ईश्वरीय प्रदेशाचे धगधगते वास्तव बदलू या..
ईशान्य भारत. भारताच्या पूर्वोत्तर सीमेवर सात प्रदेशांचा लखलखता ईशान्य कोपरा. जिथे आदित्य सर्वात प्रथम आपले आशिर्वाद देतात, जे एक साक्षात ईश्वरीय वस्तीस्थान आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेला हा अदभूत प्रदेश म्हणजे जणु काही निसर्गाने आपल्या मानाने सजवलेला, मढवलेला भारतभूचा एखादा सुंदर दागिना. नैसर्गिक संपन्नतेने समृध्द अशा या प्रदेशात दीडशेहून अधिक जन-जमातींचे वास्तव्य आहे. इतिहास आणि कला यांचा विलोभनीय वारसा डौलाने मिरवताना, आपला समाज भारतीय संस्कृतिच्या विविधतेची साक्षात प्रचिती देतो.
पण, या वैभवी भूप्रदेशाच्या सुंदरतेला सध्या ग्रहण लागल्यासारखं झालं आहे, या भूमीला आज अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु या काळात देशभर अमृत कलशातील अमृताचे थेंब भारतभर पडत होते, कोठे कमी कोठे जास्त, पण ह्या भागात कधी ते थेंब पडलेच नाहीत. सतत दुर्लक्षित असा हा भारतीय भूभाग..
देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्ष होतील, तरी विकासापासून हा भाग उपेक्षितच राहीला हे नवल नाही का ?. सीमे लगतचे म्यानमार आणि बांगलादेश यांच्याकडून सततची घुसखोरी, अमली पदार्थांचा अवैध व्यापार, क्रूर हिंसाचार घडवून आणणारे फुटीरता
वादी बंडखोर गट; कित्येक दशकांपासून सर्रास झालेले इथले आदिवासी लोकांचे धर्मांतरण, अशा एकापेक्षा एक आत्याचारांनी हा प्रदेश होरपळून निघतो आहे.
त्यातच भर म्हणजे, धूर्त चीनचा कावेबाजपणा इथल्या लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. कारण इथल्या स्थानिकांची शरीरयष्टी व चेहरेपट्टी मंगोलियन वंशाशी मिळती-जुळती आहे. त्यामुळे आपण भारतीयांहून वेगळे आणि चीनी लोकांसारखेच आहोत, अशी इथल्या स्थानिक लोकांच्या मनात चायनीज एजेंट बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या भावनेला चीन सीमेपलीकडून खोडसाळपणे खत पाणीच घालतो आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना या भूमीत कधी रूजूच शकली नाही.
अशाप्रकारे अनेकानेक समस्यांनी ग्रस्त आणि भारतापासून मनाने दूर गेलेल्या या प्रदेशातल्या लोकांची मने भारतीयांशी जोडून ठेवणे हे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. काही झालं तरी आपल्या या देशबांधवांना आपल्यापासून तुटू न देता, त्यांच्याशी आपुलकीचं आणि जवळकीचं दृढ नातं जोडायला हवं!
त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन देशाच्या एकात्मतेची बीजं या भूमीत पेरायला हवी, या विचारांनी ईशान्य भारताच्या कल्याणाचे ध्येय घेऊन आज काही व्यक्ती , संघटना व संस्था इथे कार्यरत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या विकासाची वाट तयार होते आहे. आशेच्या प्रकाशाची किरणे पूर्वोत्तर भागात डोकावू लागली आहेत. हे असे आशादायक चित्र निर्माण होताना त्यामागे फार मोठ्या त्यागाची आणि दृढ निर्धाराची एक हृदयंगम कहाणी आहे.
ही कहाणी सा-या देशवासियांनी जाणून आणि समजून घ्यायला हवी!
कुठलेही कार्य तेव्हाच महान ठरते जेव्हा ते प्रतिकूलतेवर मात करून अनेक अडथळे पार करून मोठ्या हिंमतेने ऊभे राहीलेले असते. कुणाचा तरी त्याग , कुणाचे तरी कष्ट त्यामागे पहाडासारखे ऊभे असतात. असे भव्य-दिव्य कार्य प्रत्यक्षात साकार होताना पाठीशी असायला लागते भक्कम पाठबळ आणि दिव्य प्रेरणा. अर्थात, अशी प्रेरणा आणि पाठबळ मिळण्यासाठी एखादी घटना तरी कारणीभूत होते किंवा एखाद्या थोर व्यक्तीचे शब्द तरी चेतना देऊन जातात. ईशान्य भारतामध्ये आज दिसत असलेले मोठे ध्येयवादी कार्य ऊभे राहीले आहे, त्यावेळी असेच घडले.
सुमारे 1968-69 सालीची गोष्ट. छत्तीसगड मधील कल्याण आश्रमाच्या एका कार्यक्रमात आदरणीय गोळवलकर गुरुजीं बोलत असताना त्यांनी ईशान्य भारताच्या विदीर्ण स्थितीबद्दल घोर चिंता व्यक्त केली आणि सर्व देशवासियांनी ईशान्येकडील या बांधवांविषयी आपुलकीची भावना बाळगून त्यांच्याशी दृढ नाते निर्माण करायला हवे,असा विचार बोलून दाखवला. प.पू. गोळवलकर गुरुजीनी मनापासून, अगदी तळमळीने काढलेल्या त्या वक्तव्याचा श्री. शंकर दिनकर काणे म्हणजेच भय्याजी यांच्या मनावर खोलवर परीणाम उमटला. त्यांच्या शब्दांनी एक प्रकारची नवचेतना मनात निर्माण झाली.
ध्येय व प्रवास
ध्येयाने झपाटून वेडे झाल्याशिवाय कुठलेही भरीव कार्य भक्कमपणे ऊभे राहू शकत नाही. याच उक्तीचा प्रत्यय येतो, जेव्हा श्री.भय्याजी काणे यांचे मणिपूर राज्यात आज ऊभे असलेले भव्य कार्य बघायला मिळते, तेव्हा शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे बदलत असलेले जीवन यांचा आलेख पाहता, हा सर्व रोमांचक व थरारक प्रवास मुळातून आणि सुरवातीपासून जाणून घ्यायलाच हवा.
श्री.भय्याजी काणे मुळातच हाडाचे शिक्षक. संस्कृत विषयाचे पदवीधर. काही काळ वायु दलात सेवा बजावून त्यांनी पुढे महाराष्ट्र, कर्नाटक ( प्रचारक ) आणि छत्तीसगड मधल्या अनेक दुर्गम भागात शिक्षक म्हणून काम केले. विद्यार्थ्याना आईची माया देणारे भय्याजी जिव्हाळ्याच्या नात्याने विद्यार्थ्यांना लगेच आपलेसे करीत असत.
त्यांच्यातल्या याच शिक्षकाने अतिशय प्रतिकूल अशा वातावरणात नव्या आव्हानांचा स्वीकार करून, ईशान्य भारतात प्रत्यक्ष तिथे राहून शिक्षणाचे काम करायचे ठरवले. त्याचवेळी त्यांचे स्नेही मधुभाऊ हर्डीकर, काका हर्डीकर व अन्य काही जणांनी भय्याजींना कोकणातील राजापूर तालुक्यातील अंतर्भागातल्या “कोंड्ये” या गावात शाळा सुरू करण्याची विनंती केली.
भय्याजींनी त्यांना आपला ईशान्येस जाण्याचा मानस बोलून दाखवला. ते ऐकल्यावर सर्व मित्र मंडळी व सहका-यांनी भय्याजींना एक वर्ष तरी राजापूर परिसरात राहून मगच पुढचा निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला. त्यानुसार ‘कोंड्ये’ या गावी 1970 साली शाळा सुरू करण्यात आली. नाना हर्डीकर , मधुभाऊ व काका हर्डीकर यांनी पंचक्रोशीतून, वाडी-वस्तीतून शाळेला विद्यार्थी गोळा करून आणले. त्यापैकीच एक विद्यार्थी होते जयवंत गणपत कोंडविलकर.
फक्त बारा वर्ष वयाचा छोटा जयवंत यांची हुषारी, चुणचुणीतपणा आणि अभ्यासाची प्रामाणिक तळमळ बघून भय्याजींच्या मनात त्यांच्याविषयी एक भावनिक बंध विणला गेला. हाच जयवंत पुढे भय्याजींसोबत ईशान्य भारतात गेला आणि एका महान राष्ट्रकार्याचा सहयोगी प्रणेता ठरला.
जयवंत गणपत कोंडविलकर
त्याचे असे झाले की, वर्ष 1971मध्ये भारत – पाकिस्तान युद्ध सुरु झाले. ईशान्येकडील भागावर याचा काय परिणाम होईल, या विचाराने युध्दाची ही बातमी ऐकून भय्याजी अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच मणिपूरला जाण्याचा निर्णय घेतला. जाताना जयवंतलाही सोबत नेण्याचा विचार त्यांनी मनोमन पक्का केला होता.
राजापूरच्या शाळेत ठरल्याप्रमाणे एक वर्ष काढल्यावर भय्याजी मणिपूरला निघाले. आपल्या बरोबर जयवंताला मणिपूरला घेऊन जाण्याची इच्छा त्यांनी काका हार्डीकरांकडे व्यक्त केली आणि त्यांच्यामार्फत जयवंतच्या वडिलांनाही कळवली. पण एवढ्या लहान मुलाला हजारो मैल दूर अशा अनोळखी ठिकाणी पाठवायला जयवंतच्या पित्याचे मन धजावले नाही. अखेरीस भय्याजी एकटेच मणिपूरला निघून गेले.
त्यानंतर काही वेगळेच घडले. एक दिवस काका हर्डीकर कोंडविलकरांच्या घरी आले. त्यांनी जयवंताला ईशान्येच्या प्रस्थानाची योजनासमजावून सांगिली. जयवंत या योजनेस तयार झाला. त्यानंतर काकांनी जयवंतच्या वडिलांना सांगितले “मी मणिपूरला काणे सरांना भेटायला जात आहे. जयवंतालाही सोबत घेऊन जातो. थोडेच दिवसात आम्ही परत येऊ. जयवंतला सुखरूप पुन्हा आणून सोडतो” ब-याच विनवण्या केल्यावर अखेर जयवंताचे आई वडील तयार झाले. जयवंत राजापूरहून मणिपूरला निघाला; परंतु, लगेच परत येण्यासाठी नव्हे! त्याचा तेथील कार्यकाळ नियतीने आधीच ठरवला होता.
ध्येयवादी प्रवास
जून 1972 ला भय्याजी काणे आणि त्यांचा लाडका विद्यार्थी जयवंत यांची इम्फाळमध्ये पुन्हा भेट झाली. इम्फाळच्या कार्यालयात काही दिवस राहून पुढे ते मणिपूरची राजधानी इंफाळ जवळच्या ‘उखरूल’ गावाकडे जायला निघाले. म्यानमार सीमेपासून जवळ असलेलं हे ठिकाण फुटीरतावादी अतिरेक्यांचा मोठा अड्डाच होता. भारत विरोधाची भावना तिथे अतिशय प्रबळ होती. यावरूनच लक्षात येते की, भय्याजींना जे काम करायचे होते, तेथील सर्वच गोष्टी हे काम सुरू करण्यात किती भयंकर अडथळा निर्माण करणा-या होत्या.
मणिपूरचे स्थानिक लोक भय्याजींना त्यांचं नाव विचारीत, नाव सांगितल्यावर “याचा अर्थ, तुम्ही भारतातून आलेले आहात, आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुम्ही इथे राहताच कसे, आम्ही तुम्हाला येथे राहूच देणार नाही” वगैरे धमक्या देत. अखेर भय्याजींच्या लक्षात आले की इथे राहून लगेच कामाला सुरूवात करणे सोपे नाही. विरोधी प्रवृत्तींशी लढण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा त्यांनी तात्पुरती माघार घ्यायचं ठरवले. ते जयवंताला म्हणाले, “ही तात्पुरती माघार आहे, आज ना उद्या आपल्याला पुन्हा ‘उखरू’ ला यायचंय. या भागात आपले बस्तान बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.”
एकूणच सीमावर्ती भागातील ही सारी जनता भारत विरोधी मानसिकता बाळगून आहे, हे प्रकर्षाने जाणवत होते. असे विरोधी वातावरण हे संपूर्ण देशाच्या भविष्यासाठी फार धोकादायक ठरणार, हे लक्षात येत होते. हा प्रचंड विरोध झेलून इथला एक एक माणूस आपल्या विचारांकडे वळवायला हवा. त्यांच्या मनातले गैरसमज दूर करून देशप्रेम जागे करायला हवे, हे आव्हान फार मोठे आहे,पण ते स्वीकारायलाच हवे, भैय्याजींचा निर्धार पक्का झाला.
ते जयवंताला म्हणाले, ” इथे राहून तुला दोन-चार मित्र जरी जोडता आले तरी आपल्या राष्ट्र कार्यासाठी त्याचा फार उपयोग होईल.” पण त्यावेळी तरी त्या दोघांना ‘उखरुल’ मधून निघावे लागले.उखरूल पासून 35 किलोमीटर दूर ” चिंगजोराय ” या ठिकाणी ते गेले. त्यानंतर एका वर्षाने, 1973 मध्ये त्यांनी ‘न्यू तूसोमला’ येथे मुक्काम हलवला. न्यूतूसोम भारताच्या हददीतील शेवटचे गाव . या गावापासून केवळ सहा किलोमीटर वर म्यानमार मधील गाव आहे.
सीमावर्ती भारत
‘न्यू तूसोमला’ येथे असताना एके दिवशी भय्याजींना त्यांच्या आईच्या मृत्यूची तार मिळाली. अत्यंत शोकाकुल अवस्थेत भय्याजी सांगलीला परत निघाले, मात्र त्याही स्थितीत पुढील कार्याची योजना त्यांच्या मनात सुरूच होती. शालेय मुलांना शिकवण्याच्या इथल्या कामातून आपले संपूर्ण इप्सीत साध्य होणार नाही, त्यासाठी स्थानिक तरूणांना देशातल्या विविध प्रांतामध्ये शिक्षणासाठी ठेवले तर?
हा असा अतिशय धाडसी विचार त्यांच्या मनात चमकून गेला. असे केले तर या इथल्या भावी पिढीला वेगवेगळ्या भारतीय समाजाची ओळख होईल. विविध समाजात मिसळण्याची संधी मिळेल. लोक सहवासाने मनातले भेदाभेद दूर होतील. देशातील वस्तुस्थिती लक्षात येईल. ईशान्य भारतातील आणि उर्वरीत राज्ये यांच्यात मनोमिलन घडून आले तर विघातक शक्तींचे पितळ उघडे पडेल.
शिकून शहाणी झालेली मुले ईशान्येला परत येतील तेव्हा संपूर्ण भारताबद्दलची आपुलकी आणि देशभक्तीची भावना त्यांच्या मनात जागी झालेली असेल.नव तरूण नागरिकांची एक देशभक्त पिढी नव्या फळीच्या रूपात तयार होईल. त्यांच्याच बळावर देशाच्या सीमा मजबूत करता येतील.
खरोखर असे सारे अनुकूल तेच घडले तर, फुटीरतावाद नष्ट होईल. हा जो अचूक भविष्यवेधी विचार भयाजींच्या मनात आकारला होता; तो झपाटून टाकणारा होता.पण असा प्रयोग प्रत्यक्षात घडवून आणणे सोपे नव्हते. ईशान्येतील लोक हजारो मैलांवर दूर आपली मुले पाठवायला तयार होतील का, हा खरा मुख्य प्रश्न होता.
अर्थात असे धाडसी प्रयोग प्रत्यक्षात करून पाहिल्याशिवाय त्याचे परीणाम कसे समजतील, या विचाराने भय्याजींनी प्रयत्न सुरू करायचे ठरवले. या कामी दोन विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्या पालकांशी बोलणी सुरू केली. निवडलेल्या त्या दोन्ही विद्यार्थ्यांना भय्याजींबद्दल नितांत जिव्हाळा होता. म्हणूनच ते दोघे लगेच त्यांच्याबरोबर यायला तयार झाले. अर्थात पालकांना समजावणे अवघड होते. परंतु, एक गोष्ट आशादायक अशी घडली होती की, एव्हाना जयवंताला स्थानिक लोक एक आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखू लागले होते. तो जसा अभ्यासात हुषार आहे, तसाच खेळातही निपूण आहे, खूप काम करतो आणि सर्वांशी छान बोलतो. आपलीही मुले अशीच होतील, अशी आशा इथल्या आई-वडिलांना वाटू लागली.
सीमावर्ती भागाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न व रूपरेखा
जयवंतला मणिपूरला सोबत नेण्याचा भय्याजींचा हाच तर मूळ हेतू होता. अशाप्रकारे हळूहळू तो साध्य होऊ लागला होता. जयवंताचे असे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर असल्याने भयाज्जींनी निवडलेल्या दोन मुलांचे पालकही अखेर तयार झाले. जयवंत आणि ती दोन मणिपूरी मुले घेऊन भैय्याजी सांगलीला आले. आईच्या क्रियाकर्मासाठी सांगलीला आलेल्या भय्याजींनी आपल्या सांगली भेटीचा चांगला उपयोग करून घेतला. एका अर्थाने हा पुढील योजनेचा पायलट प्रोजेक्टच ठरला.
सांगलीला आल्यावर ती दोन मुलं मिरजेच्या एका इंग्रजी शाळेत चौथीच्या इयत्तेत शिकू लागली. 1973 ला शैक्षणिक वर्ष संपलं आणि भय्याजी जयवंतासह त्या दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा मणिपूरला आले. त्या मणिपूरी मुलांची चांगलीच प्रगती झालेली दिसत होती. त्यांच्यात घडून आलेला कमालीचा बदल पाहून त्यांच्या पालकांना खूप आनंद झाला. त्यांच्याकडे पाहून इतर पालकही आपल्या मुलांना स्वतःहून भय्याजींबरोबर पाठवायला तयार झाले. म्हणजेच, भय्याजींचा पायलट प्रोजेक्ट कल्पनेपेक्षाही खूपच यशस्वी ठरला.
काही काळानंतर भयाजी पुन्हा महाराष्ट्रात यायला निघाले, तेव्हा त्यांच्याबरोबर येण्यासाठी दहा ते बारा मुलं तयार झाली होती. परंतु तरीही त्यांच्या पालकांच्या मनात थोडी चलबिचल होती. शेवटी सगळे भय्याजींकडे गेले आणि म्हणाले, “शब्द” दिल्याप्रमाणे आम्ही आमची मुलं तुमच्याबरोबर पाठवतोय, तसंच तुम्हीही आमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या जयवंताला आमच्या मुलांच्या बदल्यात हमी म्हणून आमच्याकडेच ठेवा. तो सध्या इथल्या शाळेत जातोय तसाच जात राहील. त्याची सर्व काळजी आम्ही घेऊ, तुम्ही निश्चिंत रहा. एका अर्थी जयवंताला हे ओलीस ठेवणेच होते. मात्र आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोरून जराही ढळू न देता, जराही विचलित न होता पालकांच्या या तऱ्हेवाईक मागणीला भय्याजींनी तात्काळ होकार दिला.
संध्याकाळी जेव्हा भय्याजींनी जयवंताला ही गोष्ट सांगितली, तेव्हा छोट्या जयवंतावर जणू आकाशच कोसळलं. तो बालसुलभ भावनेने व्याकूळ होऊन रडायला लागला. त्याने भय्याजींना खूप विनवण्या केल्या. पण भय्याजींनी आपल्या खास शैलीत गुरु गोविंद सिंगांच्या मुलांनी केलेले बलिदान, ध्रुव बाळ, चिलीया बाळ,अशा लहान मुलांच्या गोष्टी सांगून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
तरीही जयवंताचे रडणे थांबेचना, मग भैय्याजींनी शिवाजी महाराजांची “आग्र्याहून सुटका” या गोष्टीत बाल संभाजीचे धाडस व पित्याला एकटे सोडून राहणे याबद्दलची हकीगत सांगितली. बाल संभाजींच्या या धाडसाचा मात्र छोट्या जयवंतावर खूप प्रभाव पडला. महत् प्रयत्नांनी का होईना अखेर त्यांना जयवंताला समजावण्यात यश आले आणि जयवंता मणिपूरतील नागा लोकांसोबत भय्याजींना सोडून एकटा राहायला तयार झाला.
जून 1974 ची ही गोष्ट. बारा मुलांच्या तुकडीला घेऊन भय्याजीं सांगलीला आले. त्यांच्या राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था लावण्यात भय्याजींनी स्वतःला अक्षरशः झोकून दिले होते. भैय्याजींच्या अथक प्रत्नांनी सांगलीतच ही मुले अखेर शिक्षण घेऊ लागली. या लोकांना आपलंसं करायचं असेल तर हे सर्व कष्ट घ्यायलाच हवे, याबाबत भय्याजी ठाम होते.
इकडे जयवंतचीही मणिपूरी जीवनकहाणी नव्याने सुरू झाली होती. वर्ष 1976 ला जयवंत अकरावीत गेला. आता तो इतर मुलांना शिकवू लागला होता. नंतर रीतसर शिक्षक म्हणून अनेक वर्ष जयवंतजींनी नोकरीही केली. पुढे पदवी पर्यंतचे शिक्षण मणिपूर येथेच पूर्ण केले. तो सर्व कालखंड अत्यंत कसोटीचा होता.
अनेक वेळा त्यांच्यावर जीवघेणी संकटे आली; पण प्रत्येक वेळी जयवंतजींनी संकटावर मात करून त्यातून मार्ग काढला. अंगावर शहारे आणणारे कित्येक भयंकर प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. कित्येकदा जीवावर बेतले. या सा-या प्रसंगाचे वर्णन पुरुषोत्तम रानडे लिखित ‘आश्रु ईशान्येचे…. मिशन मणिपूर’ व प्रसिद्ध पत्रकार श्री सुधीर जोगळेकर लिखित “ओजा शंकर” या पुस्तकात सविस्तर लिहीलेले आहे.
या सर्व बिकट परिस्थितीतही जयवंतजी खंबीरपणे काम करत राहिले. हळूहळू स्थानिकांचा विश्वास जिंकला. 1985 पर्यंत तिथल्या शाळेत शिकवणे, मुलांची निवड करून त्यांना भय्याजींकडे पाठवणे, त्यांची पुढील व्यवस्था मार्गी लावणे, या कामात त्यांनी स्वतःला संपूर्णतः समर्पित केले.
सुवर्णकाळ
1973 ते 1996 पर्यंत भय्याजींनी सुमारे 250 ते 300 ईशान्ये भारतातल्या मणिपूर राज्यातील नागा , मैतेई व कुकी तरूणांची पदवी पर्यंत शिक्षणाची सोय केली. त्यासाठी सांगली, चिंचणी, बेळगाव, मैसूर, हैदराबाद, पुणे, अशा ठिकाणी निवासी वसतीगृहे सुरू केली . वसतीगृहात राहून शिकलेल्या या कुकी, रोंगमई, झिलियांग व तांखुल नागा व मैतेई जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व संस्कारातून राष्ट्रीय एकात्मता रूजवण्याचे मोलाचे कार्य साध्य झाले.
आपल्या देशाच्या सांस्कृतिची ओळख होऊन समता व समरसतेची रुजवण या मुलांमध्ये ओपोआपच झाली. ‘होय मी सुद्धा भारतीय आहे’ ही भावना ईशान्येच्या या नवतरूणांमध्ये बिंबवण्याचा हे कठीण कार्य भैय्याजी जिद्दीने शेवटपर्यंत करत राहिले. भय्याजींनी सुरू करून दिलेल्या या कामाला संस्थात्मक रूप येण्यासाठी, त्यास आर्थिक मदत मिळवण्यासाठी म्हणून वर्ष 1986 मध्ये मुंबईत एक ट्रस्ट सुरू करण्यात आला. त्या ट्रस्टचे नाव “पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान” भय्याजींनी सुरू केलेलं आणि जयवंतजी कोंडविलकर यांनी विस्तारलेले हे काम “पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान” च्या माध्यमातून अधिक जोमाने पुढे सुरू झाले.
1986 ते 1999 या कालावधीत या कार्यास भव्य स्वरूप प्राप्त झाले. अनेकांचे हात मदतीला आले. मणिपूर राज्यात पहाडी ग्रामीण भागातल्या तीन जिल्ह्यांमध्ये ट्रस्टतर्फे तीन शाळा सुरू केल्या. भैयाजी काणे यांच्या कल्पनेतून साकारलेले आणि कष्टातून ऊभारलेले स्वप्न अखेर सत्य झाले. मणिपूरी मुले शिकून समंजस व सुसंस्कारीत झाली. भैय्याजींच्या जीवनाची जणु इतिकर्तव्यता झाली.
निर्वाण आणि समाधान
अखेर तो दुःखद क्षण आला. दि. 26 ऑक्टोबर 1999 या दिवशी भय्याजींचे अल्पशा आजाराने निधन झाले. सन 2000 साली प्रथम स्मृती दिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भैय्याजींचे माजी विद्यार्थी आणि पालक ‘उखरुल’ मध्ये मोठ्या संख्येने जमले. त्याच उखरुल मध्ये. जिथून 1972 साली भय्याजींना छोट्या जयवंतासह माघार घ्यावी लागली होती.
‘उखरुल’ पासून 85 किलोमीटरवर असलेल्या ‘खारासोम’ नावाच्या गावातही भय्याजीं यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम भावपूर्ण रीतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘खारासोम’ गावच्या प्रमुखांनी भय्याजींना श्रद्धांजली म्हणून पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानला एक एकर जागा देण्याचा ठराव ग्राम सभेत मंजूर करून घेतले.
त्याच जागेत भय्याजींच्या स्मृती प्रित्यर्थ एक शाळा सुरू करावी असा मानस जयवंतजींनी सर्व ग्रामस्थां समोर बोलून दाखवला. ज्या खारासोम मध्ये सुरुवातीच्या काळात बाहेरून आलेल्या माणसाला पाय ठेवणे शक्य नव्हते, तिथे घडलेली ही शाळेसाठी जागा देण्याची घटना म्हणजे एक क्रांतीच म्हणायला हवी.
भय्याजी आणि जयवंतजी यांच्या कामाची ही रोख पावतीच होती. आज या जागेवर पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान संचलित ‘ओजा शंकर विद्यालय’ ही शाळा मोठ्या डौलाने उभी आहे. या शाळेत अनेक विद्यार्थी शिकत आहेत. ज्या भागातले लोक भारताला आपला देश न मानता परका देश समजत होते, भारताचा स्वातंत्र्यदिन, तिरंगा ध्वज आणि राष्ट्रगीत जिथे वर्ज्य होते, तिथल्याच या शाळेत प्रत्येक दिवसाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होते आणि 15 ऑगस्ट थाटात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतो. हे परिवर्तन सामान्य कोटीतले नव्हे! उच्च कोटीचा त्याग आणि अनंत कष्टाने हाती आलेली ही राष्ट्रीय भावनेची दौलतच म्हणायला हवी.
परिणाम व नवदिशा
“पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान” तर्फे अशाच प्रकारे दुसरी शाळा ईम्फाळच्या पश्चिमेला साधारण 155 किलोमीटर अंतरावर ‘ तमें गलॉंग’ इथे सुरू आहे. तसेच, इम्फाळपासून जवळच 75 किलोमीटरवर ”चुराचांदपुर जिल्ह्यात ‘ङलोईमोल’ इथे संस्थेतर्फे तिसरी शाळा स्थापन झाली आहे. या सा-या शाळांची जबाबदारी भयाजींचीचेच विद्यार्थी समर्थपणे पार पाडत आहेत.
उत्तरोत्तर या संस्था वाढतच आहेत. विद्यार्थी संख्या दर वर्षी वृध्दींगत होत आहे. या शाळांमधून शिकणारे आणि शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी अंमलीपदार्थाचा व्यापार वा सेवन, फुटीरतावादी कारवाया यापासून दूर आहेत. शिक्षणाबरोबर जीवनमूल्यांचा संस्कार या लोकांचे जीवन उन्नत जीवनशैलीकडे घेऊन जाण्यास पुरेसा आहे.
शिक्षणाबरोबरच राष्ट्रीयत्वाचे, एकात्मतेचे हे जे संस्कार या शाळांमधून विद्यार्थ्यांवर होत आहेत, ती जीवनमूल्ये लाख मोलाची ठरत आहेत. आता तर प्रत्येक शाळेत राष्ट्रगीता बरोबरच ‘वंदे मातरम्’ देखील आनंदाने म्हटले जाते. शाळा भरताना “हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए” ही प्रार्थना गायली जाते आणि शाळा सुटताना “हे परमात्मा जगननिवासा” या प्रार्थनेचे सूर शाळेच्या ईमारती बाहेरच्या डोंगरद-यातून घुमत राहतात.
कित्येक भारतीयांचा विश्वास बसणार नाही, परंतु 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिवस मणिपूर मध्ये आतंकवादी संघटनांच्या तर्फे ब्लॅक-डे म्हणून घोषित होतो, पण तरीही पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळांमध्ये मात्र मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
अशा प्रकारे 1971 मध्ये भय्याजी काणेंनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आज विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्रातील स्वयं सेवक व स्थानिक लोकांच्या प्रतिसादामुळे या कार्याची जी पाळेमुळे इथल्या भूमीत रूजली, त्याचा विस्तार पाहून अंतःकरण समाधानाने भरून पावते.
हे इतके मोठे समाधान असले तरी हा संघर्ष मात्र अजून मुळीच संपलेला नाही. आजही ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते अनेक समस्यांना तोंड देत आहेत.अनेक संकटाशी दोन हात करून भिडत आहेत. मोठ्या धैर्याने आणि खंबीरपणे भैयाजींचे कार्य पुढे नेण्यासाठी कष्टाःची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
जनसहभाग गरजेचा
भैयाजींचा लाडका जयवंत म्हणजेच श्री जयवंतराव कोंडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते “पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान”चे हे महनीय कार्य धडाडीने, चिकाटाने, जिद्दीने पुढे नेत आहेत. दूरवरच्या ईशान्य कोप-यात समाज शिक्षणाच्या माध्यमातून ‘माणूस निर्माणा’च्या या विलक्षण कार्यात खरी गरज आहे ती, सर्व देशवासियांच्या सक्रिय सहभागाची.
हा सहभाग प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार करायचा आहे, आपल्यापरीने या पवित्र कार्यात कसे सहभागी होता येईल, याबाबत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आपल्याला नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील. अशा कार्यात सर्वात जास्त आथिर्क मदतीची गरज असते त्यासाठी प्रतिष्ठानला आवश्य संपर्क करावा.
अजून काय लिहावे, लोभ असावा. आपला सहभाग असावा ही, विनम्र विनंती!
धन्यवाद 🙏
संस्थेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – जयवंत कोंडविलकर . भ्रमण ध्वनी – 9619720212 / 8356884015.
तुम्ही स्वतः: येथे मदत करु शकता, संस्थेच्या बँक खात्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
Please Draw Cheque OR Demand Draft in the name of ” Purva Seema Vikas Pratishthan”
Bank Details as follows:
( 1) State Bank of India ,
A/C No.36010562938 ,
IFS Code SBIN0017415 ,
Station Road VileParle Br. , Prime Business Park , Vile Parle ( w ) , Mumbai – 400056
Purva Seema Vikas Pratishthan ,.
A/C with Dombivli Nagari Sah.Bank Ltd , A/C no. 008010100010452 , kvp Br. IFSC Code – DNSB0000008 , Dombivli ( E) 421203
सरळ खात्यामध्ये पैसे भरल्यास वा पाठवल्यास केल्यास पैसे पाठविणाऱ्याचे पूर्ण नाव ,पत्ता , contact number , ज्या बँकेतून पैसे पाठविलेत त्या बँकेचे नाव , ब्रँच चे नाव , दिनांक, रक्कम व पॅनकार्ड नंबर श्री अनिरुद्ध गद्रे – 9819460331 यांना कळविण्याचे कष्ट घ्यावेत ही नम्र विनंती.