उंबरा / उंबरठा

Moonfires
उंबरठा

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.

या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली.

औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पुजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते. तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते.

घरात कोण, कसे, काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते. उंबरठा ! किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पुर्वी कुणीही धजत नसे. सातच्या आत घरात हा पुर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही. पुर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे, आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतिक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का.? ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असे म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा.

उंबरा / उंबरठा
उंबरा / उंबरठा

सणवार आला की उंबरठा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधले जायचे. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण ?नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते.

उंबऱ्याला गृहित धरत आपण बरेचसे शुभअशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरुन घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा.

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्या साठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं.हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल, वाईट असेल त्या वस्तू असतील, विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असु शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पुर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी, गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर. घरातील संस्कार, जेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते.

उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी, सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे. म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेऊ, उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.

 

लेखक – DR.MANTRI

The short URL of the present article is: https://moonfires.com/dphc
Share This Article
Follow:
राज पिछले 20 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं। Founder Of Moonfires.com
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *