श्रीरामरक्षा स्तोत्र – मराठी अनुवाद – श्रीरामांचे संरक्षण मिळावे, यासाठी श्री रामरक्षा स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते. मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते.
श्रीरामरक्षा स्तोत्र (Ramraksha Marathi Meaning)
हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं आणि त्यांनी उठल्या उठल्या आहे तसं लिहून काढलं. आज संपूर्ण जगात श्रीरामरक्षा स्तोत्र आपत्तीपासून रक्षा करणारे, मनाला आधार देणारे आणि सभोवताली प्रभू रामाचे सुरक्षा कवच बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहे.
अनेक घरांमध्ये हे श्रीरामरक्षा रोज म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत उपासनेचे सामर्थ महत्त्वाचे मानले गेले आहे. घरीच बसल्या बसल्या नामस्मरण करून मनाची शक्ती आपण वाढवू शकतो. मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते.
श्लोक व अनुवाद
श्लोक | अनुवाद |
---|---|
ॐ श्रीगणेशाय नमः । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छ्न्दः । सीता शक्तिः । श्रीमद्हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः । |
ॐ श्रीगणेशाला माझे नमन या स्तोत्रातील मंत्रांद्वारे श्री राम (माझी) रक्षा करो (मी) बुधकौशिक ऋषी (आहे) श्री सीता आणि रामचंद्र (हे माझे) देवता आहेत (ही) अनुष्टुप छंदातील रचना आहे. सीता ही (रचनेमागची) शक्ती आहे. श्री हनुमंताचे कवच आहे. श्रीराम भक्त म्हणून याचा (स्तोत्राचा) जप करणे हे माझे कर्तव्य आहे. |
अथ ध्यानम् । ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् । इति ध्यानम् । |
आता ध्यान करूया.
जो आजानुबाहु आहे (ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत) व ज्याने धनुष्य-बाण धारण केलेले आहेत,(आणि) जो बद्धपद्मासनात बसला आहे. ज्याने पिवळे वस्त्र (पीतांबर) परिधान केले आहे. ज्याचे डोळे नव्याने जन्म घेतलेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत व प्रसन्न आहेत. जो डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे स्थिर दृष्टीने बघत आहे, पावसाळी मेघांप्रमाणे (श्यामवर्णाची) ज्याची कांती आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित आहे, ज्याने मोठे जटामंडळ धारण केलेले आहे, (असे) प्रभू श्रीरामचंद्र. त्यांचे ध्यान करूया. |
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥ |
श्रीरघुनाथाचे (रामाचे) चरित्र शंभर कोटी श्लोकांत मावेल इतके विस्तृत आहे व त्यातील एकेक अक्षर सुद्धा (मनुष्याच्या) मोठमोठ्या पापांचा विनाश करणारे आहे.॥१॥ |
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । |
ज्याचा वर्ण नीलकमलाप्रमाणे श्यामरंगी आहे. कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत. जटारुपी मुकुटामुळे जो सुशोभित झालेला आहे.॥२॥ |
सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकम् । |
ज्याच्या एका हाती खड्ग, पाठीवर बाणांचा भाता व दुसऱ्या हातात धनुष्यबाण आहे. जो नक्तचरांचा (निशाचरांचा/असुरांचा) नाश करणारा आहे. जन्म आणि मृत्युच्या पलीकडे ज्याची व्याप्ती आहे, जो परमेश्वर आहे (आणि तरीही) जो जगाचे रक्षण करण्यासाठी स्वतः लीलेने श्री राम म्हणून (पृथ्वीवर) अवतीर्ण झालेला आहे ॥३॥ |
रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । |
अशा प्रभूचे ध्यान करून सर्व पापांचा विनाश करणाऱ्या व सर्व कामना (इच्छा) पूर्ण करणाऱ्या या श्रीरामरक्षा स्तोत्राचे ज्ञानी माणसाने पठण करावे. राघवाने (रघुचा वंशज, राम) माझ्या डोक्याचे (मस्तकाचे) रक्षण करो. दशरथाचा पुत्र (राम) माझ्या कपाळाचे रक्षण करो.॥४॥ |
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । |
कौसल्येच्या पुत्र (राम) माझ्या दोन्ही डोळ्यांचे (दृष्टीचे) रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य (राम) माझ्या दोन्ही कानांचे (श्रवणेंद्रियांचे) रक्षण करो. (साधूंच्या) यज्ञाचे रक्षण करणारा (राम) माझ्या नाकाचे रक्षण करो. सुमित्राच्या मुलावर (लक्ष्मणावर) प्रेम करणारा (राम) माझ्या मुखाचे रक्षण करो.॥५॥ |
जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । |
सर्व विद्यांचा संचय असणारा (राम) माझ्या जिभेचे रक्षण करो. भरत ज्याला वंदन करतो तो (राम) माझ्या कंठाचे रक्षण करो. ज्याच्याकडे दिव्यास्त्र (दिव्य आयुधे) आहेत तो (राम) माझ्या (दोन्ही) खांद्यांचे रक्षण करो. धनुष्याचा (शिवधनुष्याचा) भंग करणारा (राम) माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.॥६॥ |
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । |
सीतेचा पती (राम) माझ्या हातांचे रक्षण करो. (जमदग्नी) परशुरामाला जिंकणारा (राम) माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा विध्वंस करणारा (राम) माझ्या शरीराच्या मध्य भागाचे (धडाचे) रक्षण करो. जांबुवनाला आश्रय देणारा (राम) माझ्या नाभीचे रक्षण करो. ॥७॥ |
सुग्रीवेशः कटि: पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । |
सुग्रीवाचा स्वामी (राम) माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू (राम) माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ (राम) माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. ॥८॥ |
जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः । |
समुद्रावर सेतू बांधणारा (राम) माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखीचा (रावणाचा) नाश करणारा (राम) माझ्या दोन्ही (पायांच्या) पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला श्री (राजश्री) देणारा (राम) माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो.॥९॥ |
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । |
याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या (या) रामरक्षेचे जो मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान्, विजय मिळविणारा आणि विनयशील होईल. ॥१०॥ (फलश्रुति) |
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । |
पाताळ, भूमी किंवा आकाशात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपात संचार करणारे दुष्ट जीव या श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करणाऱ्याकडे पाहू देखील शकणार नाहीत ॥११॥ |
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । |
राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा (इतर कोणत्याही) नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस कधीही पापांनी लिप्त (ग्रसित) होत नाही. अनेक सुखे भोगून शेवटी तो मोक्ष प्राप्त करतो ॥१२॥ |
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितम् । |
सर्व जगाला जिंकणारा (हा) एक मंत्र जो रामनामाने अभिरक्षित आहे (प्रभू श्रीरामांचे अभय प्राप्र्त झालेले आहे) हा मंत्र जो आपल्या गळ्यात धारण करतो, त्याच्या हातात सर्व सिद्धी प्राप्त होतात ( मनुष्याचे हात देखील सर्व कार्य करण्यास सिद्ध बनतात) ॥१३॥ |
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । |
जो या रामकवचाचे स्मरण करेल त्याच्यासाठी जणू हे (इंद्राच्या) वज्राचा पिंजरा (कवच) आहे. अशा माणसाची आज्ञा कायम अबाधित राहील / अव्याहत मानली जाईल आणि सर्वत्र (सर्व मोर्चांवर) त्याला जय प्राप्त होईल आणि त्याचे मंगल होईल. ॥१४॥ |
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः । |
भगवान शिव शंकरांनी स्वप्नांत (येऊन) ही श्रीरामरक्षा सांगितली, सकाळी उठल्यावर श्री बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी लिहून काढली.॥१५॥ |
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । |
प्रभू श्रीराम कल्पवृक्षांचा बगीचा आहे, सकल संकटांपासून मुक्ती देणारा आहे, तिन्ही लोकांमध्ये मनोहारी (अभिराम) आहे. असे हे प्रभू श्रीराम निःसंदेह आमचे प्रभू आहेत. (रामस्तुति) ॥१६॥ |
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ । |
तरुण, रूपसंपन्न, सुकुमार (आणि तरीही) महाबली (सामर्थ्यवान), कमळाच्या आकाराचे मोठे डोळे (असलेले), वल्कले आणि कृष्ण (गडद रंगाचे) जीन परिधान करणारे ॥१७॥ |
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रम्हचारिणौ । |
फळे, कंदमुळे भक्षण करणारे, तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथ राजांचे पुत्र हे बंधू राम लक्ष्मण ॥१८॥ |
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । |
सर्व सत्त्वे ज्याच्याठायी शरण प्राप्त करतात, जे सर्व प्रकारचे धनुष्य वापरण्यात श्रेष्ठ आहेत (धनुर्विद्येत श्रेष्ठ आहेत), जे अयोग्यांच्या (असुरांच्या) कुळांचा नाश करणारे आहेत, ते उत्तम रघुकुलोत्पन्न रक्षण करो. ॥१९॥ |
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ । |
धनुष्य धारण करून नेहमी सुसज्ज असणारे, बाणांना हाताने स्पर्श करून असणारे, व अक्षय बाणांचे भाते वक्षांवर (छातींवर) बांधून बाळगणारे, राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता (माझ्या) मार्गामध्ये नेहमी पुढे चालत राहोत. ॥२०॥ |
संनद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा । |
निरंतर सज्ज असलेले, अंगात कवच (चिलखत) घातलेले, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारे हे तरुण राम आणि लक्ष्मण, पुढे जाणाऱ्या आमच्या मनोरथाचे रक्षण करो ॥२१॥ |
रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली । |
शूर वीर असा दशरथपुत्र राम आणि त्याचे अनुचरण (सेवा) करणारा बलवान लक्ष्मण, कुकुत्स्थ कुलोत्पन्न कौसल्येचा (पुत्र) राम पूर्ण पुरुष आहे. ॥२२॥ |
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । |
जानकीचे (सीता) पती (श्रीराम) हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहेत. तसेच ते वेदान्त विद्यांचे निधी, सर्व यज्ञांचे ईश (देव), पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम आहेत. ॥२३॥ |
इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । |
याचे जो श्रद्धाळू (श्रीराम) भक्त नित्य जप करेल, त्याला अश्वमेध यज्ञाहून अधिक पुण्य प्राप्त होईल यात शंकाच नाही! (हे शिव शंकर बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगत आहेत) ॥२४॥ |
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । |
प्रभू श्रीराम दूर्वा दलाप्रमाणे श्यामरंगी आहे, कमळाप्रमाणे त्यांचे डोळे आहेत आणि पितांबर (पिवळे वस्त्र) धारण करणारे आहेत. त्यांच्या (दिव्य) नामाची जे (मनोभावे) स्तुती करतात ते संसाराच्या समस्त चिंतांतून मुक्त होतात, संसाराच्या (जन्म मरणाच्या) चक्रातून मुक्त होतात. ॥२५॥ |
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं । |
लक्ष्मणाच्या आधी जन्माला आलेले प्रभू श्रीराम, रघु कुलोत्पन्न, सीतेचे यजमान (पती) (सर्वांग) सुंदर आहेत. कुकुत्स्थ कुलोत्पन्न (राम), करुणेची वाटिका (अर्णव) आहेत, सर्व गुणांनी युक्त आहेत, ज्ञानीजनांचे प्रिय आणि धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. राजांचे राजे, सदैव सत्याशी जोडलेले, दशरथांचे सुपुत्र, श्यामरंगी आणि शांत प्रवृत्तीचे आहेत जणू काही मूर्तस्वरूप शांती. लोकांवर कृपाकरणाऱ्या, त्यांच्यावर स्नेह असणाऱ्या, रघुकुलात माथ्यावरील पवित्र तिलकाप्रमाणे शोभून दिसणाऱ्या आणि रावणाचा शत्रू असणाऱ्या प्रभू श्रीरामाला मी वंदन करतो. ॥२६॥ |
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । |
राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस्, रघुनाथ, नाथ, अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार असो. ॥२७॥ |
श्रीराम राम रघुनन्दन राम राम । |
श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताच्या आधी जन्माला आलेला (मोठा भाऊ) राम राम श्रीराम राम रणांगणात कठोर (भीषण वार करणारा) राम राम श्रीराम राम(आता) तूच शरण (रक्षणकर्ता) हो राम राम ॥२८॥ |
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि । |
मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने स्तवन (प्रार्थना) करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मस्तकाने नमन (नतमस्तक) करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहे. ॥२९॥ |
माता रामो मत्पिता रामचन्द्रः । स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । |
माझी माता व माझा पिता प्रभू श्रीराम आहेत. माझा स्वामी व माझा मित्र ही प्रभू श्रीराम आहेत. इतकेच नाही तर, हे परम दयाळू प्रभू श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी (रामाला सोडून) अन्य कोणालाही ओळखत नाही, कोणालाही जाणत नाही अजिबात ओळखत (मानत) नाही ॥३०॥ |
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । |
ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूलाराजा जनक यांची कन्या (सीता) आहे व ज्याच्या पुढे मारुती आहे, त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. ॥३१॥ |
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । |
लोकांना (समस्त जगाला) आनंद देणाऱ्या (प्रेम करणारा), रणांगणांत धैर्य धरणाऱ्या (धीराने तोंड देणाऱ्या),कमळासारखे डोळे असणाऱ्या, रघुवंशाचा अधिपती (सर्वेसर्वा) व दयेची मूर्ती अशा करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे. ॥३२॥ |
मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। |
(मारुतिस्तुति) मनाप्रमाणे वेगाने आवागमन करणाऱ्या, वाऱ्याप्रमाणे वेगवान् आणि इंद्रियांवर विजय मिळविलेल्या (इंद्रियांवर जय मिळवलेल्या, इंद्रियजय), बुद्धिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायामध्ये मुख्य (प्रमुख) अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे.॥३३॥ |
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् |
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर बसून, “राम राम” अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मीकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.॥३४॥ |
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । |
आपत्ती हरणाऱ्या (आपत्तीचा विनाश करणाऱ्या), सर्व संपदा (संपत्ती, संतती, स्थावर, बुद्धी इत्यादी) देणाऱ्या, लोकांना आनंद देणाऱ्या,प्रभू श्रीरामांना मी पुनः पुनः नमस्कार करतो, वंदन करतो. ॥३५॥ |
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् । |
“राम, राम”,ही रामनामाची गर्जना (रामनामाचा जप) ही भव बीजे (संसाराच्या चक्राची बीजे) भर्जन करणारी (भाजून टाकणारी), सुख आणि संपदेची प्राप्ती (अर्जन) करून देणारी, आणि यमदूतांचे तर्जन करणारी (भीती दाखवणारी) अशी आहे. |
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । |
प्रभू श्रीराम राजांमध्ये उठून दिसणारे जणू मोती आहेत, प्रभू श्रीरामाचा नेहमी विजय होतो (असो) त्या रामाचे मी सतत स्मरण करतो, भजतो (प्रार्थना करतो), असा श्रीराम ज्याने निशाचरांच्या चमूला (असुरांच्या समुदायाला) मारून टाकले (नाश केला), त्याला मी नमस्कार करतो. माझ्यासाठी श्रीरामाहून अन्य कोणीही मोठा नाही, श्रेष्ठ नाही, त्यांच्या पुढे कोणी नाही, त्या श्रीरामांचा मी दास आहे. माझ्या चित्ताच्या लयात (विचारांच्या लयात) श्रीराम राहो. हे श्रीरामा तू माझा उद्धार कर. ॥३७॥ |
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे । |
राम, राम आणि राम हा रामनामाचा जप मनाला रममाण करणारा (आनंद देणारा), विष्णुसहस्त्रनामतुल्य (विष्णुसहस्त्रनामासारखी फलप्राप्ती करून देणारे) हे रामनाम आहे हे सुवदने (शंकर भगवान पार्वतीला सांगत आहेत). ॥३८॥ |
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् । |
अशा प्रकारे श्री बुधकौशिकऋषी रचित श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले. |
श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु । |
श्री सीता रामचंद्र यांना अर्पण. सर्वत्र शुभ होवो. |