मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी कर्करोगाशी संघर्ष केला आणि त्यात त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. त्यांच्या या लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना प्रेरणा दिली होती. परंतु कर्करोगाचा पुनरागमन झाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
अतुल परचुरे यांचा अभिनय प्रवास
अतुल परचुरे हे मराठी चित्रपट, नाटकं, मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक अत्यंत महत्वाचं नाव होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी नाटकांतून केली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीने ते प्रेक्षकांच्या हृदयात घर करुन गेले. त्यांच्या हास्यविनोदाच्या भूमिकांसाठी ते विशेष प्रसिद्ध होते, परंतु गंभीर आणि संवेदनशील भूमिकांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली.
टीव्ही मालिकांचा विचार करता, त्यांची ‘आर के लक्ष्मण की दुनिया’ ही मालिका चांगलीच गाजली होती. आर के लक्ष्मण यांच्या कल्पनेतील ‘कॉमन मॅन’ अतुल परचुरे यांनी या मालिकेतून अत्यंत उत्तमपणे छोट्या पडद्यावर साकारला होता. त्याशिवाय हिंदीमधील त्यांच्या ‘यम है हम’, ‘बडी दूर से आये है’ अशा मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या. कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्येही त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.
अतुल परचुरे यांनी आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ते नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिका क्षेत्रात देखील अतिशय लोकप्रिय होते. विशेषतः विनोदी भूमिकांमध्ये ते प्रसिद्ध होते, आणि त्यांची टाइमिंग आणि संवादफेक यांमुळे प्रेक्षकांना हसवण्याची एक विशेष शैली त्यांनी विकसित केली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली
एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
“तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.”