बाबा केदारनाथ चे दर्शन म्हणजे स्वर्गीय सुखच..
गंगोत्री दर्शन झाल्यावर पुन्हा उत्तरकाशी मध्ये जरा लवकरच पोचल्यावर हॉटेलच्या गच्चीवर निवांत गप्पा मारत संध्याकाळ जात होती. समोरच दिसणारे गंगा – भागीरथीचे पात्र व त्याच्या प्रवाहाचा खळाळता आवाज एक विलक्षण अनुभूती देत होता. नदीच्या काठापाशीच हॉटेल असल्याची उत्तम पर्वणी होती.
सकाळी पुन्हा पहाटे लवकर सोनप्रयागसाठी निघालो अन आठ दहा तासाच्या 220 किमीच्या या टप्प्यात केदारनाथाने साद घालायला सुरुवात केली. नेताला गाव सोडत असतानाच विद्युत प्रकल्पाचे एक छोटेसे धरण दिसले. उत्तराखंड मध्ये पाण्याच्या विपुल आशीर्वादामुळे अनेक जल विद्युत प्रकल्प आढळतात.
केदारनाथच्या पायथ्यापाशी सोनप्रयाग पर्यंतच आपली गाडी जाते. पायथ्याच्या मुक्कामासाठी लोकांची पहिली पसंत सोनप्रयाग किंवा तिथली जवळची गावे म्हणजे सीतापूर, रामपूर, नारायणकोठी, फाटा किंवा शिरसी ही असते. या गावातून जात असतानाच केदारनाथची बर्फ शिखरे दिसायला लागली.
पायावर पडणारा बराच भार काठीवर विभागला जात असल्याने काठी घेतल्याचा बराच फरक पडतो व तोल सांभाळायला देखील मदत होते. गौरीकुंड पासून केदारनाथ मंदिर अंदाजे 16-18 किमी आहे. पूर्ण चालत चढून गेल्यास आपापल्या वेगाप्रमाणे अंदाजे आठ ते अकरा तासाचा हा प्रवास आहे.
ज्यांना चालणे शक्य नाही अश्यांसाठी घोडा (चढताना 6000 रुपये), एका माणसाच्या पाठीवर बांबूच्या बास्केटमधे पिट्ठू (10-12000 रुपये) आणि चार जणांकडून नेली जाणारी पालखी (20000 रुपये) असे पर्याय आहेत. अंतर व वजनाप्रमाणे ठराविक टप्प्यासाठी दर ठरवलेले असतात.
रस्त्यातून चालताना सोबत शक्यतो भीमसेनी अथवा इतर चांगला कापूर ठेवावा. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा हातपाय गार पडत असतील तर उपयोगी पडतो. हिमालयावर राहणाऱ्या शंकराला कदाचित यासाठीच कर्पूरगौरम् म्हणले जाते व त्याच्या पूजेत कापूराचा मान ठेवला जातो.
दमा व थायरॉईड असल्याने आईला शेवटच्या टप्प्यात थंडी जाणवली. मात्र पिटठू वाल्यांनी इन्हेलर, चहा व शाल यासाठी मदत करत अगदी खोलीपर्यंत सोडले. अनेक अडचणी, अनिश्चितता व हवामान यातून मार्ग काढत बाबा केदारनाथच आपल्याला इथपर्यंत आणतो अशी दृढ भावना सारखी मनात येते.
स्वर्गारोहणात पांडवांना शंकराने येथे पशुच्या स्वरूपात दर्शन दिले, भगवान शंकर जमिनीत लुप्त होत असताना पशुची पाठ तेवढी राहिली अशी कथा आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून पूजले जाते. या मंदिरात सभामंडपात पाच पांडव, कुंती व द्रौपदी यांच्या मुर्ती आहेत. मंदिरामध्ये नंदी, श्रीगणेश, विष्णू व गौरी यांची देखील पूजा केली जाते. सातव्या किंवा आठव्या शतकात बांधले गेलेले तेराशे वर्ष जुने हे मंदिर आज देखील कित्येक नैसर्गिक संकटांचा सामना करत तसेच उभे आहे. ह्याची बांधणी व वास्तुकला हा स्थापत्य शास्त्रातील आविष्कारच आहे.
शिव: सदा सहाय्यते म्हणतात ते अश्या अद्भुत कार्यामुळेच. एका अभ्यासानुसार हे मंदिर तीनशे ते चारशे वर्ष बर्फाखाली दबले गेले होते. हिमयुगाचा तो अल्पसा कालखंड निघून गेल्यावर मूळ मंदिर पुन्हा दिसायला लागले. आश्चर्य म्हणजे या काळात वास्तूला इजा किंवा झीज झाली नाही.
केदारनाथाला प्रणाम करताना या मंदिराच्या वास्तूकारांना देखील मनोमन प्रणाम करायला हवा. हिमालयात दुर्लभ आणि दुर्गम अश्या स्वर्गतुल्य ठिकाणी आपल्याला निराकार शिवशंकराचे साकार स्वरूपात मंदिराच्या वास्तूत दर्शन होऊ शकते ते त्यांच्या कौशल्याने व शिवकृपेमुळेच.
केदारनाथ यात्रा आधी सारखी दुर्गम राहिलेली नाही. अनेक सोयी सुविधामुळे अधिकाधिक यात्रेकरू दर्शनाला येत आहेत. काही महिन्यांनी रोपवे सुद्धा सुरु होईल. लोकांची संख्या वाढल्याने इथला स्थानिक निसर्ग, हिमालय, मंदाकिनी नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील आपल्यावरच असणार आहे.
उतरताना स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने व पावसाने उघडीप दिल्याने अनेक पॉईंट्स आज व्यवस्थित दिसत होते. ग्लेशियर पॉइंट, पाण्याचे कुंड अशी सर्व ठिकाणे आज छान दिसत होती. उतरताना देखील थांबत मध्ये फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. सकाळी दहाला साधारण उतरायला सुरुवात केली.
दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत पायथ्याला गौरीकुंडला आम्ही पूर्ण उतरून पोचलो होतो. बाबांच्या कृपेने यात्रा सुफळ संपूर्ण झाली होती. केदारनाथचे वातावरण इतके मंत्रमुग्ध करणारे व भावपूर्ण होते की इथे पुन्हा येण्याची इच्छा मनात होत होती. आता या नंतर बाबा केदारनाथ बोलवतील तेव्हा जायचेच.