दिवाळीमध्ये / दिवशी लक्ष्मीपूजन घरी कसे करावे
दिवाळी लक्ष्मीपूजन : सर्वप्रथम स्वच्छ व पवित्र अशा खोलीत वा देवघरात ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या समोर उजव्या बाजूला लाल रंगाचे व डावीकडे पांढऱ्या रंगाचे कापडी आसन अंथरावे. लाल आसनावर गव्हाचे स्वस्तिक बनवावे आणि पांढऱ्या आसनावर तांदळाचे अष्टदल कमळ बनवावे. गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्या समोर उजव्या बाजूला ठेवावे.
ॐ दीपस्थ देवताय नम:
या मंत्राच्या उच्चारणासह दिव्याला फुले आणि अक्षता वाहाव्यात.
ॐ गं गणपतये नम:
मंत्राचे उच्चारण करीत स्वत:ला व कुटुंबीयांना टिळा लावावा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
मंत्राचे उच्चारण करीत सर्वांच्या हाताला कांकण बांधावे. पुन्हा याच मंत्राचे उच्चारण करीत आपल्या शेंडीला गाठ मारावी. (शेंडी नसल्यास मनोमन गाठ मारावी.)
ॐ केशवाय नम: स्वाहा
ॐ माधवाय नम: स्वाहा
ॐ नारायणाय नम: स्वाहा
या तीन मंत्रांचे उच्चारण करीत तीन आचमन घ्यावे. आणि ॐ गोविन्दाय नम: मंत्र म्हणत हात धुवावे. आपल्या डाव्या हातात जल घेऊन उजव्या हाताने आपल्या अंगावर व पूजा- सामग्रीवर पुढील मंत्राचे उच्चारण करीत जल शिंपडावे.
ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
य:स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि: ।।
आपल्या आसनाखाली एक फूल ठेवून ‘ॐ हाँ पृथिव्यै नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मंत्राचे उच्चारण करीत भूमीला व आसनाला मनोमन नमस्कार करावा. मलीन वृत्ती आणि विघ्नबाधांपासून रक्षणासाठी आपल्या चोहीकडे थोडे तांदूळ अथवा मोहरीचे दाणे टाकावे.
ॐ अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: ।
ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया ॥
अर्थ : ‘कल्याणकारी देवाच्या कृपेने भूमीवरील विध्वंसक मलीन वृत्तींचा नाश होवो.’
आता हातात थोडी फुले घेऊन पुढील मंत्रोच्चारणासह आपल्या गुरुदेवांचे स्मरण करावे.
ॐ आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजभावयुक्तम् ।
योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि ॥
अर्थ: ‘आनंदस्वरूप, आनंददाता, सदैव प्रसन्नमुख, ज्ञानस्वरूप, निजस्वभावात स्थित, योगिजन व इंद्रादी देवांद्वारे स्तुत्य आणि भवरोगाचे वैद्य असलेल्या श्रीसद्गुरुदेवांना माझा नित्य नमस्कार असो.’
गुरुदेवांना मनोमन नमस्कार करून ती फुले थाळीत ठेवावीत. लाल व पांढऱ्या आसनाच्या मधोमध पुष्पासनावर गुरुदेवांची प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्रीगणपतीचे पुढीलप्रमाणे मानसिक ध्यान करावे.
ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ: निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अर्थ : ‘कोटी सूर्यांसमान महातेजस्वी, विशालकाय, वक्रतुंड गणराया ! तुझ्या कृपेने माझ्या सर्व कार्यांतील विघ्नांचे निवारण होवो.’
श्री गणपतीची मूर्ती थाळीत ठेवून ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मूर्तीला स्नान घालावे. स्वच्छ वस्त्राने मूर्ती पुसून गव्हाच्या स्वस्तिकावर दुर्वांचे आसन बनवून त्यावर गणरायाला स्थानापन्न करावे.