यावर्षी सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने, 2 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत लाल किल्ला दिल्ली येथे होणाऱ्या राजा शिवछत्रपती महानाटय़ाचे भूमिपूजन झाले, दैवयोगे मी शनिवारी संध्याकाळी सांस्कृति मंत्रालय, भारत सरकारने आयोजित केलेल्या #राजाशिवछत्रपतीऐतिहासिकमहानाट्य चा प्रयोग बघून आलो.. त्याबद्दल थोडेसे माझे मनोगत..
उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला दिल्लीचे सर्व खासदारही उपस्थित होते.
हे महान नाटक भारत, अमेरिका आणि इंग्लंडसह जगभरात 1000 हून अधिक वेळा रंगवले गेले आहे. चार मजली रंगमंच, 250 हून अधिक कलाकार आणि घोडेस्वार सैन्यदल आपल्या छत्रपती शिवाजींचे जीवन चरित्र आपल्या डोळ्यांसमोर आणत आहे. तोफगोळे, हत्ती, घोड्यावरचे सैनिक राजा शिवछत्रपती महात्म्याला जिवंत करतात.
लाल किल्ल्यासमोरच्या मैदानात हे प्रयोग साकारले जात आहेत. प्रवेशद्वारांना वेगवेगळ्या गडांचे नाव दिले आहे. मी प्रतापगड या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत गेले की वेगवेगळे स्टॉल लावले आहेत. खाण्याचे, पुस्तकांचे. त्यासोबत, प्रत्येक खांबावर मराठा सरदार, पेशवे, यांची माहिती असलेले फलक लावले होते.समोर शिवसृष्टीची चित्रफीत लावली होती.

A, B, C अश्या तीन भागांमध्ये आसनव्यवस्था विभागली आहे. प्रमुख पाहुण्यांना वेगळा प्रवेशद्वार आहे. मोफत प्रवेशिका bookmyshow वर, आणि कार्यक्रमस्थळी मिळत होत्या. कार्यक्रमाला @adgpi प्रमुख जनरल मनोज पांडेजी, महाराजांच्या सरदारांचे, पेशव्यांचे वंशज, @iccr_hq चे अध्यक्ष, डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे @Vinay1011, विविध देशांचे राजदूत, खासदार मनोज तिवारी, आदि पाहुणे उपस्थित होते. आरतीनंतर प्रयोगाची सुरूवात झाली.

लाल किल्ल्यासमोर असा दिमाखदार देखावा अतिशय सुंदर वाटतो! दर्जेदार कलाकार, उत्कृष्ट ध्वनी आणि भारावून टाकणारी प्रकाशव्यवस्था. महाराजांच्या आयुष्यातले प्रमुख क्षण उत्तमरित्या दाखविले आहेत. पण काही महत्वाचे प्रसंग जसे पावनखिंडीतली लढाई ही दाखवली नाही त्याचं थोडं आश्चर्य वाटले . संत तुकाराम महाराज-शिवाजी महाराज भेटीचा प्रसंग भारावून टाकतो. समर्थ रामदासांची फक्त काही सेकंदांचीच झलक आहे. ही एक गोष्ट खटकली. भाषा हिंदी असून संवाद छान लिहिले आहेत. आशय सर्वसामान्य हिंदी भाषिक लोकांपर्यंत पोचतो.


पूर्वार्धात अफजलखान वध हा शेवटचा प्रसंग. उत्तरार्धात आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो प्रसंग सुंदर दाखवलाय.. प्रयोगात गाण्यांचा वापर योग्य पद्धतीने केलाय.. त्यामुळे प्रयोग जास्त वेळ खेचला गेला नाही हे महत्त्वाचे.
उत्तरार्धात २ प्रसंग खिळवून ठेवतात ते म्हणजे महाराजांची घालमेल. त्यांचे जिवाभावाचे मित्र, सरदार, आपले प्राण देऊन स्वराज्य टिकवून ठेवतात, त्याचे राजांना वाईट वाटणारा प्रसंग आणि औरंगजेबाने केलेलं महाराजांचं कौतुक! अप्रतिम वाक्यरचना आणि संवाद! “हमें दुश्मन मिला वो भी सिवा जैसा” याला आलेला टाळ्यांचा कडकडाट जबरदस्त होता. प्रकाशव्यवस्था कौशल्यपूर्ण असल्याने पाहताना अजून भारावून जातो आपण.
घोडे, उंट; सैनिक म्हणून काम करणारे कलाकार यांचा ताळमेळ आणि प्रसंगावधान हे खरंच वाखणण्याजोगे आहे. राज्याभिषेक सोहळा तर अप्रतिम जमला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सिंहासन लावले गेले पण कोणाच्या लक्ष्यात ही गोष्ट आली नाही हे अजून एक वैशिट्य म्हणावे लागेल व्यवस्थापनाचे. महाराजांची प्रतिज्ञा ही खूप विशीष्ट पद्धतीने दाखवली आहे. फक्त त्यासाठी का होईना संपूर्ण प्रयोग पहावाच !
राज्याभिषेक सोहळा किती दिमाखदार झाला असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहतं. मला यावर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात भाग घेण्याचं भाग्य लाभले होते. त्यामुळे असेल पण रायगडावरचा जिंवत अनुभव साक्षात डोळ्यासमोर दिसतोय याचा भास होतो!
प्रयोगातील सोहळ्याची खाली एक झलक. आवाज वाढवून ऐका!
असा सुंदर प्रयोग बघून बाहेर पडल्यावर, खाण्यासाठी मराठमोळी पुरणपोळी मिळाली!


यासोबतंच भारतीय इतिहास, लाल किल्याचा इतिहास, याबद्दल बरीच पुस्तके विकायला होती. सगळ्यात महत्वाची गोष्टं ही, की बरेच प्रेक्षक हे अमराठी होते. असे बरेच होते ज्यांनी आपल्या लहान मुलांना मुद्दाम आणले होतं. मुलांनी कुतूहलाने पूर्ण प्रयोग बघितला. जेंव्हा आपला लाडका राजा छत्रपती झाला तेव्हा आपसूक सगळे प्रेक्षक आपल्या जागी उठून उभे राहिले होते. महाराजांच्या जयघोषात कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यावर या महाराजांच्या मूर्तीसमोर भरपूर लोकांनी जयघोष केला. लहान मुले एकदम उत्साहाने भरून बाहेर आली. दिल्ली सारख्या ठिकाणी सुद्धा महाराजांची एवढी ख्याती बघून अभिमान वाटला.

पण ज्या भूमीत महाराज वाढले, त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या आपल्या महाराष्ट्रात आपण महाराजांची ती कीर्ती, ती ख्याती खरंच जपतो आहोत का, हा प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय राहिला नाही !


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.