मराठी भाषेला स्वतःचा आवाज देणारे पहिले लेखक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव गौरवाने घेतले जाते. १८३२ मध्ये त्यांनी “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले, त्यामुळे मराठी पत्रकारितेचा पायाच रचला गेला. याच दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
बाळशास्त्रींचा जन्म २० डिसेंबर १८१० रोजी देवगड तालुक्यातील पोम्भुर्ले येथे झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले, पण त्यांची बुद्धिमत्ता आणि जिज्ञासू वृत्ती अलिप्त नव्हती. इ.स.१८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.
‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले.
इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.. ब्रिटिश राजवटीतील अन्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी लेखणी चालवली.
१८३२ मध्ये बाळशास्त्रींनी एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. “दर्पण” मध्ये ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर टीका, सामाजिक सुधारणेच्या चळवळींना पाठबळ, स्थानिक बातम्या, देशविदेशातील घडामोडी यांचा समावेश होता. वृत्तपत्राला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला नाही, पण बाळशास्त्रींनी हार माणली नाही. त्यांच्या धडाकेल्या लेखनामुळे “दर्पण” चा वाचकवर्ग वाढत गेला आणि ते मराठी समाजाचे प्रवक्त बनले.
“दर्पण” व्यतिरिक्त, बाळशास्त्रींनी इतरही साहित्यकृती लिहिल्या. त्यांच्या “नीतिकथा”, “इंग्लंड देशाची बखर”, “इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप”, “हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास” इत्यादी ग्रंथांनी मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
१७ मे १८४६ रोजी बाळशास्त्रींचे दुःखद निधन झाले. पण त्यांचे कार्य अविरत चालूच राहिले. “दर्पण” त्यानंतरही अनेक वर्षे चालू राहिले आणि इतर अनेक मराठी वृत्तपत्रांना प्रेरणा देऊन गेले. आज मराठी पत्रकारिता ज्या उंचीवर आहे, त्यामागे बाळशास्त्री जांभेकरांच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.
बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते, तर एक विचारवंत, समाजसुधारक आणि मराठी भाषेचे एकनिष्ठ सेवक होते. त्यांचे कार्य हे मराठी जनतेसाठी सतत प्रेरणा देणारे आहे.