महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तिपीठे

Raj K
देवीची साडेतीन शक्तिपीठे

साडेतीन शक्तिपीठे – देवी सतीची आख्यायिका

साडेतीन शक्तिपीठे – आख्यायिकेनुसार माता सतीचे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल (हरिद्वार) येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता. या प्रसंगी त्यांनी सर्व देवतांना आमंत्रणे पाठवली होती.
पण त्यांनी आपली मुलगी सती आणि जावई शंकर यांना बोलावले नव्हते. शंकराने  नकार दिल्यानंतरही देवी सती त्या  कार्यक्रमासाठी वडिलांच्या घरी गेली.
जेव्हा माता सतीने आपल्या वडिलांना विचारले की “तुम्ही या यज्ञासाठी सर्वांना आमंत्रण पाठवले आहे, परंतु जावयाला आमंत्रण दिले नाही. याचे कारण काय?” हे ऐकून राजा दक्ष शंकर यांच्याबद्दल कटू / वाईट बोलू लागले.
आई सतीसमोर ते त्यांच्या पतीला दोष देऊ लागले.  हे ऐकून माता सतीला खूप वाईट वाटले. या दुःखात / रागात त्यांनी यज्ञासाठी तयार केलेल्या अग्निकुंडात आहुतीसाठी प्रवेश केला.
जेव्हा भगवान शंकराना हे कळले तेव्हा क्रोधाने त्यांनी वीरभद्रला पाठवले ज्याने त्या यज्ञाचा पूर्णनाश केला. तेथे उपस्थित असलेले सर्व ऋषी आणि भगवान शंकर ह्यांचा क्रोध टाळण्यासाठी पळून गेले.
भगवान शंकरानी माता सतीचे मृत शरीर त्या अग्निकुंडातून बाहेर काढले आणि आपल्या खांद्यावर घेतले आणि इकडे तिकडे भटकू लागले.

भगवान विष्णू ह्यांना माहित होते की श्री शंकराच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा विनाश होऊ शकतो, म्हणून शंकराचा राग शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले. मातेच्या शरीराचे हे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि नंतर या भागांना 51 शक्तीपीठे म्हटले गेले.

साडेतीन शक्तिपीठे

आपल्या येथे स्त्री शक्तीचा जागर करताना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तिपीठ आहेत.  कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका, तुळजापूरची भवानी ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.

साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ मानले जाते.

१. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरच्या करविरनिवासिनी महालक्ष्मीचे (अंबाबाई) मंदिर पुजले जाते. पुराणात  महाराष्ट्रातील या शक्तिपीठांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेक पुराणकथा, ग्रंथ  आणि जैन ग्रंथांमध्ये या मंदिराचा, स्थानाचा (करवीर नगरी) उल्लेख / समावेश आहे.

Mahalaxmi mandir- kolhapur
Mahalaxmi mandir- kolhapur


कथा :
या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्यात जवळजवळ शंभर वर्ष युद्ध सुरु होते. या युद्धात शेवटी इंद्राचा या युद्धात पराभव झाला व महिषासूर स्वर्गाचा राजा झाला.

ज्यावेळी ही गोष्ट भगवान शंकर यांना कळली त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागली आणि या अग्नीतूनच देवी प्रकट झाली.

सर्व देवांनी तिची प्रार्थना केली व  आपली अमोघ शस्त्रे दिली. देवीचे आणि महिषासुराचे प्रचंड मोठे युद्ध झाले व त्या युद्धात  देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना मारले.

पूर्ण विजयानंतर देव-देवता ह्यांनी देवीची “महालक्ष्मी” असा  गौरव करुन पूजा केली तीच “करविरनिवासिनी महालक्ष्मी”.

‘किरणोत्सव’

दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये भाविकांची फार गर्दी असते.  कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.

या दरम्यान मंदिरात “किरणोत्सव” साजरा होतो,  विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात.

ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. मंदिराची संरचनाच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून ठराविक दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.  या महोत्सवाला ‘किरणोत्सव’ असे म्हणतात.

मूर्ती

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत.

 

२. देवी रेणुकामाता, माहूर (नांदेड)

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र माहूरचे देवस्थान आहे. माहूरची श्री रेणुकामाता, श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते. रेणुका किंवा येल्लमा माता महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. हे स्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणून पुजले जाते.

कथा :  रेणुकादेवी ही प्रसेनजित राजाची कन्या. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तीचे स्वयंवर करण्याचे ठरवले. स्वयंवरात रेणुकेने जमदग्नि ऋषींना वरमाला घातली, कथेनुसार, एकदा रेणुका गंगास्नान करत होती. तेथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियोत्तमेबरोबर जलक्रीडा करत होता.
त्यामुळे रेणुकेचे मन विचलीत झाले आणि याची माहिती जमदग्नीनेला लागली. रेणुका आश्रमांत येताच त्याने आपल्या पाचही पुत्रांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. चार मुलांनी ही आज्ञा अमान्य केली. मात्र परशुरामाने प्रत्यक्ष आईला मारले. नंतर परशुरामाने आईला जीवित करण्याचा वर जमदग्नीनेकडे मागितला. जिवंत झाल्यावर रेणुका देवीने देहशुद्धीसाठी अग्निसेवन केले.

कथा दुसरी :
जमद्गनी ऋषींच्या आश्रमात सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. राजा सहस्त्रार्जुनाला कामधेनुचा मोह झाला. राजाने जमद्गनी ऋषींकडे कामधेनुची मागणी केली. पण जमद्गनी ऋषींनी नकार दिला, त्यामुळे सहस्त्रार्जुनाने आश्रमावर धावा बोलला आणि जमद्गनी ऋषींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली.
हा प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिक्षा केली.  परशुराम आपल्या पित्याचे शव व मातेला घेऊन माहूर येथे पोहचल्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्या ठिकणी त्यांनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले. रेणुका देवी सती जाण्यास सज्ज झाली, पण त्यापूर्वी तिने परशुरामाकडे पिण्यास पाणी मागितले.
मात्र, परशुराम पाणी घेऊन येईपर्यंत रेणुकादेवीचा अर्धा अधिक देह जळून गेला होता व मस्तक तेवढे शिल्लक राहिले होते म्हणून माहूरगडावर केवळ देवीचे मस्तक पुजले जाते.
देवस्थानच्या गाभाऱ्यात रेणुकेची मूर्ती नसून तिचा मुखवटा आहे. रेणुका देवीचा हा मुखवटा पाच फूट उंच व चार फूट रुंद असा आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवले आहे.

३. तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर

पूर्ण शक्तिपीठामंध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा समावेश होतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या शहरामध्ये हे मंदिर वसलेले आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

कथा : स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात ‘कर्दभ’ नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी ही फार सुंदर आणि पतीव्रता होती. तिला पुत्ररत्न झाले.

पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दभ ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतिसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितले.  त्यामुळेच ती पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरु पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परीसरात गेली. त्याठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरु केली.

कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. त्रेत्रायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे.

 

4. सप्तशृंगी मंदिर, वणी (सप्तश्रृंगगड)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे रूप समजण्यात येते.  पुराणात उल्लेख केलेल्या 108 शक्तीपिठांमध्ये याचा उल्लेख आहे, नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तश्रृंगी किल्लावर हे देवीस्थान आहे.

कथा : पौराणिक कथांनुसार कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून महिषासुराला मिळाला होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देव इंद्राला हाकलून दिले. त्यामुळे इंद्राने त्रिदेवांकडे मदत मागितली.

त्या तिघांनी त्यांची शक्ती एकवटून एका तेजाची निर्मिती केली, श्री अंबेच्या रुपाने ते तेज पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तश्रृंगी जवळ होता. देवीने त्याचा तेथे वध केला आणि देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर दोन दिवस विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले.

सप्तश्रृंगीदेवीचा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव साधारण दहा ते बारा दिवस सुरु असतो.  गडावर चैत्रोत्सव सुरु झाला की, या ठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. अश्विन शुद्ध म्हणजेच नवरात्र येथे साजरी केली. नवरात्रीतल्या सप्तमीला देवी या गडावर वास करते असे म्हटले जाते.

 

*संकलित माहिती.

The short URL of the present article is: https://moonfires.com/k7t7
Share This Article
Leave a Comment