कोकणातील दिवाळी
कोकणातील दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी. कोकणातील देवळादेवळातून होणारा दीपोत्सव ही एक वेगळीच अनुभूती असते.
ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी. कोकणातील देवळादेवळातून होणारा दीपोत्सव ही एक वेगळीच अनुभूती असते. गावागावातील देवळांसमोर असलेले दीपस्तंभ दिव्यांनी उजळून निघालेले असतात.
पूर्वी या दीपस्तंभांवर पणत्या ठेवल्या जात. आताच्या आधुनिक काळात मात्र विजेच्या तोरणांना अधिक पसंती दिली जाते. घरांसमोरच्या अंगणात आकाश कंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामट्यांपासून ‘पारंपारिक पध्दती’चा आकाश कंदील बनविणे व तो अधिकाधिक उंचीवर टांगणे ही मजा आजही टिकून आहे.
सध्या ‘रेडिमेड’ आकाश कंदिलांचा जमाना असला, तरी ग्रामीण भागात ‘पारंपारिक पध्दती’च्या आकाश कंदिलांना अजूनही प्राधान्य दिले जाते. मात्र येत्या काही वर्षात आकाश कंदिलांबाबत बदल जाणवेल असं वातावरण आहे. दिवाळी निमित्ताने घरी येणारे चाकरमानी चिनी बनावटीचे कंदिल आणि विजेच्या दीपमाळा एक नाविण्यम्हणून आणत असल्याचे पहावयास मिळते.
दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी
याला कोकणात अनेक ठिकाणी ‘धनतरस’ असेही म्हटले जाते. पूर्वी या दिवशी छोटे किल्ले तयार करण्याची प्रथा होती. त्यासाठी शिवाजी व मावळ्यांच्या छोट्या-छोट्या मूर्त्या तयार केल्या जात. आताच्या बालगोपाळांच्या आवडी-निवडी बदलत चालल्या आहेत. कॉंक्रिटीकरणामुळे मातीपासून मुले लांब जात आहेत, तर टी.व्ही.चॅनल्समुळे असल्या छंदासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे ही कलात्मक परंपरादेखील भविष्यात टिकेल की नाही हे सांगता येत नाही.
या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. एखाद्या ताम्हणात, वाटीत किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो. ही परंपरा व्यापारीवर्गाने टिकवून ठेवली आहे. सर्वसामान्य माणूस त्याकडे फारसे लक्ष देत नाही. याच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनही करण्याची परंपरा आहे.
आयुर्वेद शास्त्रामध्ये या परंपरेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. धन्वंतरी पूजनच्या निमित्ताने कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा ‘सात्विन’ वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. ती अजूनही बऱ्याच ठिकाणी पाळली जात असली तरी नव्या पिढीला तिचे फारसे महत्त्व वाटत नाही. त्यामुळे ही परंपराही काही वर्षात लोप पावेल अशी स्थिती आहे.
नरकचतुर्दशी
दिवाळीच्या सणात नरकचतुर्दशीला एक निराळं महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवशी भल्या पहाटे उठणे, अभ्यंग स्नान करणे आणि कारीट फोडणे यासाठी घराघरांतून शर्यती लावल्या जातात. जो उशीरा उठेल, तो नरकात जातो, असाही एक समज आहे. पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान झाल्यावर कोकणात घराघरांच्या समोर “गोविंदा ऽऽ गोविंदा”ची आरोळी ऐकू येते.
अंगणातील तुळशी वृंदावनासमोरची जागा शेणाने सारवून घेऊन, त्यावर कडू चव असणारे ‘कारीट’ ठेवून ते डाव्या पायाच्या आंगठ्याने फोडले जाते. याचवेळी जोरजोरात “गोविंदा ऽऽ गोविंदा” ही आरोळी अख्ख्या वाडीत घुमली पाहिजे, अशीही अपेक्षा असते. कारीट हे नरकासुराचं प्रतीक आहे. त्यामुळे वाईट प्रवृत्ती पायदळी तुडवून चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद घेतला जातो.
कोकणात अनेक गावात सातीवनाचं झाडं असतं, या झाडाला नरकचतुर्दशीच्या दिवशी फार महत्त्व असतं. दिवाळीची सुरुवात तोंड गोड करून करायची असली तरी कोकणात मात्र शब्दश: तोंड कडू करून दिवाळीची सुरुवात करतात. गावातील एक व्यक्ती पहाटे लवकर उठून या झाडापाशी जाते.
सातीवनाची पूजा केल्यानंतर या झाडाच्या साली काढून त्या घरी आणल्या जातात. त्यानंतर आजूबाजूंच्या घरात वाटल्या जातात. या सालीत मिरे, लसूण टाकून त्याचा रस तयार केला जातो, त्यानंतर घरातली इतर मंडळी या रसाचे प्राशन करतात. त्यात औषधी गुणधर्म असतात.
कोकणात या काळात भात कापणीची कामं सुरू असतात. कोकणातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा भात शेतीवर असल्याने या काळात सगळेच कापणीच्या कामात व्यग्र असतात. भाताची कापणी झाल्यानंतर पहिल्या कापणीतल्या भातापासून पोहे तयार केले जातात. आपल्या शहरी भागात मिळणाऱ्या पोह्यांपेक्षा हे पोहे खूपच वेगळे असतात.
तपकिरी आणि जाडसर पोह्यात गूळ, खोबरं आणि वेलची घालून गोडाचे पोहे तयार केले जातात. हंगामातले पहिलेच पोहे असल्याने सारं कुटुंब देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर या पोह्यांवर ताव मारतं. झटपट दिवाळीचा बेत आवरल्यानंतर सारे पुन्हा भातकापणीच्या कामाला सुरुवात करतात. दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असेही म्हटलं जातं.
या दिवशी कोकणात सकाळी फराळ करताना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. त्यातही हे पोहे अगदी पारंपरिक पद्धतीने केले असतील, तर त्याची चव न्यारी असते. कोकणातील एक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवापासून सुरू होणारी पारंपरिक भजने दसरा-दिवाळीपर्यंत जोरात सुरू असतात. गावातील भजनी मेळे नवरात्रीतील जागर करतात.
भजन मेळ्यांच्या स्पर्धा याच कालावधीत उदंड झालेल्या असतात. भात कापणीचा हंगाम संपत आलेला असतो. पिकलेले भात घरात आलेले असते. याच धावपळीत दिवाळीचे दिवस सरतात आणि तुलसी विवाहाने कोकणातील दिवाळीची समाप्ती होते.