भारतामध्ये विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तत्त्वे, आणि त्यांचा अभ्यास याचा पाया खूप जुना आहे, अगदी गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वांचा अभ्यासही प्राचीन काळापासून सुरू आहे. आपल्या अनेक ऋषी-मुनींनी गुरुत्वाकर्षणाचे वर्णन केले आहे. भारतीय भाषांमध्ये “गुरुत्वाकर्षण” या शब्दामध्ये “गुरुत्व” म्हणजेच “वस्तुमान” असे स्पष्टपणे दर्शविते की प्राचीन भारतीयांनी वस्तुमान आणि त्यापासून निर्माण होणारे आकर्षण यांमधील संबंध ओळखले होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र म्हणजेच “सेंटर ऑफ मास” हे पृथ्वीच्या मध्यभागी असल्याचे ज्ञान भारतीयांना पूर्वीपासूनच होते.
सनातन हिंदू धर्मामध्ये तत्त्वज्ञानाच्या सहा मुख्य शाखा आहेत, त्यापैकी एक वैशेषिक आहे. हे तत्त्वज्ञान महर्षी कणाद यांनी स्थापित केले. वैशेषिक सूत्रांमध्ये महर्षी कणाद यांनी अनेक पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तत्त्वे, कर्माची परीक्षा, आणि परिणाम यांसारख्या विषयांवर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे. या सूत्रांमध्ये महर्षी कणाद पदार्थांचे अणूस्वरूप आणि आधुनिक विज्ञानाला मान्य असणाऱ्या तत्त्वांचे स्पष्टीकरण देतात. वैशेषिक सूत्राच्या श्लोकांमध्ये गुरुत्वाकर्षणावरही स्पष्टपणे चर्चा केली आहे. विशेषतः, पाचव्या अध्यायात कर्मपदार्थांची परीक्षा हा विषय आहे, ज्यामध्ये पहिल्या आह्निकेत प्रयत्नकर्मांची आणि त्यांच्या परिणामांची चर्चा होते, आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा दोन प्रकारे उल्लेख आढळतो.
- एखादी वस्तू सोडल्यावर का पडते? –
आत्मसंयोग प्रयत्नाभ्यां हस्ते कर्म l तथा हस्तसंयोगाच्च मुसले कर्म l अभिघातजे मुसलादौ कर्मणि व्यतिरेकादकारणं हस्तसंयोगः l तथात्मसंयोगो हस्तकर्मणि l अभिघातान्मुसलसंयोगाद्धस्ते कर्म l आत्मकर्म हस्तसंयोगाच्च l संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् ll १-७ ll
अर्थात “ आत्मा (इच्छा) आणि प्रयत्न यांच्या संयोगानेच कोणतेही कर्म/क्रिया मनुष्याच्या हातून घडते, हाताद्वारेच मुसळ/खलबत्त्यामधून (कुटण्याची/अभिघाताची) क्रिया होते, टक्कर झाल्यावर अधिक प्रयत्न न करताही खलबत्ता त्याच्यामध्ये असलेल्या उर्जेद्वारे आपोआप वर सरकतो, अशी वर सरकण्याच्या क्रियेत हात आणि प्रयत्न हे कारण नसून त्यामधील वेगरूपी ऊर्जा हे कारण असते. त्याचप्रमाणे खलबत्त्यासोबत हातदेखील स्पर्शामुळे वर जातो, आणि या स्पर्शाच्या अभावात (हाताने वस्तू सोडली की) खलबत्ता गुरुत्वामुळे खाली पडतो.”
- हवेत फेकलेली वस्तू काही वेळाने जमिनीवर का पडते?
नोदनाद्यभिषोः कर्म तत्कर्मकारिताच्च संस्कारादुत्तरं तथोत्तरमुत्तरं च l संस्काराभावे गुरुत्वत्पतनम ll १७-१८ ll
म्हणजेच “धनुष्यातून सोडलेल्या बाणाची (पुढे जाण्याची) पहिली क्रिया आवेगातून होते; या क्रियेमुळे निर्माण होणारी परिणामी/प्रोपल्सिव्ह ऊर्जा बाणातून संपली की अशा ऊर्जेच्या अनुपस्थितीत गुरुत्वाकर्षणामुळे बाण (जमिनीवर) खाली पडतो.”
वेद हे सनातन धर्माचे प्रमुख धर्मग्रंथ आहेत आणि वेदोक्त वैचारिक शाखांचे आणि दर्शनांचे आधारस्तंभ मानले जातात. काही वैज्ञानिकांच्या मते, वेद ५००० वर्षांपासून तर काहींच्या मते १५००० वर्षांपासून पिढ्यानपिढ्या पाठांतराने हस्तांतरित होत आले आहेत. प्रत्येक वेदामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख सापडतो. ऋग्वेदामध्ये सृष्टीच्या उत्पत्तिचे रहस्य, त्यातील पदार्थ आणि त्यांची तत्त्वे यावर गहन भाष्य केलेले आहे. ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या बाराव्या सूक्तात इंद्रतत्वाची स्तुती करताना खालील ऋचा पाहावयास मिळतात,
यदा ते हर्यता हरी वावृधाते दिवेदिवे l आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ll यदा ते मारुतीर्विशस्तुभ्यमिन्द्र नियेमिरे l आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ll यदा सूर्यममुं दिवि शुक्रं ज्योतिरधारयः l आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ll २८-३० ll
“हे इंद्र (अदितीचा पुत्र, म्हणजे आदित्य), जसे तुमच्या रथाचे घोडे प्रतिदिन पुढे जातात, आणि जसे तुमचे मरूद्गण सर्व प्राण्यांना नियमबद्ध करतात, तसेच तुम्ही उज्ज्वल प्रकाशमान सूर्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला नियमबद्ध करता आणि प्रत्येकाला त्यांच्या कक्षेत स्थिर ठेवता.”
या ऋचेचे स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी ऋग्वेदातील प्रथम मंडलातील पस्तीसावे सुक्त पाहावे लागेल ज्यात सहाव्या आणि नवव्या ऋचेत सूर्याचे आकर्षणतत्व विशद केले आहे,
तिस्रो द्यावः सवितुर्द्धा उपस्थाँ एका यमस्य भुवने विराषाट् l आणिं न रथ्यममृताधि तस्थुरिह ब्रवीतु य उ तच्चिकेतत् ll ६ ll ….. हिरण्यपाणि: सविता विचर्षणिरुभे देवापृथिवी संघियते। अपामीवां बाधते वेति सूर्यमभि कृष्णेन रजसा दमृणोति ll ९ ll
म्हणजेच सहावी ऋचा सांगते की “तीन लोकांपैकी देवलोक (स्वर्गलोक) आणि पृथ्वी हे सूर्याच्या अधिपत्याखाली आहेत आणि आकाशलोक हा यमसदनी जाण्याचा मार्ग आहे, ज्याप्रकारे ‘आणि’ नावाच्या मोळ्यावर रथ टिकून असतो त्याचप्रकारे पृथ्वी व इतर अवकाशीय वस्तूंचा आधार हा सूर्य आहे.” पुढे नवव्या ऋचेत याचे स्पष्टीकरण मिळते की “सूर्य त्याच्या कक्षेत फिरत असताना, पृथ्वी आणि इतर स्वर्गीय पिंडांना अशा प्रकारे धरून ठेवतो की ते आकर्षणाच्या शक्तीद्वारे टक्कर होण्याऐवजी (प्रत्येकी स्वतंत्र कक्षेत फिरतात).” इथे ‘कृष्णेन’ या शब्दाचा अर्थ आकर्षण असा आहे. म्हणजेच सूर्य अवकाशीय वस्तूंना आकर्षित करतो पण ज्यांच्या-त्यांच्या वेगामुळे त्या वस्तू सूर्याला किंवा एकमेकांना टक्कर देत नाहीत, म्हणून त्यांच्या कक्षा या स्वतंत्र आहेत.
इ.स. १६६५ मध्ये न्यूटन एकदा एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक सफरचंद पडला आणि त्याने विचार केला की “जर हे सफरचंद पृथ्वीच्या आकर्षणामुळे जर खाली पडत असेल तर चंद्र सुद्धा पडेल का?” अशी कथा सर्वश्रूत आहे. न्यूटन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने हाच फोर्स कसा सर्वत्र उपलब्ध आहे हे खगोलशास्त्रीय पुराव्यांद्वारे सिद्ध केले. तेवढेच नाही तर तत्कालीन पाश्चात्य गणितशास्त्र हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीचा अंदाज बांधण्यासाठी असमर्थ होते म्हणून त्यानेच कॅलक्युलसचादेखील शोध लावला.
न्यूटनच्या सिद्धांतानुसार गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणत्याही दोन वस्तूमधील परस्पर आकर्षण शक्ती (force) असते जी त्या दोघांच्या वस्तुमानाच्या प्रमाणात आणि दोघांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते (म्हणजेच जसे दोन वस्तूंमधील अंतर वाढत जाईल तशी आकर्षण शक्ती क्षीण होत जाते), जी दोन्ही वस्तूंना एकत्र येण्यास तसेच ओर्बिट करण्यास भाग पाडते. याने न्यूटनला सुरूवातीला पडलेल्या कोड्याचे उत्तरही मिळाले. चंद्र सतत पृथ्वीकडे पडत असतो पण त्याच्या सततच्या गतीमुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर कमी होत नाही. म्हणजेच चंद्राच्या गतीमुळे तयार होणारा फोर्स हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणार्या फोर्सएवढाच असतो म्हणून चंद्र हा पृथ्वीभोवती स्थिर कक्षेत आहे. तसेच पृथ्वी आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती स्थिर कक्षात फिरतात.
यात न्यूटनने नमूद करून ठेवलेली गोष्ट म्हणजे दोन वस्तूमधील आकर्षणासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते. याला न्यूटनने “अॅक्शन अॅट ए डिसटन्स” असे म्हंटले, तसेच त्याच्या मते हे “अॅक्शन अॅट ए डिसटन्स” त्वरितपणे क्रियान्वित होते, याचा अर्थ असा होतो की समजा सूर्य जर एकाएकी नष्ट झाला तर इतर ग्रहांच्या कक्षांवर क्षणार्धात परिणाम होईल. न्यूटनला अॅक्शन अॅट ए डिसटन्स नेमके कसे काम करते, त्याचे मेकॅनिजम काय, तसेच ते त्वरितपणे क्रियान्वित कसे होऊ शकते हे प्रश्न सतावत होते. न्यूटनला हे एक दैवी रहस्य वाटत असे कारण कोणताही फोर्स क्रियान्वित होण्यासाठी कोणत्याना कोणत्या माध्यमाची गरज असतेच.
अथर्ववेदाच्या चौथ्या कांडातील अकरावे सूक्त, म्हणजेच “अनड्वान्” सूक्तातील पहिल्याच मंत्रात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा व अॅक्शन अॅट ए डिस्टन्सचा संदर्भ मिळतो.
अनड्वान् दाधार पृथिवीमुत द्यामनड्वान् दाधारोर्वन्तरिक्षम् l अनड्वान् दाधार प्रदिशः षडुर्वीरनड्वान् विश्वं भुवनमा विवेश ll
अर्थात “ज्याप्रमाणे बैल गाडीला ओढतो त्याप्रमाणे इंद्रतत्व (सूर्याच्या रूपात) पृथ्वी आणि इतर ग्रहांचा गाडा पुढे ओढत नेते, तसेच या शकटवाही देवाने सहा महादशा व उर्वियांनाही धारण केले आहे.”
सर्व ग्रह आणि सूर्य यांत प्रचंड मोठे अंतर असूनही त्यांना पुढे ओढत नेणे कसे शक्य होते, सूर्य व ग्रह तसेच पर्यायाने कोणत्याही दोन वस्तूमधील परस्पर गुरुत्वाकर्षणाचे माध्यम काय हे जाणून घेण्यासाठी आपणास याज्ञवल्क्य आणि गार्गि यांचा शास्त्रार्थ तसेच आइनस्टाईनची थेयरी पहावी लागेल.
राजा जनक यांच्या राजसूय यज्ञात महर्षी याज्ञवल्क्य आणि गार्गि यांच्यात झालेल्या शास्त्रार्थाचे वर्णन बृहदारण्यकोपनिषदात मिळते. राजसूय यज्ञात राजा जनक यांनी घोषणा केली होती की जो कोणी सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी सिद्ध होईल त्याला राजांच्या गौशाळेतील सर्व गायी दान केल्या जातील, तेव्हा महर्षी याज्ञवल्क्य आपल्या शिष्यांना आज्ञा देतात की सगळ्या गायी घेऊन या, तेव्हा यज्ञात उपस्थित असणारे इतर ऋषि इत्यादी लोक महर्षी याज्ञवल्क्य यांच्यासोबत शास्त्रार्थ करू लागतात व त्यांच्याकडून पराजित होतात. शेवटी गार्गी उभी राहते व घोषणा करते की “मी फक्त तुम्हाला दोन प्रश्न विचारेन आणि जर तुम्ही यांचे उत्तर देऊ शकलात तर नि:संदेह तुम्हीच सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी आहेत हे सिद्ध होईल आणि कोणीच तुम्हाला शास्त्रार्थात हरवू शकणार नाही”. ती पहिला प्रश्न विचारते की “द्युलोक व पृथ्वी आणि त्यांच्यापेक्षा वर व खाली असणारे लोक (सर्व १४ लोक) तसेच भूत-भविष्य-वर्तमान हे सर्व काळ हे कोणत्या तत्वाने व्याप्त/ओतप्रोत आहेत?” याज्ञवल्क्य तिला उत्तर देतात की “ स होवाच यदूर्ध्वं गार्गि दिवो यदवाक् पृथिव्या यदन्तरा द्यावापृथिवी इमे यद् भूतं च भवच्च भविष्यच्चेत्याचक्षत आकाशे तदोतं च प्रोतं चेति”, अर्थात “हे गार्गि, ज्या सर्व लोकांना आणि काळांना एकत्रितपणे ‘सूत्र’ असे म्हणतात हे सूत्र ‘आकाशतत्वात (space)’ व्याप्त/ओतप्रोत असते.” यावर शंकराचार्यांनी भाष्य केले आहे की, “सूत्रम आकाशे तदोतं प्रोतं च, यदेतद् व्याकृतं सूत्रात्मकं जगदव्याकृताकाशे, अप्स्विव पृथिवीधातुः, त्रिष्वपि कालेषु वर्तते उत्पत्तौ स्थितौ लये च” म्हणजेच हे आकाशतत्व पाण्यासारख्या अदृश्य द्रव्याप्रमाणे सर्व लोक व काळ व्याप्त करते, व हे सर्व त्यातच वावरत असतात. यावरून हे स्पष्ट होते की पृथ्वी, सूर्य आदि सर्व ग्रह-तारे आकाशतत्वात वावरत असतात, यावरून आपण अंदाज लावू शकतो की आकाशतत्व म्हणजेच स्पेस हेच सर्व अवकाशीय वस्तूंच्या गुरुत्वशक्तीचा आधार व फोर्स ट्रान्सफरचे माध्यम आहे. पुढे आइनस्टाईनच्या थेअरीवरून हेच स्पष्ट होईल.
पूर्वापार सर्वमान्य पाश्चात्य समज असा होता की पृथ्वी ही सपाट असून सर्व विश्वाच्या मध्यभागी आहे आणि सर्व तिच्याभोवती फिरतात, हा समज न्यूटनने गणित व पुराव्याद्वारे खोडून काढला. तसेच सर्व ग्रह आपापल्या कक्षेत कसे फिरतात अशी खगोलशास्त्रातील असंख्य कोडी न्यूटनने उलघडली. तथापि, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात काही कमतरताही होत्या जसे अॅक्शन अॅट ए डिसटन्स नेमके कसे काम करते, त्याचे मेकॅनिजम काय, तसेच ते त्वरितपणे क्रियान्वित कसे होऊ शकते हे सिद्ध होऊ शकत नव्हते आणि जर खूप मोठे वस्तुमान आणि तुलनेने कमी अंतर असेल तर न्यूटनचे इक्वेशन्स काम करत नाहीत उदा. बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्याने त्याच्या हालचाली न्यूटनच्या इक्वेशन्सनुसार होत नाहीत असेही नंतरच्या खगोलशास्त्रज्ञांनी नोंद केले आहे.
सदर कमतरता दूर करण्यासाठी आणि अॅक्शन अॅट ए डिसटन्स मागचे रहस्य शोधून काढण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाईनने काम सुरू केले आणि १९०७ मध्ये त्याने तीन सुंदर कल्पनांना जन्म दिला त्या म्हणजे,
- कल्पना करा की एक व्यक्ती एका उंच बिल्डिंगवरून खाली पडत आहे, पडताना त्याला स्वताचे वजन शून्य झाले आहे असे वाटेल जणू काही तो रिकाम्या अवकाशातच फिरत आहे. म्हणजेच फ्री फॉल आणि गुरुत्वाच्या कमतरतेत रिकाम्या अवकाशातील प्रवास हे एकसमानच आहेत.
- कल्पना करा की एक व्यक्ती एका रॉकेटमधून प्रवास करत आहे आणि रॉकेटचा स्पीड हा तंतोतंत पृथ्वीच्या gravitational acceleration इतकाच म्हणजे ९.८ मी/सेकंद/सेकंद इतका वाढत जात आहे, त्या व्यक्तिला आपण पृथ्वीवर आहोत की अवकाशात यातील फरकच समजणार नाही. म्हणजे प्रवेगात असणारे रॉकेट आणि पृथ्वीच्या गुरुत्वाचा प्रभाव हे एकसमान आहेत.
- आता कल्पना करा त्याच रॉकेटमध्ये त्या व्यक्तीने टॉर्च लावला, टॉर्च मधून निघणारे किरण हे सरळ रेषेत जातील पण रॉकेट तर सातत्याने वेग वाढवत पुढे पुढे जात आहे. रॉकेटच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून पहिल्याने टॉर्चचा प्रकाश थोडासा वक्र झाल्यासारखा दिसेल. आणि जर प्रवेगात असणार्या रॉकेटमध्ये प्रकाश वक्र होत असेल तर दुसर्या कल्पनेप्रमाणे पृथ्वीच्या गुरुत्वामुळेसुद्धा प्रकाश वक्र होत असला पाहिजे.
या कल्पनांमधुनच आइनस्टाईनला अॅक्शन अॅट ए डिसटन्सच्या रहस्याचा उलघडा झाला त्याचे गणित मांडण्यासाठी त्याला एका गणिततज्ञाची मदत घ्यावी लागली आणि पुढे १९१५ मध्ये त्याने ४ पेपर्स मधून “जनरल थेयरी ऑफ रिलेटीविटी आणि फिल्ड इक्वेशन्स” मांडले. यातच त्याने बुध ग्रहाच्या हालचालीचे कोडेदेखील सोडवले. आईनस्टाईनचे फिल्ड इक्वेशन्स हे न्यूटनच्याच इक्वेशन्सचे सुधारीत पूर्णस्वरूप असे होते, तसेच हे फिल्ड इक्वेशन्स ब्लॅकहोलची सिंग्युलॅरिटी इत्यादी काही अपवाद वगळता सर्वत्र लागू होऊ शकते व प्रत्येक पदार्थावर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाचा अचूकरित्या अंदाज लावण्यास सक्षम आहे.
आइनस्टाईनच्या जनरल थेयरीप्रमाणे गुरुत्वाकर्षण म्हणजे दोन वस्तूंमधील आकर्षण नसून ते “स्पेसटाइमच्या फॅब्रिकमधील वक्रता (curvature in the fabric of space-time)” असते म्हणजेच स्पेसटाइम हे एक स्टेज आहे ज्यावर सर्व ग्रह-तारे वावरतात, आणि त्यांची हालचाल ही स्पेसटाइमच्या उताराप्रमाणे/वक्रतेप्रमाणे असते.” हे नेमके काम कसे करते यावर बोलताना आइनस्टाईनच्या एका शिष्याने वर्णन केले की “पदार्थाचे वस्तुमान हे स्पेस-टाइमची वक्रता ठरवते, आणि स्पेस-टाइमच्या वक्रतेनुसार पदार्थांची हालचाल होते (mass tells space-time how to curve and space-time tells mass how to move)”. यात नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आइनस्टाईनच्या मते स्पेस आणि टाइम हे एकच आहेत आणि सर्व पदार्थ स्पेसच्या ३ व टाइमच्या १ अशा ४ डीमेंशन्समध्येच वावरत असतात. तसेच पुढे त्याने स्पेशल थेयरी ऑफ रेलेटीविटी मधून सिद्ध केले की प्रकाशाची गती ही कोणत्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये कॉन्स्टंट असते आणि स्पेस-टाइम मध्ये प्रकाशाची गती हीच स्पीड लिमिट असते.
तसेच आइनस्टाईनच्या थेयरीनुसार गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशाचे किरणसुद्धा वक्र झाले पाहिजेत कारण स्पेसटाइमच जर वक्र होत असेल तर त्यावरून कमीतकमी वेळेत जाण्यासाठी प्रकाशाला सुद्धा वक्र व्हावे लागेल. याचा पुरावा थेयरीनंतर ४ वर्षांनी मिळाला जेव्हा काही वैज्ञानिक एका सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याच्या मागे असणार्या तार्यांचे मोजमाप करत होते तेव्हा त्यांना लक्षात आले की एक तारा जिथे पाहिजे त्यापेक्षा थोड्या लांबच्या जागेवर दिसत आहे. म्हणजेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे मागून येणार्या तार्याचा प्रकाश वक्र होतो. हाच आइनस्टाईनच्या जनरल रिलेटीविटीचा पुरावा मानला गेला.
त्याचप्रमाणे ब्लॅकहोलचे गुरुत्व इतके महाभयानक असते आणि ते स्पेसला इतक्या तीव्रतेने वक्र करते की जर तुम्ही समोरून ब्लॅकहोलकडे पाहत असाल तर ब्लॅकहोलच्या मागील बाजूचे प्रकाशकिरण वक्र होऊन पुढील बाजूस येतात व तुम्हाला एकत्रितरित्या दिसतात, म्हणजेच ब्लॅकहोलकडे पाहत असताना तुम्ही ब्लॅकहोलची पुढील व मागील दोन्ही बाजू एकावेळीच पाहत असता. तसेच आइनस्टाईनच्या थेयरीनुसार गुरुत्वाकर्षणामुळे स्पेससोबतच टाइम सुद्धा प्रभावित होते म्हणजेच ग्रहांसारख्या मोठ्या वस्तूशेजारी वेळीची गतीसुद्धा मंदावते. त्याचप्रमाणे ब्लॅकहोलच्या जवळ वेळीची गती खूपच जास्त मंदावते या गोष्टीचे चित्रीकरण आपल्याला इंटरस्टेलर या चित्रपटात पाहावयास मिळते, ब्लॅकहोलच्या इवेंट होरायजनच्या आत स्पेस आणि टाइम यांच्या कर्तव्यांची अदलाबदलीदेखील होते म्हणजेच ब्लॅकहोलची सिंग्युलॅरिटी ही एका ठिकाणी नसून ती इवेंट होरायजन पार करणार्याच्या भविष्यात निश्चितपणे घडते.
तसेच अॅक्शन अॅट अ डिस्टन्सचा परिणाम त्वरित झाला पाहिजे ही न्यूटनची थेयरी पुढे आइनस्टाईनने चुकीची सिद्ध करून दाखवली कारण संपूर्ण विश्वात एकच स्पीड लिमिट आहे तो म्हणजे प्रकाशाचा वेग, त्यामुळे ग्रॅविटेशनल व्हेव्स यासुद्धा प्रकाशापेक्षा जास्त गतीने वावरू शकत नाहीत, समजा जर सूर्य एकाएकी नष्ट झाला तर पृथ्वीच्या कक्षेवर त्याचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी आठ मिनिटे वीस सेकंद लागतीलच कारण सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तेवढाच वेळ लागतो, हे सुद्धा प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे.
अशा प्रकारे पाश्चात्य वैज्ञानिक युगाची सुरुवात ही १६६५ मधील आयझॅक न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधापासून समजली जाते, या शोधानंतरच वैज्ञानिक विचारपद्धती आणि प्रत्यक्ष व गणितीय पुराव्यांद्वारे प्रकृतीच्या विविध गुपितांचे विच्छेदन सुरू झाले अशी मान्यता आहे. न्यूटनच्या ग्रॅविटिच्या थेयरीमुळे आणि तीन लॉंस ऑफ मोशनमुळेच आजची आधुनिक अभियांत्रिकी, आधुनिक खगोलविज्ञान, इंडस्ट्रियल रेवोल्युशन आणि रॉकेट सायन्स तयार होऊ शकले, १९०० मध्ये पहिल्या विमानाची फ्लाइट उडणे हे न्यूटनच्या तिसर्या लॉ ऑफ मोशन आणि बर्नोलीच्या सिद्धांताशिवाय अशक्य होते, १९६७ मध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. पुढे आइनस्टाईनच्या सुधारित इक्वेशन्समुळे सॅटलाइट टाइम कम्प्युटेशन शक्य होऊ शकले ज्याच्यामुळे वैश्विक स्तरावर जीपीएस उपयोगात आणले जाऊ शकले, आणि आइनस्टाईनच्या फिल्ड इक्वेशन्समुळेच ब्लॅकहोल इत्यादी गोष्टींचा शोध लागू शकला.
यात खेदाची गोष्ट म्हणजे, हेच सर्व शोध भारताच्या भूमितही लागू शकले असते पण मध्ययुगीन कालखंडात पुनरुत्थान अनुभवणाऱ्या वैदिक ज्ञानाच्या नाजूक रोपट्याला इतिहासाच्या नंतरच्या कालखंडात असंख्य विनाशकारी आघातांना सामोरे जावे लागले. परिणामी, अशा वैदिक ज्ञानाचा उपयोग करून मानव उपयोगी प्रगत तंत्रज्ञान बनवण्यापासून भारतीयांना वंचित राहावे लागले.
पण हरकत नाही, आइनस्टाईनच्या ग्रॅविटी थेयरीमध्येदेखील अजून कमतरता आहेत जसे की ब्लॅकहोलच्या सिंग्युलॅरिटीमध्ये आइनस्टाईनचे इक्वेशन्स काम करत नाहीत, क्वांटम लेव्हलवरसुद्धा काम करत नाहीत. तसेच इतर फंडामेंटल फोर्सेस आणि गुरुत्व यांच्यातील परस्पर संबंध अजून कोणी शोधलेले नाहीत.
तसेच गुरुत्व, फंडामेंटल फोर्सेस, स्टँडर्ड मॉडेल ऑफ पार्टिकल्स आणि क्वांटम मेकॅनिक्स यांचे एकीकरण करून “थेयरी ऑफ एवरीथिंग” तयार करण्याची स्ट्रिंग थेयरीची महत्वाकांशा फसलेली आहे, हजारो वैज्ञानिकांचा ६० वर्षांपासून रिसर्च सुरू असूनदेखील काही गणिते सोडल्यास त्यांच्याकडे दाखवण्यापुरतेदेखील काही नाही.
तसेच गुरुत्वासाठी लागणारे मॅटर व अॅंटीमॅटर यांची संपूर्ण विश्वात गणना केली तर ते फक्त एकूण वस्तूमानाच्या ५ टक्के इतकेच भरतात, शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की उर्वरीत ९५% वस्तूमान हे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जि यांचे आहे, या गोष्टींचा पुराव्यासहित शोध अजून लागलेला नाही तसेच ते दिसतही नाहीत म्हणूनच त्यांना डार्क असे म्हंटले जाते. त्यामुळे प्रस्तुत विज्ञानातील बरीचशी कोडी सोडवणे अजून बाकी आहे आणि ही कोडी उलघडण्यासाठी प्रगत विज्ञानासोबतच सनातन वैदिक संस्कृतीचाही पाया भक्कम असण्याची गरज आहे…..