घटोत्कच भाग – १ – पांडव वनवासात असताना राक्षस कुळातील हिडिंब आणि त्याची बहीण हिडिंबा या दोघांचा सामना झाला हिडिंब ने भीमाला युद्धाचे आवाहन दिले तर भीमाची शरीरयष्टी पाहून हिडिंबा त्यावर मोहित झाली, भीम व हिडिंबचे घनासाम युध्द सुरु झाले. डाव प्रतिडाव होत होते, एकाएकी भीमाने हिडिंबला खडकावर आपटले व उजवा पाय त्याच्या गळ्यावर खोलवर रुतवला व रगडायला लागला.
हिडिंबाने क्षणमात्र भावाचे शव पाहिले व मान फिरवली. तिच्या डोळ्यासमोर कर्पदिकेचा अश्रू भरला करुण चेहरा आला. तिच्या पित्याने दिलेली शापवाणी आठवली. भीमाचा आवेश कमी होत नव्हता. हिडिंबचा निष्र्पाण देह तुडवितच होता. पुरे भीमा, प्राण गेल्यावर युध्द, वैर सारे संपते. शांत हो! युधिष्ठीर म्हणाले. ज्या भावाची मजल तिला खाऊन टाकण्यापर्यत गेली होती, त्याच्या मरणाचे तिला किंचितही दुःख झाले नाही.
हिडिंबाकडे लक्ष जाताच सौम्य शब्दात भीम म्हणाला, हिडिंबा, क्षमा कर! तुझ्या भावाला असे मरण आले, पण अटळ होते. माता कुंती आपल्या पराक्रमी पुत्राला कौतुकाने बघत होती. हिडिंबाकडे लक्ष जाताच, मातेने विचारले कोण तू? इथे कशी व कां आलीस? बैस या शिळेवर! तुझ्या हावभावावरुन तू भीमावर अनुरक्त झालेली दिसते. मग हिडिंबाने कांहीही न लपवता धुधुंजा, कर्पदिका भेट, सारी सविस्तर माहिती कथन केल्यावर कुंतीमातेने पांचही पुत्रांची ओळख करुन देत म्हणाल्या, अन्य बर्याच गोष्टी यथावकाश कळेलच.
भीमा! या मुलीने तिच्या मनीचे भाव स्पष्टपणे उघड केले. तुझी काय इच्छा आहे? माते! तुझ्या व जेष्ठाच्या आज्ञा व इच्छेविरुध्द मी कांही करत नाही हे तूं जाणतेस. तरी पण! माते! जेष्ठाच्या विवाहाआधी माझा विवाह? मातेने हिडिंबाला जवळ घेऊन तिच्या मस्तकावर हलकेच ओठ टेकवले. इतक्या प्रेमाने तर धुधुंजानेही जवळ घेतले नव्हते. हिडिंबा तूं माझी प्रथम स्नुषा! पहिल्या सुनेचे सुनमुख अशा विजनवनात व विचित्र परिस्थितीत बघावे लागत आहे.
भीमा, घटका भरात तुझा गांधर्व विवाह उरकवून टाकू. भीमाच्या मुखावरील संकोच, हर्ष, अवघडलेपणा बघून सारेच हसू लागले. विवाहापूर्वी हिडिंबाच्या शवाला रितसर मंत्राग्नी दिल्यावर, भीम, हिडिंबाचा गांधर्वविवाह आटोपला. महाराज पंडु व राजमाता कुंतीची प्रथम स्नुषा होण्यासारखे महान भाग्य कुणाला कधीही लाभले नव्हते.
हिडिंबा मनात म्हणाली, आता आपण जेष्ठ सुनेचे कर्तव्य पार पाडून सर्वांना शक्य तेवढे सुखात ठेवायचे आहे. निदान या भयंकर अरण्यात असेपर्यंत तरी. एका सकाळी हिडिंबाने चरणस्पर्श करीत कुंती मातेला म्हणाली, माते, या अरण्यात कांही अंतरावर छोटे सुंदर शालिवाहन अतिपवित्र सरोवर आहे. तिथे साक्षात उमा-महेश, देवराज इंद्र अप्सरांसह अदृष्यपणे क्रीडा करायला येतात अशी आख्यायिका आहे. सर्वानी तीथे चलावे.
संध्याकाळ पर्यंत सारे शालीवाहन सरोवरतीरी पोहोचले. तिथे हिडिंबाने सारे कौशल्य व स्थापत्यशास्रातील तिला असलेल्या ज्ञानाच्या आधारे सर्वांसाठी सर्वांसाठी सुंदर निवासस्थान निर्माण केले. अचानक महर्षी व्यासांचे आगमन झाले. सर्वांनी त्यांचे चरणस्पर्श केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांचे पादक्षालन व पुजा केली.
हिडिंबाने नमस्कार केल्यावर तिची ओळख करुन देत कुंती म्हणाल्या, भगवान! ही आपल्या भीमाची पत्नी हिडिंबा! नुकताच गांधर्व विवाह झाला आहे. आशिर्वाद देत ते म्हणाले, कुंंती ही तुझी प्रथम स्नुषा, आजपासून अष्टमास व आठ दिवसांनी एका अलौकिक पुत्रास जन्म देईल. तो अतुल पराक्रम करुन किर्तीमान होईल. आजपासून हि कमलमालिनी म्हणून ओळखल्या जाईल. लौकरच श्रीविष्णूचा अवतार असलेली विभूती भेटेल. पुनः सर्वांना आशिर्वाद देत अंतर्धान पावले.
नियती, माता व जेष्ठ भावाच्या सम्मतीने व भीमाच्या इच्छेने हिडिंबाशी विवाह झाला. नकुल सहदेवने त्यांच्यासाठी एक सुरेख कुटी बांधली पण सर्वांना सोडून भीमाने तिथे राहण्यास स्पष्ट नकार दिला. कुटीत हिडिंबा राहिल, मधूनमधून तिच्या कुटीत जात जाईल.
माता म्हणाली, भीमा, हिडिंबा तुझी पत्नी आहे. पतीचेही कांही कर्तव्य असते. ते मी पार पाडीन अरे पण, तुम्ही दोघांनी एकमेकांच्या आवडी, सवयी, सुख दुःख एकत्रीत राहिल्याशिवाय कशा कळतील. आम्हाला तरी तुमच्यापासून दूर राहायला कसे आवडेल? फक्त कांही मास. हव तर ही माझी आज्ञा समज!
क्रमशः
लेखक : DR.MANTRI