भोगीची भाजी
मकर संक्रांती ही वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे. वर्षाचा कालावधी जेव्हा दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात तो देखील मकर संक्रांतीद्वारे चिन्हांकित केला जातो. मकर संक्रांती ही वसंत ऋतूची सुरुवात असल्याने सूर्यदेवतेची पूजा करणे हा उत्सवाचा एक महत्त्वाचा विधी आहे.
नववर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). पण संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी (Bhogi) आणि दुसर्या दिवशी क्रिंक्रांत साजरी करण्याची पद्धत आहे. साधारणपणे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाते.
हा सण अधूनमधून १५ जानेवारीला येतो (ह्यावर्षी २०२३ ला १५ तारखेला आहे). भोगीचे एक विशेष आकर्षण असतं ते म्हणजे भोगीची भाजी (Bhogichi Bhaji). भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरीचा बेत घराघरांमध्ये असतो. ‘न खाईल भोगी तो राहील सदा रोगी’ अशी म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
Makar Sankranti Special Bhogi Bhaji Recipe in Marathi:
भोगीच्या दिवशी स्पेशल भाजी करण्याची पद्धत महाराष्ट्रातील विविध भागात आहे. भोगीच्या भाजीची टेस्ट ही वेगवेगळ्या भागात आपल्या पद्धतीने वेगवेगळी असते.
या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आणि हिवाळ्यात मिळणाऱ्या मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या आरोग्यदायी भाज्या असा बेत असतो. घेवडा, हरभरा, बोरं, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा या खास भाज्या हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात.
या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरे आणि खसखस असे गरम पदार्थांचा समावेश केल्यास हिवाळ्यात शरीराला गरजेची उर्जा उपलब्ध होते. सोबतच भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरे आणि खसखस असे गरम पदार्थांचा समावेश केला जातो, हे असे सुयोग्य मिश्रण हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप चांगले आणि हितकारक असते.
भोगीची भाजीसाठी साहित्य: (bhogi bhaji ingredients)
1 चिरलेला बटाटा,
1 मध्यम आकाराचं चिरलेलं वांगे
1 चिरलेलं गाजर
1 अर्धी वाटी ताजे मटार
1 अर्धी वाटी ओले हिरवे हरभरे
1 मोठा चमचा भिजवलेले शेंगदाणे,
1 मोठी शेवगाची शेंग (लांब काप केलेली)
2 चमचे तिळकूट
2 चमचे चिंचेला कोळ
1 मोठा तुकडा गूळ
मोठा चमचा ओलं खोबरं
चवीपुरते मीठ, फोडणीचं साहित्य
भोगीची भाजी पाककृती : (Bhogi Special Dish)
एका मध्यम आकाराच्या कढईमध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या, त्यानंतर कढईमध्ये तीळ आणि त्यानंतर किसलेले खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून शेंगदाणे, खोबरे आणि तीळाची व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करुन घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाका. या तेलामध्ये अर्धा चमचा जीरे टाका. जीरे व्यवस्थित तडतडल्यानंतर गॅस मंद आचेवर करा आणि त्यामध्ये शेंगदाणे-तीळ-खोबऱ्याची पेस्ट टाका.
दोन ते तीन मिनिटं पेस्ट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला, धणे पूड, लाल तिखट टाका. हे सर्व मसाले दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बटाट्याचे तुकडे, मटार, हरभरा, वाल पापडी, गाजरचे तुकडे या सर्व भाज्या टाकायच्या. या भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाका.
या भाज्या थोड्याश्या शिजायला लागल्यानंतर त्यामध्ये वांग, शेवग्याची शेंग टाकायची. कारण वांग- शेवग्याची शेंग लवकर शिजते त्यामुळे त्या नंतर टाकायच्या. झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये बोराचे तुकडे देखील तुम्ही टाकू शकता त्यामुळे भाजी चविष्ट लागते.
त्यानंतर यामध्ये एक चमचा चिंचेचा कोळ, थोडासा गूळ आणि चवीसाठी मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्या. पाच ते सात मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. अशाप्रकारे भोगीची खमंग भाजी तयार होईल.
बाजरीची भाकरी पाककृती (Recipe)
साहित्य: – दोन कप बाजरीचे पीठ, पाणी , चवीपूरते मीठ, पांढरे तीळ
कृती – अशी तयार करा बाजरीची भाकरी – :
एका परातीमध्ये बाजरीचे पीठ घ्या. त्यात गरजेनुसार मीठ टाका. थोडं थोडं पाणी टाकून तीन ते चार मिनिटं हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. या पीठाचे भाकरी तयार करण्यासाठी गोळे तयार करुन घ्या. पोळपाट घेऊन त्यावर थोडसं कोरडं बाजरीचे पीठ टाका आणि पीठाचा गोळा ठेवून भाकरी थापून घ्या.
त्यानंतर या भाकरीवर तुम्ही पांढरे तीळ सर्वबाजूला पसरवून दाबून घ्या. त्यानंतर गरम तव्यामध्ये तीळ लावलेली भाकरीची बाजू खालच्या बाजूला टाका. भाकरीला पाणी लावून घ्या. भाकरी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. अशाप्रकारे आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार होईल. भोगीच्या भाजीसोबत तुम्ही ही भाकरी खाऊ शकता.