बाबा केदारनाथ चे दर्शन म्हणजे स्वर्गीय सुखच..
गंगोत्री दर्शन झाल्यावर पुन्हा उत्तरकाशी मध्ये जरा लवकरच पोचल्यावर हॉटेलच्या गच्चीवर निवांत गप्पा मारत संध्याकाळ जात होती. समोरच दिसणारे गंगा – भागीरथीचे पात्र व त्याच्या प्रवाहाचा खळाळता आवाज एक विलक्षण अनुभूती देत होता. नदीच्या काठापाशीच हॉटेल असल्याची उत्तम पर्वणी होती.
सकाळी पुन्हा पहाटे लवकर सोनप्रयागसाठी निघालो अन आठ दहा तासाच्या 220 किमीच्या या टप्प्यात केदारनाथाने साद घालायला सुरुवात केली. नेताला गाव सोडत असतानाच विद्युत प्रकल्पाचे एक छोटेसे धरण दिसले. उत्तराखंड मध्ये पाण्याच्या विपुल आशीर्वादामुळे अनेक जल विद्युत प्रकल्प आढळतात.
दुपारी एका मस्त छोट्या हॉटेल मध्ये जेवायला मिळालं. शेतीच्या वापरातील अनेक जुनी ग्रामीण पारंपारिक अवजारे इथे सुंदरपणे लावली होती. रस्त्यात पाऊस मधूनच हजेरी लावत होता. केदारनाथ यात्रा बर्फवृष्टीमुळे व ग्लेशियर कोसळून रद्द झाली असल्याच्या बातम्या येत असल्याने धाकधूक वाढली होती.
गुप्तकाशीला पोचल्यावर इथून सोनप्रयागला जाताना वाटेत अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या बेवारस गाड्या दिसतात. 2013 मधील महाप्रलयात अनेक लोकं मृत पावली, गाड्यांचे मालाचे नुकसान झाले. या सर्वाचा विदारक अनुभव ड्राइव्हवर कडून ऐकताना अंगावर काटा येतो.
केदारनाथच्या पायथ्यापाशी सोनप्रयाग पर्यंतच आपली गाडी जाते. पायथ्याच्या मुक्कामासाठी लोकांची पहिली पसंत सोनप्रयाग किंवा तिथली जवळची गावे म्हणजे सीतापूर, रामपूर, नारायणकोठी, फाटा किंवा शिरसी ही असते. या गावातून जात असतानाच केदारनाथची बर्फ शिखरे दिसायला लागली.
पुढील सूचनेपर्यंत यात्रा स्थगीत केल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या, उन्हाळ्यात केदारनाथला अनपेक्षितपणे आठवडाभर बर्फ पडत होता. मात्र आज गाडीतच संध्याकाळी सूर्यकिरणे दिसायला लागली व आमच्या आशेचे किरण देखील जीवंत व्हायला लागले.
सोनप्रयाग पार्किंग जवळच एका डोरमिटोरी हॉटेल मध्ये सात वाजता आम्ही साधारण मुक्कामाला पोचलो. पायथ्यालाच असणारी बोचरी थंडी उद्याच्या दिवसासाठी एक प्रकारचा इशाराच देत होती. सोनप्रयाग मध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेल्स व सोबतच हजारो गाड्या मावतील असे मोठे पार्किंग आहेत.
केदारनाथसाठी चढताना लागतील अश्या मोजक्याच वस्तू – औषधे, गरम कपडे, पावसाचे जर्किन, रेनकोट किंवा पोंचो, मोबाईल व कपडे भिजू नयेत म्हणून पिशव्या, कापूर ह्यासह सर्वांच्या सॅक बॅग तयार होत्या. अगदी पाच तासाची मोजकी झोप काढून हॉटेल पहाटे अडीचलाच सोडले.
वर मुक्काम असल्याने उरलेल्या सामानाच्या मोठ्या बॅग आधीच गाडीत ठेवलेल्या होत्या. पहाटे तीन वाजता सोनप्रयाग पार्किंग पासून केदारनाथ पायथ्याला लोकांना रांगेतून सोडले जाते. हॉटेल पासून चालतच रांगेच्या ठिकाणी आम्ही लागलो. पाऊस उघडला होता मात्र गेले तीन दिवस लोकांना इथून वर सोडलेच नव्हते.
सकाळी अकरा वाजता पुढचा निर्णय घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितल्याने या रांगेत सात आठ तास उभं राहून वाट बघणे हाच पर्याय होता. रांगेत किमान पाच दहा हजार लोकं तरी आमच्या सारखेच आज दर्शनाला वर सोडतील या आशेवर प्रतीक्षा करत होते. रांगेतील लोकांसोबत चहा व गप्पा चालूच होते.
युके वरून आलेले एक मुंबईकर जोडपे भेटले व आमच्या गप्पा रंगत गेल्या. मधल्या वेळात बऱ्याच वेळा इथे रांगेत उभं राहण्यापेक्षा परत जाऊन दुसरे काही तरी पाहू असे विचार आले पण इतक्या जवळ येऊन केदारनाथ केल्याशिवाय परत जाणे देखील मनाला पटत नव्हते. आमच्या धैर्याची परीक्षाच होती कदाचित.
गेले काही तास हवामान प्रतिकूल व ढगाळ असल्याने केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सुद्धा बंद ठेवली होती. अनेकांना हेलिकॉप्टरचे बुकिंग करताना समस्या आलेल्या होत्या अथवा वेबसाईट वरून बुकिंग झाले नव्हते. एजन्ट लोकांनी अवाच्या सव्वा किंमती मागून बुकिंग दिली नव्हती.
अखेर दहा वाजता अथक वाट बघितल्यावर एक दोन हेलिकॉप्टर उडताना दिसली व यात्रेकरुंना वर सोडत असल्याचे कळले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. सुदैवाने आमचे चढणे आजच्याच दिवशी नियोजित होते मात्र आमच्या सोबत गेल्या दोन तीन दिवसात दर्शन असणारी कित्येक लोकं रांगेत होती.
सोनप्रयागला सर्वांचे दर्शनाचे रेजिस्ट्रेशन बुकिंग व यात्रा सर्टिफिकेट तपासले जाते. केदारनाथमध्ये ATM किंवा डिजिटल पेमेंट चालत नाहीत त्यामुळे रोख रकमेची व्यवस्था इथेच केलेली उत्तम. सोनप्रयाग पासून गौरीकुंडला 5 किमीच्या रस्त्यासाठी सुमो जीपच्या शटल गाडयातुन जावे लागते.
गौरीकुंड हा केदारनाथ चढण्याच्या रस्त्यातला पायथ्याचा बिंदू. देवी पार्वतीच्या नावाने प्रख्यात असलेल्या कुंडात स्नान करुन केदारनाथ यात्रा सुरु केली जाते. गौरीकुंडला वर जाण्यासाठी घोडे, पिठठू, पालखी इत्यादी मिळतात. आमच्या पैकी सर्वांनीच चालताना मदत होण्यासाठी काठ्या विकत घेतल्या.
पायावर पडणारा बराच भार काठीवर विभागला जात असल्याने काठी घेतल्याचा बराच फरक पडतो व तोल सांभाळायला देखील मदत होते. गौरीकुंड पासून केदारनाथ मंदिर अंदाजे 16-18 किमी आहे. पूर्ण चालत चढून गेल्यास आपापल्या वेगाप्रमाणे अंदाजे आठ ते अकरा तासाचा हा प्रवास आहे.
ज्यांना चालणे शक्य नाही अश्यांसाठी घोडा (चढताना 6000 रुपये), एका माणसाच्या पाठीवर बांबूच्या बास्केटमधे पिट्ठू (10-12000 रुपये) आणि चार जणांकडून नेली जाणारी पालखी (20000 रुपये) असे पर्याय आहेत. अंतर व वजनाप्रमाणे ठराविक टप्प्यासाठी दर ठरवलेले असतात.
बर्फ पडत असल्याने वरच्या 4 किमी मार्गासाठी घोडयांना रस्ता बंद केला होता तर पालखीची व्यवस्था ही पूर्ण बंद होती. त्या दिवशी पायथ्यापासून मंदिरापर्यंत नेणारे फक्त पिटठूवाले होते. जेवढा जमेल तेवढा चालत, थकल्यास घोडा किंवा पिटठू असं आमच्या पैकी बऱ्याच जणांनी ठरवलं.
बरोबर अकरा वाजता चालायला सुरुवात झाली, अंदाजे तासा दीड तासात 3 किमीवर छोटेसे भैरव मंदिर लागते. चढण्याच्या वाटेत अर्धा किमी वर टॉयलेट, पिण्याचे पाणी, पाच मिनिटावर छोटे ढाबे, बसायला छोटे दगड – बाक, व सावलीसाठी पत्र्याच्या शेड उपलब्ध आहेत त्यामुळे गैरसोय होत नाही.
वरुण देवाने चांगली उघडीप दिली असल्याने चालायला वेग पकडता येत होता. मधून मधून ऊन व ढगाळ हवा असल्याने एरवी जाणवणारी थंडी एवढी वाटत नव्हती. एका आकड्यात तापमान होते मात्र चढत असल्यामुळे जाणवत नव्हते. दुपारी तीन साडेतीन वाजता पायथ्यापासून 6 किमी भीमबाली आले.
इथून मात्र मोबाईलची रेंज जायला लागली. इंटरनेट साठीची रेंज कधीच गेली होती. तुमच्या सोबत अनेक लोकं असतील तर पुढे मागे झाल्यास चुकामुक होण्याची शक्यता असते. अश्यावेळी बऱ्याचदा मोबाईलला रेंज नसल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. तेव्हा काळजी घेऊन शक्य तितके सोबत चालणे योग्य.
चढताना पाणी व खाणे गरजेपुरतेच करावे लागते पण वाटेत अनेक ढाबे लागतात जिथे पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटे व गरम चहा, कॉफी पराठे, भात, मॅगी मिळते. उंचावर ढाबे असल्याने किमती दुप्पट किंवा जास्त असतात. सामान वर आणण्यासाठी कष्ट देखील तेवढेच असतात तेव्हा हे सर्व दर वाजवी वाटतात.
चालणारे अनेक जण व काही घोडे वाले सुद्धा मस्त पैकी ब्लूटूथ स्पीकर वर सुशांत सिंगच्या प्रसिद्ध केदारनाथ चित्रपटातील “नमो नमो जी शंकरा” गाणे ऐकत पुढे जाताना दिसतात. या चित्रपटामुळे आणि 2013 नंतर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांमुळे केदारनाथचे आकर्षण बरेच वाढले आहे.
सर्व वयोमानाचे, वेगवेगळ्या राज्यातून आलेले, विविध भाषा बोलणारे यात्रेकरू वाटेत भेटतात. तरुण मुले मित्रांसोबत ट्रेकसाठी तर अनेक ज्येष्ठ मंडळी यात्रा गटासोबत चारधाम दर्शनाला मनोभावे यात्रा करतात. या सर्वांना पाहून जय बाबा केदार म्हणत आपला देखील उत्साह कायम टिकून राहतो.
गौरीकुंड पासून केदारनाथच्या टप्प्यावर बरोबर अर्ध्यात आठ किमी वर रामबाडा येते. काही जणांनी इथून घोडा घेणे पसंत केले. तसे घोडे किंवा पिटठू वाले रस्त्यात दिसले तर ठराविक टप्प्यासाठीच करता येतात. सरकारने नियोजित/ संभाव्य दर पत्रके जागोजागी लावली असल्याने किंमतीचा अंदाज येतो.
रामबाडा टप्प्यात पाऊस मधून मधून हजेरी लावायला लागला. मात्र सुदैवाने जोर कमी असल्याने अडचण नव्हती. संध्याकाळ जवळ येत असल्याने गारवा वाढायला लागला होता. गेले काही वेळा दिवसा जरा भरवश्याचे असणारे वातावरण येथे अनेकदा रात्री बिघडत होते.
बर्फ शिखरे हळूहळू जवळ येत होती. वाटेत थोडा थोडा वेळ थांबत मार्गक्रमण चालूच होते. चढण्याचा व उत्तरण्याचा रस्ता चालणारे, घोडे व सर्वांसाठी एकच आहे. गेले काही तास यात्रा बंद असल्याने अधून मधूनच एखादा यात्री उतरताना दिसत होता. चालताना अध्ये मध्ये लोकं गप्पा मारत होते.
रस्त्यातून चालताना सोबत शक्यतो भीमसेनी अथवा इतर चांगला कापूर ठेवावा. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा हातपाय गार पडत असतील तर उपयोगी पडतो. हिमालयावर राहणाऱ्या शंकराला कदाचित यासाठीच कर्पूरगौरम् म्हणले जाते व त्याच्या पूजेत कापूराचा मान ठेवला जातो.
अचानक नऊ किमी चढून आल्यावर खालून स्पीकर वर यात्रा बंद केल्याच्या व यात्रेकरुनी वर न चढता मागे फिरण्याच्या सूचना ऐकायला आल्या. मध्ये थांबायचे कुठे व इथपर्यंत वर चढून आल्यावर रात्री एवढे माघारी फिरून उतरायचे कसे हे प्रश्न पडले, पुन्हा निर्णयाचा व धैर्याचा क्षण आला. सुदैवाने जवळच एक पोलीस भेटले व त्यांनी वरची परिस्थिती खरी सांगितली. ग्लेशियर कोसळल्याने यात्रेच्या मार्गात 20 फूट उंच बर्फाचा थर जमा झाला होता, पुढे जाताना धोका होता पण केदारनाथ मंदिराजवळ आमची राहायची व्यवस्था असल्याने त्यांनी आम्हाला वर जायला धीर दिला.
आता आर या पार असा निश्चय झाला, इथपर्यंत बाबा केदारनाथाने आणलं आहे तर तो शेवटपर्यंत नेईलच हा विश्वास आला होता. सात वाजता 12 किमी वर लिंचोली लागले. इथून पुढे वर वाटेत बर्फ असल्याने घोड्यांना अनुमती नव्हती. अनेक लोकं इथून मंदिरापर्यंत पिटठू करणे पसंत करत होते. आपल्या पाठीवर स्वतःच्या वजनाएवढ्याच आणखी एका माणसाला पिटठू म्हणून वीस किमी चढत जाणाऱ्या या लोकांचे प्रचंड कौतुक वाटते. एवढे वजन पेलवून चढताना व तोल सांभाळत उतरताना हा मोठा पल्ला गाठायला अंग मेहनत किती होत असेल याची कल्पना करता येत नाही.
उदरनिर्वाहासाठी माणसाला परिस्थिती काय करायला लावते हे दिसतं, आपलं आयुष्य बरंच सुखकर आहे याची जाणीव होते. नेपाळ उत्तराखंड पहाडी भागातून अनेक जण पिटठूसाठी यात्रेच्या हंगामात इथे येतात. कष्ट करुन महिना लाखभर रुपये कमावून वर्षासाठी सोय करतात.
पिटठूवाल्यांना वाटेतले शॉर्टकट रस्ते माहीत असतात, अध्ये मध्ये थांबत, यात्रेकरूला थोडे चालवत, पाय मोकळे करत सुखरूपपणे वर पर्यंत नेऊन सोडतात. घोड्याचा तोल जाऊन, पाय सरकून किंवा नीट पकडले नसल्यास वर बसलेला माणूस पडण्याची शक्यता असते त्या मानाने पिटठू जास्त सुरक्षित वाटते.
लिंचौली पासून पुढे वाटेत बर्फ दिसायला सुरुवात होते. गेले काही दिवस पडलेला बर्फ वितळला नसल्याने तसाच बाजूला दिसत होता. आठ नऊ वाजता रात्री ग्लेशियर तुटला होता तिथे आम्ही पोचलो. दहा ते वीस फूट उंचीचा बर्फाचा थर तिथे साचला होता. सगळीकडे रस्त्याच्या ऐवजी बर्फच होता.
NDRF, सैन्यदल व अनेक स्वयंसेवक तिथे बर्फ बाजूला काढण्यात प्रयत्नांची शर्थ करत होते. बर्फातूनच एक छोटीसी पायवाट व पायऱ्या निर्माण करुन त्यांनी यात्रेकरूंना जाण्यासाठी मार्ग तयार केला होता. पाय सटकत असल्याने दोरीच्या सहाय्याने प्रत्येकाला हाताशी धरून ते वाट पार करुन देत होते.
या पॉइंट वर काही जण सेल्फी काढण्याच्या नादात घसरून दरीत कोसळले होते, या अवघड वाटेतून आपल्याला पुढे नेणारे सैन्याचे हे जवान देवदूतच भासत होते. बर्फ फसलेले अजून एक दोन पॉइंट गेल्यावर पायथ्यापासून 14 किमी अंतरावर बेस कॅम्प लागला. इथून मंदिर दोनच किमी राहते.
शेवटच्या टप्प्यात चढाई आल्याने अजून हुरूप आला पण हाच टप्पा मानसिक दृष्ट्या मोठा वाटतो. मंदिराच्या रात्रीच्या आरतीचे छोटे ध्वनी कानावर पडत होते. मात्र अजूनही मंदिर काही येत नव्हते. आभाळ निरभ्र झाल्याने पौर्णिमेचा चंद्र दर्शन देत होता. मंदिराचा कळस व त्यावरील दिवे आता दिसायला लागले.
बेसकॅम्प पासून रस्त्यात मेडिकल कॅम्प, औषधे, चेकअप टेन्ट, डॉक्टर्स बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. अगदी ऑक्सिजनची व्यवस्था सुद्धा इथे मिळते. या सुविधा केंद्रांसाठी प्रशासनाची यंत्रणा खरंच कौतुकास्पद काम करत आहे. चॉपरचे हेलिपॅड सुद्धा बेसकॅम्प जवळच मंदिरापासून दीड किमी वर आहे.
शेवटचा दीड किमीचा टप्पा हा सरळ पठारावर चालण्यासारखा आहे. राहण्याची सोय रूम मध्ये झाली नसल्यास इथे अनेक टेन्ट झोपण्यासाठी मिळतात. स्लीपींग बॅग किंवा पांघरुण मिळते. मात्र बर्फ, पाऊस पडत असल्यास थंडीच्या दृष्टीने टेन्ट पेक्षा एखादी शेयरिंग रूम कधीही चांगली.
एक पूल ओलांडून पुढे गेल्यावर अखेरीस रात्री साडेदहा वाजता मंदिरासमोर पोचलो. रात्रीच्या शांत व धीर गंभीर वातावरणात मंदिर पाहून सर्व थकवा पळाला. याचसाठी केला होता अट्टाहास हे मनोमन जाणवले. नऊ वाजता रात्री आरतीनंतर दर्शन बंद होते आणि सकाळी साडेपाच वाजता पुन्हा सुरु होते.
शंभु डोंगरावरी राहतो, वाट भक्तांची पाहतो या मराठी गीताच्या ओळीची प्रचितीच जणू येत होती. आजूबाजूला सर्व पर्वतांवर बर्फाची शुभ्र चादर पसरली होती. रात्रीच्या पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात हे दृश्य अलौकिक दिसत होते. मंदिराजवळच पाच मिनिटावर पद्मकोठी लॉजमध्ये आमचा राहण्याचा मुक्काम होता.
बुकिंग आधीच केले असल्याने खरंच सोयीचे झाले. मात्र लॉजमध्ये जायच्या छोट्या पाय वाटेत सुद्धा बर्फ साचला होता. पाय घसरत असल्याने कसेबसे काठीच्या आधाराने बर्फ पार करुन खोलीपर्यंत पोचलो व गरम रोटी दाल भाताचे जेवण करुन लगेच झोपलो. वर असे जेवण मिळाले हेच खूप होते.
दमा व थायरॉईड असल्याने आईला शेवटच्या टप्प्यात थंडी जाणवली. मात्र पिटठू वाल्यांनी इन्हेलर, चहा व शाल यासाठी मदत करत अगदी खोलीपर्यंत सोडले. अनेक अडचणी, अनिश्चितता व हवामान यातून मार्ग काढत बाबा केदारनाथच आपल्याला इथपर्यंत आणतो अशी दृढ भावना सारखी मनात येते.
सकाळी सात वाजता उठल्यावर देखील दर्शनासाठी अर्धा किमी लांब रांग होती. शक्य तेवढ्या लवकर उठून लोकं कधीच रांगेत लागलेली होती. उतरण्यासाठी लवकर निघायचे असल्याने दर्शन होईल की नाही का इथूनच मंदिराचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागेल की काय असे वाटत होते.
तेवढ्यात रांगेत एका व्यक्तीने बोलवले व असेच परत जाऊ नका असे बजावले. कोणी तरी कोठून तरी मदतीसाठी धावून येतो म्हणतात तेच खरे. अर्ध्या तासात मंदिरात केदारनाथाचे सुंदर दर्शन झाले. रांगेतून पुढे जात असताना आजूबाजूचे वातावरण व मंदिराची सजावट पाहून मन प्रसन्न होत होते.
स्वर्गारोहणात पांडवांना शंकराने येथे पशुच्या स्वरूपात दर्शन दिले, भगवान शंकर जमिनीत लुप्त होत असताना पशुची पाठ तेवढी राहिली अशी कथा आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून पूजले जाते. या मंदिरात सभामंडपात पाच पांडव, कुंती व द्रौपदी यांच्या मुर्ती आहेत. मंदिरामध्ये नंदी, श्रीगणेश, विष्णू व गौरी यांची देखील पूजा केली जाते. सातव्या किंवा आठव्या शतकात बांधले गेलेले तेराशे वर्ष जुने हे मंदिर आज देखील कित्येक नैसर्गिक संकटांचा सामना करत तसेच उभे आहे. ह्याची बांधणी व वास्तुकला हा स्थापत्य शास्त्रातील आविष्कारच आहे.
इंटर लॉकिंग म्हणजे दगड एकमेकात अडकवून कोणत्याही धातूशिवाय हे मंदिर बांधलेले आहे. पाऊस बर्फ पडल्याने हिमालयातील अनेक दगड ठिसूळ होऊन कोसळतात. अश्या वातावरणात या मंदिरासाठी कोणता भक्कम प्रतीचा दगड वापरला गेला व तो इतक्या वर कसा कोरला गेला ह्याचे आश्चर्य वाटते. तेराशे वर्ष आधी कोणतीही अद्ययावत सामग्री नसताना, 12000 फूट उंचावर – जिथे यायचा मार्ग सुद्धा शोधणे कठीण आहे अश्या ठिकाणी शिल्पकार आणणे व कित्येक शेकडो वर्ष निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीत टिकून उभी राहील अशी मंदिराची भव्य वास्तू उभारणे हे थक्क करणारे आहे.
शिव: सदा सहाय्यते म्हणतात ते अश्या अद्भुत कार्यामुळेच. एका अभ्यासानुसार हे मंदिर तीनशे ते चारशे वर्ष बर्फाखाली दबले गेले होते. हिमयुगाचा तो अल्पसा कालखंड निघून गेल्यावर मूळ मंदिर पुन्हा दिसायला लागले. आश्चर्य म्हणजे या काळात वास्तूला इजा किंवा झीज झाली नाही.
2013 च्या महाप्रलयात या परिसरातील सर्व ठिकाणी विध्वंस झाला. मात्र मंदिराची वास्तूची रचना आहे तशीच राहिली व आत शरण घेतलेल्या सर्वांचे प्राण वाचले. एका मोठ्या वाहत आलेल्या शिळेमुळे मंदिरावर प्रवाह जोरात आदळला नाही, आज ही अजस्र भीमशिला मंदिरामागे दिसून येते.
केदारनाथाला प्रणाम करताना या मंदिराच्या वास्तूकारांना देखील मनोमन प्रणाम करायला हवा. हिमालयात दुर्लभ आणि दुर्गम अश्या स्वर्गतुल्य ठिकाणी आपल्याला निराकार शिवशंकराचे साकार स्वरूपात मंदिराच्या वास्तूत दर्शन होऊ शकते ते त्यांच्या कौशल्याने व शिवकृपेमुळेच.
मंदिराच्या मागे आदिगुरू शंकराचार्य यांची सुंदर मुर्ती स्थापित केलेली आहे. केदारनाथसोबतच येथील क्षेत्रपालाचे देखील दर्शन घ्यावे असे म्हणतात. भाऊबीज ते अक्षय तृतीया या काळात मंदिराचे द्वार जेव्हा बंद असते व शंकराची पंचानन मुर्ती पायथ्याशी असते तेव्हा क्षेत्रपाल रक्षण करतो ही ख्याती आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटी साधारण मंदिर उघडले जाते ते नोव्हेंबर पर्यंत दर्शन घेता येते. मे जून जुलै हा काळ कमी पावसाचा व थंडी जरा कमी असल्याने या वेळी भाविकांची गर्दी जास्त असते. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये देखील पाऊस कमी झाल्यावर दर्शनाला येतात, मात्र दिवाळी संपताना मंदिराची द्वारे बंद होतात.
स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने आजूबाजूचा बर्फ सुंदर दिसत होता. 360 अंशात सर्वाच ठिकाणी बर्फ दिसत असल्याने कॅमेऱ्यात पनोरमा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आधी बर्फवृष्टी झाल्याने सूर्यकिरणांनी बर्फाचे व हिम पर्वतांचे सौंदर्य अक्षरशः सोन्याप्रमाणे चमकताना दिसत होता.
मंदिराजवळून दिसणारा निसर्ग हा तसं पाहिलं तर कॅमेऱ्यात सुद्धा चित्रबद्ध करता येत नाही किंवा शब्दात सुद्धा सांगता येत नाही. निसर्गाची व पृथ्वीवरील स्वर्गाची ही किमया खरं तर डोळ्यात व मनात साठवून घ्यावी लागते. कधी आपण या निसर्गासोबत एकरूप होऊन जातो ते कळतच नाही.
अनेक अडचणी समोर येऊन देखील बाबा केदारनाथानेच आमची यात्रा घडवून आणली असे पुन्हा वाटत होते. ॐ नमः शिवाय म्हणत त्याला मनोभावे नमस्कार करत परतीची वाट पकडली. साक्षात स्वर्ग पाहून आल्याचे समाधान प्रत्येकाला मनोमन जाणवत होते.
केदारनाथ यात्रा आधी सारखी दुर्गम राहिलेली नाही. अनेक सोयी सुविधामुळे अधिकाधिक यात्रेकरू दर्शनाला येत आहेत. काही महिन्यांनी रोपवे सुद्धा सुरु होईल. लोकांची संख्या वाढल्याने इथला स्थानिक निसर्ग, हिमालय, मंदाकिनी नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील आपल्यावरच असणार आहे.
उतरताना स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने व पावसाने उघडीप दिल्याने अनेक पॉईंट्स आज व्यवस्थित दिसत होते. ग्लेशियर पॉइंट, पाण्याचे कुंड अशी सर्व ठिकाणे आज छान दिसत होती. उतरताना देखील थांबत मध्ये फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. सकाळी दहाला साधारण उतरायला सुरुवात केली.
दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत पायथ्याला गौरीकुंडला आम्ही पूर्ण उतरून पोचलो होतो. बाबांच्या कृपेने यात्रा सुफळ संपूर्ण झाली होती. केदारनाथचे वातावरण इतके मंत्रमुग्ध करणारे व भावपूर्ण होते की इथे पुन्हा येण्याची इच्छा मनात होत होती. आता या नंतर बाबा केदारनाथ बोलवतील तेव्हा जायचेच.
पुन्हा हात जोडले जात होते..
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।
– संकेत सदावर्ते (https://twitter.com/Sanket_thinks)
ब्लॉग – https://sanketsadavarte.blogspot.com/2023/05/blog-post_15.html
5 मे 2023
https://moonfires.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf/