन्हा स्वयंपाक घरात जिथे दुपारची जेवण झाली की विसर्जनासाठी तयारी सुरू व्हायची. या सगळ्यात एक दिवस ‘ उंदीर बीज ‘ म्हणून पण साजरा केलं जायचा. उंदीर बिजेला सगळी कड धान्य एकत्रित करून उसळ केली जायची आणि उंदीर मामांचा मान म्हणून घरतल्या सगळ्या कोपऱ्यात ‘ उंदीर मामा की जय ‘ असा घोष करत थोडी थोडी उसळ सगळ्या घरात उंदरांना खायला घातली जायची. अश्या तऱ्हेने बाप्पांच्या वाहनाचे महत्त्व पण सांगितले जायचे. अश्या तऱ्हेने घरगुती गणेश चतुर्थी गावातील गरीब – श्रीमंत , पै – पाहुणे , गावातील मित्र यांच्यासोबत आणि फटाक्यांच्या आवाजात वाजत गाजत साजरी केली जायची….. गणपती बाप्पा मोरया !!!
Article By – Rohit Kumbhojkar