आज गणेश जयंती (Ganesh jayanti) अनेक घरी बाप्पाचे (Ganpati Bappa) आवडते पदार्थ प्रसादासाठी, नैवेद्यासाठी तयार केले जातात. खास करुन बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. मोदकाचे अनेक प्रकार आहेत. उकडीचे मोदक बाप्पाला खूप आवडतात असे म्हटले जाते. पारंपारिक पद्धतीने उकडीचे मोदक (Ukadiche modak recipe) घरोघरी तयार केले जातात.
कसे तयार करावेत उकडीचे मोदक ?
अर्धा कप पाणी (Water) आणि अर्धा कप दूध (Milk) एका कढईमध्ये टाकून त्याला चांगली उकळ येऊ द्या. यामध्ये चिमूटभर मीठ (Salt) आणि थोडसं तूप (Ghee) टाका. त्यानंतर एक वाटी तांदळाचे पीठ (Rice flour) टाका. गॅसचा फ्लेम लो करुन व्यवस्थित पीठ हालवून घ्या. गॅस थोडा लहान करुन पाच मिनिटं कढईवर झाकण ठेवा. त्यानंतर गॅस बंद करुन 15 मिनिटं पीठ तसंच झाकून ठेवा. त्यानंतर ही उकड एका ताटामध्ये घ्या. पाण्याचा वापर न करता उकड व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करुन घ्या. या पीठाचे छोटे गोळे तयार करुन घ्या. एक कप वाटी तांदळाच्या पीठामध्ये सात ते आठ मोदक तयार होतात.
उकडीच्या मोदकासाठी सारण कसे करावे ?
कढईमध्ये एक चमचा तूप (Ghee) घ्या. त्यामध्ये सुका मेवा (Dried fruits ) तुम्हाला आवडतो तो घ्या. बदाम, काजूचे (Almonds, cashews) बारीक तुकडे करुन तुपामध्ये टाका. त्यानंतर त्यामध्ये खसखस (Poppy Seeds) टाका. बदाम, काजू आणि खसखस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप नारळाचा चव टाका आणि दोन मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या. (जर तुमच्याकडे नारळाचा चव नसेल तर तुम्ही एक कप डेसिकेटेड कोकनट घ्या. त्यामध्ये तीन ते चार चमचे दूध टाकावे लागेल.) त्यानंतर यामध्ये एक कप गूळ (Jaggery) घाला. गूळ टाकल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित पाच मिनिटं शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड (Cardamom powder and nutmeg powder) टाका. यामुळे सारणाला खूपच चांगली चव येईल.
असे तयार करा उकडीचे मोदक
तांदळाच्या उकडीचा एक गोळा हातामध्ये घेऊन त्याची पातळसर पारी तयार करा. पारीला व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने कळ्या तयार करून त्यात सारण भरा आणि मोदक तयार करा. चाळणीवर किंवा मोदक पात्रात हे मोदक ठेवून 15 मिनिट ते वाफवून घ्या. (केळीच्या पानावर देखील तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता.) मोदक वाफवून घेण्यापूर्वी त्यावर केशरचे दूध टाका. गरमगरम, गोड, रसदार, लुसलुशीत मोदक साजूक तुपासहित तुम्ही खाऊ शकता.